*महिला आशियाई करंडक फु़टबॉल आणि फिफा U-17 महिला विश्वचषक स्पर्धा पूर्वतयारीचा आयुक्तांकडून आढावा*
जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हणून ओळखला जाणा-या फुटबॉलच्या फिफा - 17 वर्षाखालील महिला विश्वचषक (FIFA U-17 Womens' World Cup) स्पर्धेचे यजमानपद भारत देश भूषविणार आहे. तत्पूर्वी महिला आशियाई करंडक स्पर्धा जानेवारी-फेब्रुवारी 2022 मध्ये संपन्न होत आहे. या दोन्ही जागतिक स्तरावरील स्पर्धा भारतात आयोजित केल्या जात असून महाराष्ट्रातील नवी मुंबई शहराला 2017 मधील फिफा - 17 वर्षाखालील पुरूष विश्वचषक स्पर्धेप्रमाणे याही वर्षी या जागतिक स्पर्धांचे यजमानपद भूषविण्याचा बहुमान प्राप्त झालेला आहे.
या स्पर्धांच्या पूर्वतयारीबाबत विचारविनीमय करण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या दालनात विशेष बैठक संपन्न झाली. याप्रसंगी महानगरपालिका क्रीडा विभागाचे उपआयुक्त श्री. मनोज महाले, फिफा अंडर 17 महिला विश्वचषक स्पर्धा 2022 आणि महिला आशियाई करंडक फुटबॉल स्पर्धा 2022 चे प्रकल्प संचालक श्री. अंकुश अरोरा व श्रीम. नंदिनी अरोरा, होस्ट सिटी मॅनेजमेंट प्रमुख श्री. मनदीप सहारन, डी.वाय.पाटील क्रीडा समुहाचे संचालक श्री.वृंदावन जाधव, महानगरपालिका क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी भारतात खेळविली जाणारी महिला आशियाई करंडक फुटबॉल स्पर्धा 2022 तसेच फिफा - 17 वर्षाखालील महिला विश्वचषक स्पर्धा कोव्हीडविषयक सर्व नियमांचे कोटेकोर पालन करून आयोजित केली जाणार असून नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डॉ.डि.वाय.पाटील स्टेडियममध्ये स्पर्धेतील प्रमुख सामने खेळवले जाणार आहेत.
या सामन्यांपूर्वी जगभरातून येणा-या नामांकीत खेळाडूंना सराव करण्यासाठी फुटबॉल ग्राऊंडची गरज असून ती क्रीडांगणेही आंतरराष्ट्रीय दर्जाची असणे गरजेचे आहे. याकरिता फिफा आयोजन समितीने नवी मुंबईतील 4 तसेच खारघरमधील 2 मैदानांची सरावासाठी निवड केली असून त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेक्टर 19 नेरूळ येथील यशवंतराव चव्हाण क्रीडांगणाचा समावेश आहे.
या क्रीडांगणामध्ये महानगरपालिकेने 2017 मध्ये फिफा - 17 वर्षाखालील पुरूष विश्वचषक स्पर्धेच्या सरावासाठी तयार केलेल्या फुटबॉल ग्राऊंडची प्रशंसा त्यावेळी न्यूझिलंड, इंग्लड, स्पेन, ब्राझिल, बाली, टर्की अशा नामांकीत संघातील खेळाडूंनी सरावादरम्यान केली होती. तशाच प्रकारे यावेळीही स्पर्धांकरीता नवी मुंबई महानगरपालिका यजमान शहर म्हणून संपूर्ण सहकार्य करेल असा विश्वास आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी फिफा आयोजकांना दिला.
या स्पर्धांच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने फिफा आयोजकांच्या तांत्रिक समितीसह नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा व अभियांत्रिकी विभागाच्या अधिका-यांनी तत्परतेने सोमवार दि. 16 ऑगस्ट रोजी यशवंतराव चव्हाण फुटबॉल क्रीडांगणाची संयुक्त पाहणी करावी आणि तेथील आवश्यक सुविधांचा आढावा घ्यावा असे निर्देश आयुक्तांनी महापालिका अधिका-यांना दिले. क्रीडांगणाची स्थिती आंतरराष्ट्रीय दर्जाला साजेशी करणेबाबत संपूर्ण कार्यवाही करण्याची दक्षता घेण्याचे व स्पर्धेपूर्वी 1 महिना आधी ड्रेसींग रूम, फ्लड लाईट्स अशा अनुषांगिक सर्व सुविधांसह क्रीडांगण सज्ज राहील याची काळजी घेण्याचे आयुक्तांनी आदेशित केले.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे यजमानपद भूषविण्याचा मान नवी मुंबई महानगरपालिकेला मिळणे ही शहरातील प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाची बाब असून स्पर्धांच्या अनुषंगाने सोयीसुविधा, सुशोभिकरण तसेच स्पर्धांच्या व्यापक प्रचार प्रसिध्दीतही महानगरपालिका पुढाकार घेईल असे आयुक्तांनी फिफा व एएफसी आयोजक समुहाला आश्वासित केले.
Published on : 13-08-2021 14:15:10,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update