सुव्यवस्थित श्रीगणेशमूर्ती विसर्जन व्यवस्थेकरिता नवी मुंबई महानगरपालिका सज्ज

कोव्हीड १९ च्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार यावर्षीचा श्रीगणेशोत्सव दि. १० ते १९ सप्टेंबर २०२१ या कालावधीत संपन्न होत आहे. महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागीय क्षेत्रात महानगरपालिका हा उत्सव सुनियोजितपणे पार पाडण्यासाठी सतर्क आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवित कुठेही गर्दी होणार नाही याची काळजी घेऊन आठही विभाग कार्यालयांमार्फत विसर्जन व्यवस्थेची नियोजनबध्द आखणी करण्यात आलेली आहे. यामध्ये पारंपारिक २२ मुख्य विसर्जन स्थळांच्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे सुयोग्य व्यवस्था असणार आहेच, यासोबतच विसर्जनस्थळी होणारी गर्दी टाळली जावी व सोशल डिस्टन्सींगचे पालन व्हावे यादृष्टीने १५१ कृत्रिम विसर्जन तलाव सर्व विभागांत तयार करण्यात आले आहेत. यामध्ये, बेलापूर विभागात - 21, नेरूळ विभागात - 27, वाशी विभागात - 18, तुर्भे विभागात - 20, कोपरखैरणे विभागात - 16, घणसोली विभागात - 17, ऐरोली विभागात - 23 व दिघा विभागात - 9 अशा प्रकारे एकूण 151 कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. विभागनिहाय कृत्रिम विसर्जन तलावांच्या स्थळांबाबतची माहिती त्या त्या विभागांमध्ये होर्डींगव्दारे प्रसिध्द करण्यात आली असून व्हॉट्सॲप तसेच महानगरपालिकेची वेबसाईट, फेसबुक, ट्विटर अशा सोशल मिडियावरूनही या ठिकाणांची प्रसिध्दी करण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या घराजवळच्या कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये आपल्या घरगुती श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
. त्याचप्रमाणे सुनियोजित पध्दतीने विसर्जन संपन्न व्हावे याकरीता नागरिकांच्या सुविधेसाठी 'आॅनलाईन श्रीगणेशमूर्ती विसर्जन स्थळ नोंदणी' करिता nmmc.visarjanslots.com हे विशेष पोर्टल तयार करण्यात आले आहे. त्यालाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
. आज दुपारी १२ वा. पासून दीड दिवसाच्या श्रीगणेशमूर्ती विसर्जनाला सुरुवात झाली असून नागरिक या विसर्जन सुविधांचा चांगला उपयोग करीत आहेत. अशाच प्रकारे गौरीसह गणेश विसर्जन, सात दिवस व दहा दिवस अशा विसर्जनदिनी सर्व विसर्जन स्थळांवर सुसज्ज व्यवस्था असणार आहे. महानगरपालिका क्षेत्रातील २२ मुख्य विसर्जन स्थळांची साफसफाई व त्या परिसरात आवश्यक दुरूस्ती कामे यापूर्वीच करण्यात आलेली आहेत. १४ मुख्य तलावांमध्ये इटालियन गॅबियन वॉल रचना असून नागरिकांनी याच विशिष्ट ठिकाणी श्रीमुर्तींचे विसर्जन करावे व पर्यावरण रक्षण-संवर्धनासाठी हातभार लावावा असे आवाहन करतानाच शक्यतो घराजवळच्या कृत्रिम विसर्जन तलावातच श्रीमूर्ती विसर्जन करावे अशी नागरिकांना विनंती करण्यात आलेली आहे.
मुख्य २२ विसर्जनस्थळांवर पुरेश्या विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच प्रथमोपचार कक्ष कार्यान्वित आहे. विसर्जनासाठी येणा-या नागरिकांकरीता पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही सर्व ठिकाणी करण्यात येत असून सुविधा मंच उभारण्यात आले आहेत. तेथे श्रीगणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी व करावयाच्या सूचनांसाठी ध्वनीक्षेपक यंत्रणा कार्यरत आहे.
श्रीमूर्ती विसर्जनासाठी 1000 हून अधिक स्वयंसेवक नेमण्यात आले असून त्यासोबतच अग्निशमन जवान, लाईफगार्डस् तैनात आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने मुख्य विसर्जन स्थळांच्या काठांवर आवश्यक ठिकाणी बांबूचे बॅरेकेटींगही करण्यात आले आहे.
अशाच प्रकारे १५१ कृत्रिम विसर्जन तलावांच्या ठिकाणीही आवश्यक व्यवस्था करण्यात आलेली आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत ओल्या व सुक्या निर्माल्यासाठी दोन स्वतंत्र निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. याठिकाणी जमा होणा-या निर्माल्याचे पावित्र्य राखण्याची काळजी घेत स्वतंत्र वाहनाव्दारे वाहतुक केली जाणार आहे तसेच प्रकल्पस्थळीही त्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने गणेशोत्सवात गर्दी टाळणे व सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे वैयक्तिक आणि सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने सर्वात महत्वाचे असल्याने श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे, चाळीतील / इमारतीमधील सर्व घरगुती गणेशमुर्तींचे विसर्जन एकत्रितरित्या निघून करण्यात येऊ नये अशा विविध सूचना करण्यात आलेल्या आहेत.
त्यास अनुसरून यावर्षीचा श्रीगणेशोत्सव साजरा करताना प्रत्येक नागरिकाने आरोग्याचे भान ठेवून स्वयंशिस्तीचे पालन करावे आणि आरोग्योत्सव स्वरूपात गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.
Published on : 13-09-2021 13:00:10,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update