*रेस्टॉरंटकडून व लग्न समारंभात कोव्हीड नियमांचे उल्लंघन झाल्याने 1 लक्ष 50 हजारांची दंड वसूली*

*31 डिसेंबर व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सध्याचा ओमायक्रॉनचा धोका आणि कोव्हीड बाधीतांची वाढती संख्या लक्षात घेऊन नववर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करावे असे आवाहन नागरिकांना करतानाच महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन योग्य प्रकारे होत असल्याबाबत सतर्क राहण्याचे आदेश सर्व विभागांच्या सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांना दिलेले आहेत.*
त्यानुसार विभाग कार्यालय स्तरावरील दक्षता पथके अधिक कृतीशील झाली असून त्याबरोबरीनेच मुख्यालय स्तरावरील विशेष दक्षता पथकेही कोव्हीड नियमांचे पालन होत आहे अथवा नाही याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्याचप्रमाणे ज्याठिकाणी कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमावलीचे उल्लंघन होताना आढळते तेथे दक्षता पथकांमार्फत दंडात्मक कारवाई केली जात आहे.
अशाप्रकारे *मुख्यालय स्तरावरील विशेष दक्षता पथकांनी लग्न समारंभ, बार व रेस्टॉरंट अशा 3 ठिकाणी कारवाई करीत कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमाच्या उल्लंघनापोटी प्रत्येकी रु. 50 हजार प्रमाणे एकूण रु. 1 लक्ष 50 हजार इतका दंड वसूल केला आहे.*
यामध्ये सेक्टर 4 कोपरखरैणे येथील आदर्श बार रात्री 12 नंतरही सुरु असल्याचे आढळल्याने कारवाई करीत रु. 50 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल केलेली आहे.
त्याचप्रमाणे सेक्टर 10, सीबीडी बेलापूर येथील द पार्क हॉटेलमधील लग्न समारंभाठिकाणी सभागृहाच्या क्षमतेच्या 50 टक्केपेक्षा अधिक लोकांची उपस्थिती आढळल्याने रु. 50 हजार दंड वसूल केलेला आहे.
तसेच सेक्टर 18 तुर्भे येथील हॉटेल भगत ताराचंद याठिकाणी क्षमतेच्या 50 टक्केपेक्षा अधिक ग्राहक आढळल्याने रु. 50 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल केलेली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत नागरिकांनी कोव्हीड नियमांचे पालन करावे व कोव्हीड प्रसाराचे कारण बनू नये याकरिता विविध माध्यमांतून आवाहन केले जात असून शासन नियमावलीचे उल्लंघन करून बेजबाबदारपणे सामाजिक आरोग्याला धोका पोहचविणा-या नागरिक व आस्थापनांवर दंडाचा बडगा उगारला जात आहे.
नियमावलीचा भंग केल्यामुळे दंडाची रक्कम वसूल करणे हे महानगरपालिकेचे उद्दिष्ट नसून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे व कोव्हीडचा प्रसार रोखणे हे ध्येय असल्याचे स्पष्ट करीत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमावलीस अनुसरून आपले वर्तन ठेवावे व दुस-या डोसची विहित वेळ आल्यानंतर त्वरित लसीकऱण करून घ्यावे तसेच लसीकरण झाले असले तरी मास्कचा वापर नियमितपणे करावा असे आवाहन केले आहे
Published on : 29-12-2021 12:29:39,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update