*कोव्हीडच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सोसायट्यांकरिता सुधारित नियमावली जाहीर*
मागील आठवड्याभरापासून कोव्हीड रूग्णसंख्येत होत असलेली मोठ्या प्रमाणावर वाढ तसेच ओमायक्रॉन व्हॅरियंटचा वाढता धोका लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अमलबजावणी अधिक प्रभावी रितीने राबविण्यास सुरूवात केली आहे. या अनुषंगाने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी नवी मुंबई कोव्हीड टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टरांशी तातडीने संवाद साधत कोरोनाची साखळी खंडीत करण्याच्या दृष्टीने उपाययोजनांविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे.
कोव्हीड प्रतिबंधाच्या दृष्टीने शासनाने विलगीकरणाबाबत व प्रतिबंधाबाबत जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचना तसेच नवी मुंबई कोव्हीड टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टरांशी झालेली चर्चा या अनुषंगाने कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी यापूर्वी जारी केलेल्या आदेशामध्ये सुधारणा करून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सहकारी गृहनिर्माण संस्थांकरिता मार्गदर्शक सूचना व निर्बंधांबाबत सुधारित आदेश जारी केलेला आहे. यामध्ये -
(१) कोणत्याही सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या एका इमारतीमध्ये एकूण 25 किंवा त्यापेक्षा कमी रुग्ण आहेत अशा इमारतीच्या एखाद्या मजल्यावर (Floor) केवळ एकाच सदनिकेमध्ये (Flat) पॉझिटिव्ह रुग्ण आहेत अशा ठिकाणी केवळ त्या मजल्यावरील संबंधित सदनिका (Flat) सील करण्यात येईल. तथापि कोणत्याही इमारतीच्या एकाच मजल्यावर एकापेक्षा अधिक सदनिकेमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यास अशा प्रकरणी त्या इमारतीचा संबंधित मजला संपूर्ण सील करण्यात येईल. (२) ज्या गृहनिर्माण संस्थेच्या एका इमारतीमध्ये 26 किंवा त्यापेक्षा अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यास ती संपूर्ण इमारत सील करण्यात येईल.(३) ज्या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या परिसरामध्ये एकापेक्षा जास्त इमारती असतील अशा गृहनिर्माण संस्थेबाबत (Housing Complex) वरील नमूद (१) व (२) नुसार कार्यवाही केली जाईल. अशा प्रकरणी देखील केवळ बाधित असलेल्या इमारतीचे प्रवेशव्दार सील केले जाईल. मुख्य प्रवेशव्दार सील केले जाणार नाही. (४) कोणत्याही सहकारी गृहनिर्माण संस्थेची इमारत किंवा मजला (Floor) किंवा सदनिका (Flat) सील करताना त्या इमारतीमधील सर्वात शेवटी कोविड पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाचे, ज्या दिवशी कोविड चाचणीकरीता स्वॅब घेण्यात आलेले आहे, त्या दिवसापासून गणना करुन पुढील सात दिवसापर्यंत सदर इमारत किंवा मजला (Floor) किंवा सदनिका (Flat) सील करण्यात येईल. सात दिवसाचा विलगीकरण कालावधी संपुष्टात आल्यानंतर सदर इमारत खुली करण्यात येईल. (५) जर एखादया गृहनिर्माण संस्थेने उक्त नमूद निर्देशांचा भंग केल्यास पहिल्या वेळेस रक्कम रु. 10 हजार दंड करणेत येईल व दुसऱ्या वेळेस रक्कम रु. 25 हजार आणि तिसऱ्या वेळेपासून पुढे प्रत्येक वेळी रु. 50 हजार इतका दंड आकारण्यात येईल. (६) घरगुती काम करणारे कर्मचारी (Maids), सुरक्षा रक्षक यांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले असल्यास त्यांना पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या सदनिका, मजला व इमारत सोडून इतरत्र प्रवेश देता येईल. - अशाप्रकारे आदेश जाहीर करण्यात आलेले असून या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती / संघटना / संस्था यांचेवर साथरोग अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 51 ते 60 अन्वये तसेच, भारतीय दंड संहिता यामधील कलम 188 अन्वये कारवाई केली जाईल असे स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे. तरी नवी मुंबईकर नागरिकांनी या आदेशांचे काटेकोर पालन करावे व कोव्हीडच्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे. त्याचप्रमाणे मास्क हीच कोव्हीडपासून बचावाची भक्कम ढाल आहे हे लक्षात घेऊन मास्कचा वापर ही आपली नियमित सवय बनवावी तसेच लक्षणे जाणवल्यास त्वरित टेस्ट करून घ्यावी. त्याचप्रमाणे कोव्हीड लसीकरण विहित वेळेत त्वरित करून घ्यावे आणि लस संरक्षित व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.
Published on : 09-01-2022 14:52:46,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update