*लोकसहभागावर भर देत संपूर्ण क्षमतेने झोकून देऊ काम करण्याचे आयुक्तांनी दिले स्वच्छता लक्ष्य*
स्वच्छ सर्वेक्षणामधील मानांकन हे आपण करीत असलेले काम कसे आहे हे तपासण्याचे एक साधन असून सर्वेक्षणातील आत्तापर्यंतची नवी मुंबई महानगरपालिकेची स्वच्छता विषयक कामगिरी ही अभिमान वाटावा अशीच आहे. मात्र स्वच्छता ही निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याने आपण केलेल्या कामगिरीवर संतुष्ट न राहता यापुढील काळात सर्वेक्षणातील तिस-या व अतिशय महत्वाच्या टप्प्यावर कामात सातत्य राखत आपल्यामध्ये असलेल्या फार मोठ्या क्षमतेला आव्हान देऊन काम करावे असे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी अधिकारी, कर्मचारीवृंदाला सूचित केले. त्याचप्रमाणे हे माझे शहर आहे आणि ते अस्वच्छ होणार नाही याची मी दक्षता घेईन असे नवी मुंबईकर नागरिक मनाशी ठामपणे ठरवतील तेव्हा 100 टक्के लोकसहभागातून शहर स्वच्छतेमधील आणखी वरचे स्थान आपण गाठू शकू व टिकवू शकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महापालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर मध्ये आयोजित 'लक्ष्य स्वच्छतेचे' या उपक्रमाप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे तसेच विभागप्रमुख, विभाग अधिकारी आणि इतर अधिकारी उपस्थित होते. महानगरपालिकेच्या फेसबुक पेजवरून अनेक नागरिकांनीही या कार्यक्रमात ऑनलाईन सहभाग घेतला.
प्रत्यक्षात 2 ऑक्टोबरपासून स्वच्छ सर्वेक्षण 2022 ला सुरूवात झाली असली तरी आपण 15 ऑगस्टपासूनच अभियानाला सुरूवात केलेली असून यापुढील तिस-या टप्प्यातील 2 ते 3 महिन्यांचा काळ हा स्वच्छता कार्याला अधिक गतीमानता देण्याचा कालावधी असल्याचे आयुक्तांनी सांगितले. प्रत्येक वर्षी सर्वेक्षणाच्या टूल किटमध्ये नवनव्या कठीण बाबींचा समावेश होत असून त्यादृष्टीने अधिक सतर्कता राखत झपाटून जाऊन काम करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
स्वयंसेवी संस्थांमार्फत खाडीकिनारी खारफुटी भागात नियमितपणे राबविल्या जात असलेल्या स्वच्छता मोहीमा, प्लॉग रन, झिरो वेस्ट स्लम, रस्ते दत्तक योजना, एच अँड एम ब्रॅंडची जुने कपडे देऊन नवीन कपडे खरेदीत सवलतीची योजना असे शहरभर विविध उपक्रम राबवित जात असल्याचा विशेष उल्लेख करीत आयुक्तांनी या उपक्रमांची व्याप्ती वाढविणे व त्यामध्ये लोकसहभाग वाढीवर भर देण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले.
परदेशात गेल्यानंतर तेथील स्वच्छतेप्रमाणेच सुंदरतेनेही आपण प्रभावित होत असल्याचा उल्लेख करीत सुशोभिकरणाच्या नवनव्या संकल्पना राबवून यावर्षी शहराचे रूपच बदलून टाकणा-या कलावंतांचे आयुक्तांनी विशेष कौतुक केले. काही भित्तीचित्रे तर घरी फोटोफ्रेम करून लावावीत, स्क्रीन सेव्हर ठेवावीत इतकी दर्जेदार असल्याचे सांगत अशा सुशोभित कामांमुळे परिसर सुंदर दिसतो तसेच शहराविषयी आपोआप सकारात्मक भावना तयार होते असे ते म्हणाले. इतर शहरातील सुशोभिकरण कामे आणि आपल्या शहरातील कामे यांची पाहणी करावी मग नवी मुंबईतील कामाची गुणवत्ता व वेगळेपणा लक्षात येईल असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी आयुक्त महोदयांच्या शुभहस्ते विविध विभागात सुशोभिकरण कामे करणा-या जे.जे.स्कुल ऑफ आर्ट्स, रचना संसद स्कुल ऑफ आर्ट्स, विकासिनी स्कुल ऑफ आर्ट्स, ठाणे स्कुल ऑफ आर्ट्स, जे.के. आर्ट कॉ़लेज, मुद्रा कला निकेतन, पुणे एमआयटी अशा कला महाविद्यालयातील विद्यार्थी चित्रकारांप्रमाणेच इतर चित्रकारांचाही सन्मान करण्यात आला.
यावर्षी सुशोभिकरण करताना सायन पनवेल महामार्ग तसेच रेल्वेने प्रवास करणा-या प्रवाशांसाठी रेल्वे मार्गांच्या दोन्ही बाजूस भित्तीचित्रे रंगकाम याव्दारे शहराचे रूप बदलण्याकडे विशेष लक्ष दिले जात असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. त्यासोबतच 'फ्लेमिंगो सिटी' ही नवी मुंबईची पर्यटनाला पूरक ओळख दृढ होण्याच्या दृष्टीने तशा प्रकारे सुशोभिकरणावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठीतील नामवंत कवींच्या प्रसिध्द कवितांच्या ओळी शहरात मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित करण्यात येत असल्याचे सांगत या माध्यमातून वाचन संस्कृतीवर भर दिला जात आहे. तसेच नवी मुंबईतील मूळ आगरी कोळी संस्कृतीचे दर्शन घडविणारे चित्र कलाविष्कारही प्रत्येक प्रभागात असतील याकडे विशेष लक्ष दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
लवकरच बायो सीएनजी प्रकल्प कार्यान्वित करून त्या गॅसचा उपयोग एनएमएमटी बसेस चालविण्यासाठी केला जाईल तसेच ग्रीन वेस्टवर प्रक्रिया करून ब्रिकेट प्रकल्पही लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
स्वच्छतेमधील विविध पारितोषिके, मानांकने महानगरपालिकेस प्राप्त होत असताना त्यामध्ये महत्वाचे योगदान असणा-या सफाईमित्रांचा यापूर्वीही प्रत्येक कार्यक्रमात कृतज्ञ भावनेने प्राधान्याने गौरव केला जात असून याही कार्यक्रमात महानगरपालिकेच्या विविध मलप्रक्रिया केंद्रांत काम करणारे सफाईमित्र श्रीम. चित्रा वाकळे (बेलापूर), श्रीम. रेखा चिंदालिया (नेरूळ), श्री.नबीजुल शेख (सानपाडा), श्री.दशरथ सर्डेकर (वाशी), श्री.अनिल पाटील (कोपरखैरणे), श्री.सुभाष पाटील (घणसोली), श्री. दिपक भगानिया (दिघा) यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
प्रभागात निर्माण होणा-या ओल्या कच-याची विल्हेवाट प्रभागाच्या क्षेत्रातच लावणारा व घनकचरा व्यवस्थापनातील सर्व निकष पूर्ण करणारा नवी मुंबईतील पहिला 'आत्मनिर्भर प्रभाग (वॉर्ड)' म्हणून वाशी विभागातील प्र.क्र.63 घोषित करण्यात आला असून वाशी विभाग अधिकारी श्री.सुखदेव येडवे व त्यांच्या सहका-यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
'स्वच्छ सर्वेक्षण 2022' अंतर्गत विभागांमध्ये स्वच्छताविषयक निकोप स्पर्धात्मक वातावरण निर्माण व्हावे व त्यामधून शहर स्वच्छतेला गती लाभावी या हेतूने सुरू करण्यात आलेल्या 'स्वच्छ वॉर्ड चॅलेंज' मध्ये पहिल्या तिमाहीच्या सत्रात बेलापूर, वाशी व कोपरखैरणे या तीन विभागांचा गुणानुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाने सन्मान करण्यात आला
सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज लोन मेळा अंतर्गत प्राप्त अनुदानरूपी सवलत व अत्यल्प दरातील कर्ज यामधून घेण्यात आलेल्या अत्याधुनिक सिव्हेज क्लिनींग व्हेईकलची चावी यावेळी आयुक्तांच्या शुभहस्ते लाभार्थ्यांस प्रदान करण्यात आली.
याप्रसंगी आरंभ क्रिएशनच्या कलावंतांनी सादर केलेल्या "लखलख लखलख लखलख लखा, सहभागी व्हा ना तुम्ही तुम्ही सहभागी व्हा ना, नागरिक राजे तुम्हा सहभागी व्हा ना, नवी मुंबईने निश्चय केला, स्वच्छतेत आणू नंबर पहिला" अशा लोकगीत स्वरुपातील बहारदार रितीने सादर झालेल्या पथनाट्यास आयुक्तांसह सर्व उपस्थितांनी कौतुकाची दाद दिली.
Published on : 27-01-2022 12:01:20,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update