*मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांचा राजकीय पक्ष प्रतिनिधींशी संवाद*
*मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांचे वतीने दि. 01 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमानंतर प्रसिध्द करण्यात येणा-या विधानसभानिहाय मतदार यादीनुसार नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार असल्याने या कार्यक्रमाच्या कालावधीत नव्याने मतदार यादीत नावे समाविष्ट करणे अथवा वगळणे तसेच मतदार यादीत नाव समाविष्ट आहे याची खात्री करून घेणे याबाबतची माहिती देणे व जनजागृती करण्याकरिता महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची बैठक महापालिका मुख्यालयात विशेष समिती कक्षात आयोजित करण्यात आली होती.*
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, निवडणूक विभागाचे उपआयुक्त श्री. अमरिश पटनिगेरे, 151 बेलापूर विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी श्री. ज्ञानेश्वर खुटवड आणि 150 ऐरोली विधानसभा मतदार संघाचे सहा. मतदार नोंदणी अधिकारी डॉ. शीतल रसाळ तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
*30 नोव्हेंबर पर्यंत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला असून त्या अंतर्गत दि. 1 जानेवारी 2022 पर्यंत वयाची 18 वर्षे पूर्ण करणा-या नागरिकांनी आपल्या नावाची नोंदणी अर्ज नमुना 6 भरून करून घ्यावी तसेच महानगरपालिकेच्या निवडणूकीत मतदार यादीत नाव समाविष्ट नाही म्हणून मतदान करता आले नाही अशी स्थिती उद्भवू नये याकरिता मतदार यादीत आधीपासूनच नाव नोंदीत असलेल्या प्रत्येक मतदाराने आपले नाव मतदार यादीत आहे हे गृहित न धरता आपले नाव असल्याची खातरजमा करून घ्यावी असे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी यावेळी स्पष्ट केले. आपले मतदार यादीत नाव असल्याची खात्री करून घेणे अतिशय सोपे असून www.nvsp.in या पोर्टलवरून अगदी मोबाईलवरही आपले नाव शोधता येऊ शकते असे आयुक्तांनी सांगितले.*
बेलापूर व ऐरोली विधानसभा मतदार नोंदणी अधिकारी यांचेमार्फत दि. 5 जानेवारी 2022 रोजी जी मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल तीच यादी नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी वापरण्यात येणार असल्याने सर्व राजकीय पक्षांनी ही मतदार यादी सुयोग्य व परिपूर्ण होण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आयुक्तांनी केले.
मतदार यादी अद्ययावत करण्याची कार्यवाही दोन्ही विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत सुरू असून राजकीय पक्षांनीही या कामात सहकार्य करण्याच्या भूमिकेतून मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) नेमावेत असे आवाहन करण्यात आले. या प्रतिनिधींना ऐरोली व बेलापूर विधानसभा मतदार नोंदणी कार्यालयामार्फत रितसर ओळखपत्रे दिली जाणार असून ते आपल्या मतदान केंद्र क्षेत्रातील दररोज जास्तीत जास्त 10 अर्ज दाखल करू शकतात अशी माहिती यावेळी देण्यात आली.
*छायाचित्रे नसलेली नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 57 हजार नावे मतदार यादीतून वगळण्यात आलेली असून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट आहे याची खात्री करून घेण्याचे सूचित करण्यात आले. तसेच अर्ज नमुना-6 नुसार मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल, अर्ज नमुना-7 नुसार मतदार यादीतील नावास आक्षेप घेणे किंवा नाव वगळता येईल, अर्ज नमुना-8 नुसार मतदार यादीतील नोंदीच्या तपशीलामध्ये दुरूस्ती करता येईल तसेच अर्ज नमुना -8अ नुसार मतदार यादीतील नोंदीचे स्थानांतर करता येईल असे स्पष्ट करीत मतदार यादीतील कोणतीही दुरूस्ती ही विहित नमुन्यातील अर्ज भरून कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर त्याची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत शहनिशा करूनच केली जाईल असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.*
नमुंमपा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने माहे फेब्रुवारी 2021 मध्ये जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये नावात दुरूस्ती, विशेषत्वाने महिलांच्या बाबत नावात बदल, मतदार यादीतील दुबार नावे वगळणे, बोगस मतदार नावे वगळणे, एका प्रभागात राहणा-या मतदाराचे नाव दुस-या प्रभागाच्या मतदार यादीत असणे, स्थलांतरित असलेल्या मतदारांची नावे वगळणे याबाबत मोठ्या प्रमाणावर हरकती व सूचना प्राप्त झाल्या होत्या. या पूर्वानुभवाचा विचार करून 5 जानेवारी 2022 रोजी दोन्ही विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी यांच्यामार्फत प्रसिध्द होणारी यादीच नवी मुंबई महानगरपालिका निवडणूकीसाठी ग्राह्य धरली जाणार असल्याने 30 नोव्हेंबर पर्यंतच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या कालावधीतच मतदार नावांबाबत नव्याने नोंदणी, वगळणी अशी कार्यवाही करावी असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
यावेळी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींमार्फत उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करीत मतदान यादी परिपूर्ण व सुव्यवस्थित करणे हे आपले सर्वांचे उद्दिष्ट असल्याचे सांगत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सर्व राजकीय पक्षांनी यासाठी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन केले.
Published on : 16-11-2021 15:58:03,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update