*स्वच्छ सोसायटी, हॉटेल, शाळा, हॉस्पिटल, मार्केट, शासकीय कार्यालय विजेत्यांचा स्वच्छता सन्मान*
नवी मुंबईकर नागरिकांनी नेहमीच स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. स्वच्छता विषयक उत्तम कामगिरी करणा-या संस्थांच्या कामाचे कौतुक व्हावे व त्यांना यामधून प्रोत्साहन आणि इतरांना त्यापासून प्रेरणा मिळावी याकरिता स्वच्छ सर्वेक्षण 2021 च्या अनुषंगाने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ सोसायटी, हॉटेल, शाळा, हॉस्पिटल, मार्केट, शासकीय कार्यालय या सहा गटांतील स्वच्छता स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेद्रात कोव्हीड सुरक्षा नियमांचे पालन करीत उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, शहर अभियंता श्री. संजय देसाई, उपआयुक्त श्री. जयदीप पवार, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनावणे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
नागरिकांच्या सक्रीय प्रतिसादामुळे नवी मुंबईमध्ये स्वच्छतेची चळवळ उभी राहिल्याचे चित्र दिसत असून स्वच्छता ही नियमित करण्याची गोष्ट असल्याने प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून स्वच्छता ही आपली सवय बनवावी असे आवाहन करीत अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी स्वच्छता स्पर्धेतील विजेत्यांचे अभिनंदन केले.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी कोरोना प्रभावित कालावधीतही नवी मुंबईकर नागरिकांनी नोव्हेंबर मध्ये आयोजित या स्पर्धेत कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून चांगल्या संख्येने सहभागी होत प्रतिसाद दिला त्याबद्दल कौतुक केले.
सहा गटांमध्ये आयोजित या स्वच्छता स्पर्धेमध्ये एकूण 35 गृहनिर्माण संस्था/वसाहती, 35 हॉटेल्स, 37 महापालिका शाळा, 34 खाजगी शाळा, 16 मार्केट्स, 30 शासकीय कार्यालये आणि 32 रूग्णालये सहभागी झाली होती. यामध्ये गुणांकन करताना प्रामुख्याने निर्मितीच्या ठिकाणीच कचरा वर्गीकरण, कच-यावर कचरा निर्मितीच्या ठिकाणीच प्रक्रिया करणे, शौचालय व्यवस्थापन, स्वच्छता विषयक पायाभूत सुविधा आणि कोव्हीड-19 आजाराचा प्रसार रोखण्याकरीता करण्यात आलेल्या उपाययोजना व नियमांचे पालन अशी विविध निकषांचा विचार करण्यात आला.
या निकषांच्या आधारे गुणांकन करण्यात येऊन आठही विभाग स्तरावर स्वतंत्र 3 पारितोषिके वितरित करण्यात आली तसेच संपूर्ण महापालिका क्षेत्र स्तरासाठी स्वतंत्र 3 पारितोषिके वितरित करण्यात आली.
कोकण रेल विहार, सीवूड्स ही सोसायटी महापालिका स्तरावरील सर्वोत्तम गृहनिर्माण संस्था गटाची प्रथम क्रमांकाची सोसायटी ठरली. सिध्दीविनायक टॉवर सेक्टर 5 कोपरखैरणे हे व्दितीय क्रमांकाचे तसेच निलसिध्दी अटलांटिस सेक्टर 19 ए कोपरखैरणे हे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.
'स्वच्छ हॉटेल' स्पर्धेत सेक्टर 19 डी तुर्भे येथील फॉर्च्युन सिलेक्ट एक्झोटिका हॉटेल सर्वोत्तम स्वच्छ हॉटेल तसेच महापे येथील रामाडा हॉटेल हे व्दितीय आणि सेक्टर 30 ए वाशी येथील हॉटेल फोर पॉईंट हे तृतीय क्रमांक विजेते स्वच्छ हॉटेल म्हणून पुरस्कारप्राप्त ठरले.
'स्वच्छ शाळा (महापालिका स्तर)' गटात राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय शाळा क्र. 55, आंबेडकरनगर, रबाळे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तसेच श्री दत्त विद्यामंदीर शाळा क्र. 116, सेक्टर 5, सानपाडा हे द्वितीय आणि माध्यमिक शाळा क्र. 103, सेक्टर 14, ऐरोली हे तृतीय क्रमांक विजेत ठरले.
'स्वच्छ शाळा (खाजगी)' गटात सेक्टर 8, कोपरखैरणे येथील रा.फ.नाईक विद्यालय यांना प्रथम क्रमांक, सेक्टर 14 वाशी येथील अँकरवाला स्कुल यांना व्दितीय क्रमांक तसेच टिळक इन्टरनॅशनल स्कुल घणसोली यांना तृतीय क्रमांकाची पारितोषिके वितरित करण्यात आली.
'स्वच्छ मार्केट' स्पर्धेत सेक्टर 8 कोपरखैरणे येथील श्रमिक जनता फेरीवाला मार्केट प्रथम क्रमांकाचे विजेते ठरले. सेक्टर 3 ए, बेलापूर येथील राजीव गांधी क्रीडा संकुलाजवळील मार्केट व्दितीय क्रमांकाचे तसेच सेक्टर 17 वाशी येथील महाराजा मार्केट तृतीय क्रमांकाचे विजेते ठरले.
'स्वच्छ रूग्णालय' या गटामध्ये सेक्टर 23 बेलापूर येथील अपोलो हॉस्पिटलने प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकाविला. सेक्टर 4 येथील एमपीसीटी रूग्णालय व्दितीय क्रमांकाचे तसेच सेक्टर 19 येथील साई स्नेहदीप रूग्णालय तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.
'शासकीय कार्यालय' गटामध्ये सेक्टर 15 ए बेलापूर येथील अधिक्षक केंद्रीय सीमाशुल्क निवारक कार्यालय प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. त्याचप्रमाणे सेक्टर 10 ऐरोली येथील सागरी व किनारी जैव विविधता केंद्र व्दितीय क्रमांकाचे आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कार्यालय, सेक्टर 16 ए वाशी हे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक विजेते ठरले.
अशा महापालिका स्तरावरील पारितोषिकांप्रमाणेच बेलापूर ते दिघा या आठही विभाग स्तरावरही प्रत्येक गटामध्ये स्वतंत्र 3 पारितोषिके वितरित करण्यात आली. स्वच्छतेत चांगली कामगिरी करणा-या काही सोसायट्यांना विभागीय स्तरावर उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करून सन्मानीत करण्यात आले.
Published on : 03-10-2021 16:17:18,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update