*पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश*
.jpeg)
*महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने 12 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक ( इयत्ता पाचवी ) व पूर्व माध्यमिक ( इयत्ता आठवी ) शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील इयत्ता 5 वी च्या 34 तसेच इयत्ता 8 वी च्या 15 अशा एकूण 49 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत झळकत नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील शैक्षणिक गुणवत्तेचा झेंडा फडकत ठेवला आहे. महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन कौतुक केले आहे.*
इयत्ता 5 वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील 663 तसेच इयत्ता 8 वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत 617 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी इयत्ता पाचवीचे 34 तसेच इयत्ता आठवीचे 15 असे एकूण 49 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका शाळांतून इयत्ता पाचवीची स्कॉलरशीप मिळविणा-या विद्यार्थ्यांमधील प्रथम 3 क्रमांकाचे विद्यार्थी नमुंमपा शाळा क्र. 42 घणसोली येथील असून विद्या शशिकांत रामगिरे (258 गुण), प्राजक्ता दीपक घोरपडे (254 गुण) व वैदेही प्रदीप नवले (254 गुण) तसेच दिप्ती कैलास पाटील (250 गुण) हे विद्यार्थी गुणानुक्रमे प्रथम तीन क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत.
अशाच प्रकारे इयत्ता आठवीची स्कॉलरशीप मिळविणा-या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम तीन क्रमांक नमुंमपा शाळा क्र. 42 घणसोली याच शाळेचे असून गणेश रामदास मोरे (210 गुण), सुमीत मोहन तायडे (198 गुण) व सोनल शैलेंद्र खेडकर (192) या तीन विद्यार्थ्यांनी गुणानुक्रमे पटकाविला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये नमुंमपा शाळा क्र. 42 घणसोली येथील 14 विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवीची तसेच 8 विद्यार्थ्यांनी इयत्ता आठवीची शिष्यवृत्ती संपादन केलेली आहे. तसेच नमुंमपा शाळा क्र. 55, कातकरीपाडा या शाळेतील इयत्ता पाचवीच्या 10 तसेच इयत्ता आठवीच्या 4 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे यश मिळविले आहे.
त्याचप्रमाणे, शाळा क्र. 91 दिवा (3 विद्यार्थी), शाळा क्र. 33 पावणे (2 विद्यार्थी), शाळा क्र. 31 कोपरखैरणे (2 विद्यार्थी), शाळा क्र. 1 बेलापूर (2 विद्यार्थी), शाळा क्र. 49 ऐरोली ( 1 विद्यार्थी) अशा एकूण 34 विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवीची शिष्यवृत्ती प्राप्त केलेली आहे.
याशिवाय शाळा क्र. 31 कोपरखैरणे ( 1 विद्यार्थी), शाळा क्र. 77 यादवनगर (1 विद्यार्थी), शाळा क्र. 78 गौतमनगर ( 1 विद्यार्थी) अशा एकूण 15 विद्यार्थ्यांनी इयत्ता आठवीची शिष्यवृत्ती प्राप्त केलेली आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य करताना विद्यार्थीदशेपासूनच स्पर्धा परीक्षांना अभ्यासूपणे सामोरे जाण्यासाठी मानसिक तयारी व्हावी याकडे महापालिका शाळांतून विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यादृष्टीने त्यांची तयारी करून घेतली जात आहे. इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठीही तशाच प्रकारे विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यात आली होती.
त्यादृष्टीने विद्यार्थ्यांना पूरक अभ्यास साहित्य व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यांच्या शिक्षकांचेही नियमित मार्गदर्शन लाभत होते. या सा-याचा परिपाक म्हणजे महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांचे हे शिष्यवृत्ती परीक्षेतील भरीव यश असून या यशाबद्दल विद्यार्थ्याचे अभिनंदन करतानाच आयुक्त श्री. अभिजीत बांगर यानी त्यांना मार्गदर्शन करणा-या शिक्षकांच्या कामाचीही प्रशंसा केली आहे.
Published on : 11-01-2022 10:48:58,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update