*प्रजासत्ताक दिनी मॉलमध्ये फ्लॅश मॉब मधून स्वच्छता संदेशासह देशभक्तीची लहर*
"स्वच्छ सर्वेक्षण 2022" ला सामोरे जाताना लोकसहभागावर विशेष भर दिला जात असून स्वच्छता कार्यात नागरिकांना प्राधान्य हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. अशाच प्रकारचा 'फ्लॅश मॉब' सारखा अभिनव उपक्रम महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून 26 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता वाशी येथील इनॉर्बिट मॉलमध्ये तसेच सायंकाळी 7 वाजता सिवूड नेरुळ येथील ग्रॅंड सेंट्रल मॉलमध्ये नागरिकांच्या उत्साही प्रतिसादात राबविण्यात आला.
प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीची संध्याकाळ. एकत्रित मॉलमध्ये जाऊन खरेदी करण्याचा आनंद घेणारी कुटुंबे. सर्वजण आपापल्या खरेदी कामात दंग. आणि अशावेळी चोहोदिशांनी वाद्ये वाजू लागतात. मॉलच्या तळमजल्यावर चारही कोप-यांतून पायाला ठेका धरायला लावणा-या गाण्याच्या तालावर उत्साही युवक - युवती नाचत मध्यभागी जमतात आणि मग 8 ते 10 मिनिटे विविध गाण्यांवर नृत्याचा अविष्कार साकारतात. मॉलमधील नागरिकांना अचानक काय झाले हे सुरुवातीला कळतच नाही. मग एक एक करून माणसे आवाजाच्या दिशेने जमायला लागतात. केवळ तळमजल्यावरच नाही तर मॉलमधल्या प्रत्येक मजल्यावरच्या गॅलरीत लोक जमू लागतात आणि फ्लॅश मॉबमधील गीत नृत्याच्या अविष्काराला अधिक रंग चढतो.
विविध गीतांच्या तालावर युवक, युवती नृत्य साकारत असतात. त्यामधून देशभक्तीचा प्रसार होतोच याशिवाय 'निश्चय केला, नंबर पहिला' हे महानगरपालिकेचे स्वच्छ सर्वेक्षण मधील ध्येयदेखील नृत्याव्दारे सादर केले जाते. नवी मुंबईची 'फ्लेमिंगो सिटी' ही ओळख दृढ करण्यासाठी फ्लेमिंगोची प्रतिकृती नृत्य करत करतच या अविष्कारामध्ये सहभागी होते. सर्व लोक मॉलच्या वेगवेगळ्या मजल्यांवरून तळमजल्यावर चालणारी नृत्य कलाकृती बघत असतात. यामध्ये देशभक्तीपर गाण्यांप्रमाणेच स्वच्छता विषयक जनजागृती करणा-या विविध गाण्यांचाही समावेश असतो. आणि शेवटी 'भारत माता की जय' या ना-यासोबतच 'निश्चय केला, नंबर पहिला' या घोषवाक्याचा गजरही कलावंतांसमवेत उपस्थित नागरिक करतात.
'फ्लॅश मॉब' सारख्या अभिनव संकल्पनेचा उपयोग स्वच्छतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी अतिशय प्रभावी रितीने नवी मुंबई महानगरपालिका करीत असून अचानक साकारणा-या 'फ्लॅश मॉब'सारख्या उपक्रमामुळे नागरिकही प्रभावीत झाल्याचे चित्र या दोन्ही ठिकाणी दिसून आले. हा उपक्रम अतिशय आवडल्याच्या प्रतिक्रियाही विविध वयोगटातील नागरिकांनी व्यक्त केल्या.
Published on : 31-01-2022 10:47:46,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update