*नमुंमपा पदव्युत्तर पदवी (PG) मेडिकल कॉलेज सुरु करण्याच्या नियोजन कार्यवाहीचा आयुक्तांकडून आढावा*
*नवी मुंबईकर नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी रुग्णालय सक्षमीकरणावर भर दिला आहे. याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेचे स्वत:चे पदव्युत्तर पदवी (PG) मेडिकल कॉलेज सुरु करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. याव्दारे अधिक चांगल्या दर्जाची आरोग्य सुविधा नवी मुंबईकर नागरिकांना उपलब्ध होणार आहे.*
*यासाठी आवश्यक असलेली कार्यवाही करणेबाबत आयोजित विशेष बैठकीमध्ये आयुक्तांनी मे 2023 च्या शैक्षणिक सत्रात मेडिकल कॉलेज सुरु करून त्यामध्ये पदव्युत्तर पदवी (PG) अभ्यासक्रमाची पहिली बॅच सुरु करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्याकरिता आवश्यक असणा-या शासकीय व आरोग्य विषयक परवानग्या प्राप्त करुन घेणे, पायाभूत सुविधा निर्मिती करणे, मनुष्यबळ व उपकऱणे उपलब्धता करून घेणे, हॉस्टेल व ग्रंथालय सुविधा अशा विविध बाबींबाबत कालमर्यादा निश्चित करून काम करावे असे आदेशित केले.*
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे माजी संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, प्रशासन विभागाचे उप आयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, शहर अभियंता श्री. संजय देसाई, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, नगररचनाकार श्री. सोमनाथ केकान व इतर अधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिकेचे मेडिकल कॉलेज सुरू करण्याबाबत अति. आयुक्त श्री. संजय काकडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने सविस्तर प्रकल्प अहवाल आयुक्तांकडे सादर केला होता. त्या अहवालाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत नमुंमपाचे नियोजित पदव्युत्तर पदविका (PG) मेडिकल कॉलेज सुरु करण्याबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात मेडिसीन, सर्जरी, ऑर्थोपेडिक, गायनॅकोलॉजी व पिडीयाट्रीक शाखा सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले व पुढील काळात टप्प्याटप्प्याने 3 भागांमध्ये इतर शाखा सुरु कऱण्याबाबत सविस्तर विचारविनियम करण्यात आला. यामध्ये हॉस्टेल करिता स्वतंत्र जागा शोधून त्याठिकाणी व्यवस्था करण्याचे सूचित करण्यात आले.
पदव्युत्तर पदविका (PG) मेडिकल कॉलेज सुरु करण्याच्या दृष्टीने आवश्यक मनुष्यबळ उपलब्धता व साधन सामुग्री, उपकरण व्यवस्था याकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे ठरविण्यात आले. त्यासोबतच मेडिकल कॉलेज सुरु करण्यासाठी आवश्यक परवानगी प्राप्त करून घेण्याची कार्यवाही समांतरपणे सुरु करण्याचे निश्चित करण्यात आले. मेडिकल कॉलेज सुरु करण्यासाठी परवानगी प्रक्रिया व प्रत्येक बाबीच्या पूर्ततेसाठीचा कालावधी निश्चित करण्यात आला तसेच सुरू असलेल्या कार्यवाहीबाबत नियमितपणे आढावा बैठका घेऊन कामाची पूर्तता विहित वेळेत होत असल्याबाबत खात्री करून घेण्याचे निर्देश आयुक्तांनी आरोग्य विभागास दिले.
निश्चित केलेल्या कालावधीत मेडिकल कॉलेजबाबतचे ठरविलेले काम पूर्ण करण्याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे असे सूचित करतानाच आयुक्तांनी पहिल्या टप्प्यात वाशी व ऐरोली रुग्णालयांपासून मेडिकल कॉलेज सुविधा कार्यान्वित करावी असे निर्देशित केले.
*नवी मुंबई महानगरपालिकेकडे अतिशय उत्तम स्वरुपाच्या रुग्णालय वास्तू असून कोव्हीडच्या काळात वैद्यकीय सेवेच्या सक्षमीकरणाची गरज प्राधान्याने लक्षात आली. त्या अनुषंगाने तत्पर कार्यवाही करत आपत्तीसाठी तयारी असावी यादृष्टीने पदव्युत्तर पदवी (PG) अभ्यासक्रम असेलले मेडिकल कॉलेज सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांची कुमक नवी मुंबई महानगरपालिकेस उपलब्ध होणार असून याचा उपयोग नागरिकांना तत्पर व दर्जात्मक सेवा पुरविण्यासाठी होणार आहे. त्या अनुषंगाने हे मेडिकल कॉलेज कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया नियोजन केल्याप्रमाणे विहित कालावधीत तत्परतेने पूर्ण करावी असे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी निर्देश दिले आहेत.*
Published on : 22-12-2021 13:24:50,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update