*राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निबंध, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा*
25 जानेवारी या 'राष्ट्रीय मतदार दिन' निमित नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक विभागाच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये शिक्षण विभागाच्या माध्यमातून इयत्ता 8 वी ते 10 वी च्या विदयार्थ्यांकरिता निबंध, वक्तृत्व, चित्रकला अशा तीन स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
यामध्ये निबंध स्पर्धेकरिता 1 हजार शब्दांची मर्यादा असून स्पर्धक - (1) मी मताधिकार बजाविणार कारण..., (2) सोहळा लोकशाहीचा जागर मताधिकाराचा, (3) मी नव्या युगाचा / युगाची मतदार, (4) मी माझे मत विकणार नाही, (5) मताधिकाराची सक्ती करावी का, (6) हक्क वंचितांचे मार्ग मताधिकाराचा, (7) शहरी मतदारांची अनास्था – कारणे आणि उपाय, (8) एका बोटावरच्या शाईची किंमत या 8 विषयांपैकी एका विषयावर आपले निबंध सादर करु शकतात.
अशा प्रकारे वक्तृत्व स्पर्धेसाठी -(1) सक्षम लोकशाहीची पहिली पायरी – मतदार नोंदणी…, (2) वर्ग प्रमुख पदाची निवडणूक मी कशी लढवणार, (3) माझा नगरसेवक / सरपंच असा हवा, (4) मी नगरसेवक / सरपंच झालो / झाले तर, (5) मी आमदार झालो / झाले तर, (6) माझा आमदार असा हवा, (7) मी खासदार झालो तर / झाले तर, (8) माझा खासदार असा हवा, (9) एका बोटावरच्या शाईची किंमत, (10) मी मताधिकार बजावणार कारण, (11) अठराव्या वर्षाची जबाबदारी - या 11 पैकी एका विषयावर स्पर्धकाने 3 ते 4 मिनीटांचा व्हिडिओ बनवून सादर करावयाचा आहे.
चित्रकला स्पर्धेसाठी ए फोर आकाराच्या कागदावर - (1) 18 वर्ष पूर्ण झालेल्यांना मतदार नोंदणी करण्याचे आवाहन, (2) स्त्रियांना मतदार नोंदणीचे आवाहन, (3) दिव्यांगांच्या मताधिकाराचे महत्व, (4) तृतीय पंथियांच्या मताधिकाराचे महत्व आणि आवाहन - या 4 विषयांपैकी एका विषयांवर चित्र काढून सादर करावयाचे आहे.
या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त विदयार्थ्यांनी सहभागी व्हावे यादृष्टीने शाळा व्यवस्थापनांनी त्यांना प्रोत्साहित करावे असे आवाहन शिक्षण विभागामार्फत पत्राव्दारे सर्व शाळांना करण्यात आले असून शाळांनी विदयार्थ्यांकडून जमा केलेले निबंध, चित्र तसेच वक्तृत्व स्पर्धेचा व्हिडिओ शुक्रवार दिनांक 21 जानेवारी 2022 पर्यंत nmmceducom2022@gmail.com या ई मेल आयडीवर सादर करण्याचे सूचित करण्यात आले आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांक रु. 5 हजार, व्दित्तीय क्रमांक रु. 4 हजार व तृत्तीय क्रमांक रु. 3 हजार आणि 1 हजार रुपयांची उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.
तरी मतदान विषयक जनजागृती करणा-या उपक्रमात मोठया संख्यने सहभाग घ्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 18-01-2022 14:09:33,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update