*नवी मुंबई महानगरपालिकेत मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात उधळले गझलरंग*
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विशेषत्वाने महापालिका अधिकारी, कर्मचारी यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे. या उपक्रमांमधील पहिले पुष्प मराठी गझलला समर्पित करीत महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी, गझलकार डॉ. कैलास गायकवाड यांच्यासह श्री. गोविंद नाईक आणि श्री. रवी वाडकर या नामांकित गझलकारांनी गुंफले.
दोन ओळीत विविध विषयांचे मर्म मांडणारा गझलचा प्रत्येक शेर म्हणजे एक स्वतंत्र कविता असते असे सांगत डॉ. कैलास गायकवाड यांनी "जी वीजेचा लोळ नाही, ती गझलची ओळ नाही" अशी दमदार सुरुवात करीत "कुणी दूध वा साय निवडतो, मी तिसरा पर्याय निवडतो, निवड करा तुमचीच तुम्ही पण, बघू नका मी काय निवडतो" अशा गझलांनी मैफल सजवली.
चित्रांकीत गझलकार श्री. गोविंद नाईक यांनी कोव्हीड काळातील डॉक्टर्स व इतर आरोग्यकर्मींना गझलेतून अभिवादन करीत "कुणाच्याही कधी नजरेत आलेले तुम्ही नसता, तुम्ही असता जगासाठी स्वत:साठी नसता, तुम्हालाही स्वत:चीही आपली असतील दु:खे पण, चुकूनसुध्दा कधी तुमच्या ओठांतून नसता, तुम्हा आहात यासाठीच आहे देव पृथ्वीवर, तुम्ही नसता तर इथे हा माणूसही नसता" अशा शब्दात जिंदादील सलाम केला. गझलकाराचे दोन ओळीत आभाळाएवढा आशय व्यक्त करण्याचे सामर्थ्य चितारताना, "दोन ओळींचे मरण येवो मला, शेवटी कादंबरी होऊ नये" अशी भावना व्यक्त केली.
गझलकार, नाट्यकर्मी श्री. रवी वाडकर यांनी कोरोनाच्या काळात नवी मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेऊन गझलरंग सारखा मानसिक दिलासा देणारा उपक्रम आयोजन केल्याबद्दल अभिनंदन करीत, "कोरोनाची लागली सगळ्यांना झळ आहे, तरीही आमची इथे मराठी गझल आहे, माणूस थिजलाय असे वाटते आपल्याला, पण अंत:करणात जगण्याचे बळ आहे" असे साहित्याचे मनावरले दडपण दूर कऱणारे महत्व विषद केले. "हवा वाहताना सखे काळजी घे, पदर उडताना सखे काळजी घे" अशी प्रेममयी गझलही त्यांनी गाऊन सादर केली.
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी मातृभाषा हा माणसाच्या विकासाचा व जिव्हाळ्याचा भाग असतो म्हणूनच नवी मुंबई महानगरपालिकेने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त अधिकारी, कर्मचारी यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणा-या विविध उपक्रमांचे आयोजन केले असल्याचे सांगितले.
प्रशासन व समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार यांनी मराठी भाषा जतन व संवर्धन करण्याच्या भूमिकेतून विविध उपक्रमांचे आयोजन कऱण्यात आल्याचे सांगत यामधून कोव्हीड काळात अधिकारी, कर्मचारी यांना साहित्याच्या माध्यमातून मानसिक दिलासा मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करीत मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात संपन्न झालेल्या या उपक्रमाप्रसंगी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांच्याप्रमाणेच फेसबुक लाईव्ह वरून गझल रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
Published on : 25-01-2022 08:06:40,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update