*स्वच्छ कविसंमेलनामधून नामांकित कवींनी नवी मुंबईत केला स्वच्छतेचा जागर*
"स्वच्छतेचा सन्मान करे ही निसर्ग सुंदर नवी मुंबई - राज्याचा अभिमान ठरे ही स्वच्छ चकाचक नवी मुंबई" - अशा शब्दात नवी मुंबईचा गौरव करीत कवी अरूण म्हात्रे यांच्यासह कवी श्री.रामदास फुटाणे, श्री. अशोक नायगांवकर, प्रा. अशोक बागवे, श्री. साहेबराव ठाणगे, प्रा. प्रशांत मोरे, श्री. संजय व्दिवेदी व श्रीम. कविता राजपूत यांच्या बहारदार कवितांनी विष्णुदास भावे नाट्यगृहात रंगलेल्या स्वच्छ कविसंमेलनात साहित्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा जागर केला.
'स्वच्छ सर्वेक्षण 2021' मध्ये 10 ते 40 लाख लोकसंख्येच्या मोठ्या शहरांमध्ये देशातील प्रथम क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान नवी मुंबईस प्राप्त झालेला आहे. त्या अनुषंगाने 'स्वच्छ सर्वेक्षण 2022' ला समर्थपणे सामोरे जाताना लोकसहभाग वाढीवर भर देत विविध उपक्रम राबविले जात कवितेच्या माध्यमातून स्वच्छताविषयक जाणीव जागृती व्हावी यादृष्टीने आयोजित 'स्वच्छ कविसंमेलन' उपक्रमाला उत्तम प्रतिसाद लाभला.
साहित्य हे समाजाला दिशा देण्याचे काम करीत असते. त्यामुळे साहित्याच्या माध्यमातून स्वच्छताविषयक जनजागृती करण्याचा नवी मुंबई महानगरपालिकेने राबविलेला स्वच्छ कवीसंमेलनाचा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे मत नवी मुंबईचे पोलीस आयुक्त श्री. बिपिन कुमार सिंह यांनी व्यक्त केले. नवी मुंबई शहराबद्दल इथे येण्यापूर्वीपासून आकर्षण होते असे सांगत त्यांनी स्वच्छ शहर हा नवी मुंबईचा नावलौकीक असून प्रत्येक वर्षी नवी मुंबई नंबर वन राहील असा विश्वास व्यक्त केला.
महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी स्वच्छ कविसंमेलन आयोजनामागील भूमिका विषद करताना स्वच्छतेचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत घेऊन जाण्यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात असताना साहित्य, कला, संस्कृती जपणा-या समाजातील नागरिकांना स्वच्छताविषयक कृतीशील साद घालावी या उद्देशाने स्वच्छ कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.
स्वच्छ कविसंमेलनाचे अध्यक्ष कवी श्री. रामदास फुटाणे यांनी भारतात जे स्थान नवी मुंबई महानगरपालिकेने मिळविले त्यामध्ये महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रयत्नांप्रमाणेच प्रत्येक गोष्ट प्रशासनानेच केली पाहिजे हे न मानणा-या व शहर स्वच्छतेमध्ये स्वत:हून पुढाकार घेणा-या नागरिकांमुळेच हे शक्य झाले असल्याचे सांगत सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. आजच्या स्वच्छ कविसंमेलनाच्या माध्यमातून मनाची स्वच्छता करण्यासाठी आम्ही नवी मुंबईकरांच्या भेटीला आलो आहोत असेही ते म्हणाले.
कवी श्री. अशोक नायगांवकर यांनी आपल्या नर्मविनोदी शैलीत कविता सादर करताना इंदोरला कार्यक्रमानिमित्त गेल्यानंतर आपल्या महाराष्ट्रातही असे शहर असावे असे वाटायचे, ती अपेक्षा नवी मुंबईने पूर्ण केल्याबद्दल महापालिका प्रशासन व नागरिकांचे अभिनंदन केले. नवी मुंबईमध्ये गाजलेल्या कवितांचे दालन असावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कविसंमेलनाचे सूत्रसंचालक तथा कवी श्री. अरूण म्हात्रे यांनी नंबर वन स्वच्छ नवी मुंबईच्या अभियानाला सलाम करण्यासाठी आम्ही आलो असल्याचे सांगत करोना काळात साचलेला काळोख या कविसंमेलनातून दूर होईल असा विश्वास व्यक्त केला. इतर शहरांनीही स्वच्छतेबाबत नवी मुंबईचा आदर्श नजरेसमोर ठेवायला हवा असेही ते म्हणाले.
प्रा. अशोक बागवे यांनी स्वच्छतेला साहित्याची जोड देत एक आगळावेगळा उपक्रम राबविल्याबद्दल कल्पकतेचे कौतुक केले. कवी श्री. साहेबराव ठाणगे व श्री. प्रशांत मोरे यांनी नवी मुंबईकर असल्याचा अभिमान वाटतो असे सांगत गेय कविता सादर करून रसिकांची मने जिंकली. कवी श्री. संजय व्दिवेदी यांनी हिंदीतून कविता सादर करीत स्वच्छताकर्मींच्या सेवाभावी कामाचा गौरव केला तसेच श्रीम. कविता राजपूत यांनी गाऊन हिंदी कविता सादर करीत रसिकांना सुरेल प्रत्यय दिला.
स्वच्छतेच्या या कविसंमेलनात महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर, पोलीस आयुक्त श्री. बिपिन कुमार सिंह, दै. लोकमतचे संपादक श्री. विनायक पाथ्रुडकर, दै.पुढारीचे संपादक श्री. विवेक गिरधारी, लेट्स रिड फाऊंडेशनचे प्रमुख श्री. प्रफुल्ल वानखेडे व इतर रसिकांनी स्वच्छ कविसंमेलनाचा जिंदादील आस्वाद घेतला.
Published on : 20-12-2021 06:01:10,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update