*नवी मुंबईला आकर्षक रंगात सजविणा-या कला महाविद्यालयातील विद्यार्थी व मुक्त चित्रकारांचा विशेष सन्मान*
स्वच्छ सर्वेक्षण 2022 ला सामोरे जाताना स्वच्छतेप्रमाणेच शहर सुशोभिकरणावर भर देत नवी मुंबई शहराला नवी झळाळी प्राप्त करून दिली जात असून आकर्षक चित्रभिंती, चौकांमधील लक्षवेधी शिल्पाकृती, विविध रंगांनी नटलेले उड्डाणपूल व अंडरपास तसेच नयनरम्य कारंजी, आकर्षक रोषणाईने सजलेले विद्युत खांब व सिग्नल्स यांनी नवी मुंबईचे रुप अधिकच खुलले असल्याचे अभिप्राय नवी मुंबईकर नागरिकांप्रमाणेच नवी मुंबईला भेटी देणा-या प्रवाशांकडूनही प्राप्त होताना दिसत आहेत.
*"स्वच्छ तर आम्ही आहोतच, सुंदर बनण्याचा प्रयत्न करतोय" असे म्हणत सुशोभित शहराला नवा आयाम देण्याचा प्रयत्न महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. दिघ्यापासून बेलापूर पर्यंत संपूर्ण महापालिका क्षेत्रात शहर सुशोभिकरणाच्या कामाने गती घेतली असून रंगीबेरंगी चित्रांनी नटलेले हे शहर वेगळेच वाटत असल्याचे नागरिक कौतुकाने सांगत आहेत.*
*यामध्ये चित्रकार कलावंतांचा सिंहाचा वाटा असून काही भित्तीचित्रे तर घरी फोटोफ्रेम करून लावावीत तसेच स्क्रीन सेव्हर ठेवावीत इतकी दर्जेदार आहेत. या कलावंतांच्या उल्लेखनीय कामाची नोंद घेत त्यांच्या कलेचा यथोचित सन्मान व्हावा ही भूमिका जपत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी प्रजासत्ताक दिनाच्या 'लक्ष्य स्वच्छतेचे' या कार्यक्रमाप्रसंगी 26 जानेवारी रोजी या चित्रकार कलावंतांचा विशेष सन्मान केला.*
*परदेशात गेल्यानंतर तेथील स्वच्छतेप्रमाणेच सुंदरतेनेही आपण प्रभावित होतो असे सांगत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सुशोभिकरणाच्या नवनव्या संकल्पना राबवून यावर्षी शहराचे रूपच बदलून टाकणा-या कलावंतांचे मुक्तकंठाने कौतुक केले. अशाप्रकारे सुशोभिकरणाव्दारे शहर सुंदर दिसते तसेच शहराविषयीच्या अभिमानात व प्रेमात वाढ होते आणि शहर अस्वच्छतेला आपोआप प्रतिबंध बसतो असे ते म्हणाले.*
याप्रसंगी आयुक्त महोदयांच्या शुभहस्ते आठही विभागात सुशोभिकरण कामे करणा-या विविध कला महाविद्यालयातील चित्रकार कलावंतांचा तसेच मुक्त चित्रकार कलावंतांचा प्रतिनिधीक स्वरुपात गौरव करण्यात आला. यामध्ये बेलापूर विभागातील हर्षल मोरे (जे.जे.स्कुल ऑफ आर्ट्स) व शिवानी बने (विकासिनी स्कुल ऑफ आर्ट्स), नेरुळ विभागात पल्लवी मोरे (जे.जे.स्कुल ऑफ आर्ट्स) व संकेत शेंडे (जे.जे.स्कुल ऑफ आर्ट्स), तुर्भे विभागात रमेश बठवार (जे.जे.स्कुल ऑफ आर्ट्स) व देवश्री पाटील (ठाणे स्कुल ऑफ आर्ट्स), वाशी विभागातील अभिषेक जाधव (जे.के. आर्ट कॉ़लेज), श्रध्दा धनावडे (एल.एस.रहेजा आर्ट स्कुल) व प्रशांत जाधव (जे.के.अकॅडमी ऑफ आर्ट्स), कोपरखैरणे विभागात संध्या सुतार (जे.जे.स्कुल ऑफ आर्ट्स), यश कांबळी (जे.जे.स्कुल ऑफ आर्ट्स), गौरव नराळे (जे.जे.स्कुल ऑफ आर्ट्स), घणसोली विभागात वैभव गडकरी (ठाणे स्कुल ऑफ आर्ट्स), कुमार बाईत (ठाणे स्कुल ऑफ आर्ट्स) व ऐश्वर्या भालेराव (जे.के. अकॅडमी ऑफ आर्ट्स), ऐरोली विभागात श्रीकांत टेकाळे (जे.जे.स्कुल ऑफ आर्ट्स), प्रभांशु यादव (जे.जे.स्कुल ऑफ आर्ट्स), तेजस्वी घुले (ठाणे स्कुल ऑफ आर्ट्स), महेश निमणकर (मुद्रा कला निकेतन), दिघा विभागात गजानन पेलेकर (रहेजा स्कुल ऑफ आर्ट्स), ठाणे बेलापूर रोडवरील सुशोभिकरण कामांमध्ये तनिष्का पालव (जे.जे.स्कुल ऑफ आर्ट्स), प्रशांत कुंवर (जे.जे.स्कुल ऑफ आर्ट्स), प्रियांका काळे (पुणे एमआयटी), रुचा गुरव (ऋषिकेश कॉलेज) अशा कला महाविद्यालयातील विद्यार्थी चित्रकारांप्रमाणेच सचिन पवार व नंदा चौधरी अशा मुक्त चित्रकारांचाही प्रातिनिधीक स्वरुपात सन्मान करण्यात आला.
*संपूर्ण नवी मुंबई शहरात अशा 500 हून अधिक चित्रकार कलावंतांनी नाविन्यपूर्ण चित्र संकल्पना राबवित शहराचे स्वरुप अधिक आकर्षक बनविले आहे. विशेष म्हणजे या भित्ती चित्रकार कलावंतांमध्ये मुलींचाही मोठ्या प्रमाणावर समावेश असून त्यांचा आवर्जुन उल्लेख करीत आयुक्तांनी स्त्री शक्तीतून साकारलेल्या चित्ररंगांची प्रशंसा केली.*
Published on : 03-02-2022 07:16:52,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update