*जागतिक महिला दिनी विष्णुदास भावे नाट्यगृहात स्त्री शक्तीचा उत्साही जागर*
महिला वेळेचे व्यवस्थापन व पैशाचे व्यवस्थापन यामध्ये सरस असून व्यवसायात यशस्वी होण्यासाठी या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असतात. त्यामुळे कोणत्याही कामाला कमी न लेखता आपली आवड, निवड व सवड या त्रिसूत्रीचा अंगीकार करुन महिलांनी व्यावसायिक दृष्टीने पुढे यावे असे मत व्यक्त करीत सुप्रसिध्द उदयोजिका तथा महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीच्या पहिल्या महिला अध्यक्ष श्रीमती. मिनल मोहाडीकर यांनी कुटुंबात एखादी महिला उदयोजक झाली तर ते संपूर्ण कुटुंबच उदयोजक होते अशा शब्दात महिलांशी सुसंवाद साधला. आपल्या उद्योजकतेच्या वाटचालीतील अनेक उदाहरणे देत त्यांनी महिलांना व्यवसायासाठी अनेक क्षितिजे खुली असून आपल्या क्षमतेचा पूर्णपणे वापर करावा असे सांगितले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने समाजविकास विभागाच्या माध्यमातून जागतिक महिला दिनानिमित्त् विष्णुदास भावे नाटयगृहात संपन्न् झालेल्या स्त्री शक्तीचा जागर या विशेष समारंभात त्या आपले मनोगत व्यक्त करीत होत्या या प्रसंगी महापालिकेच्या अतिरिक्त् आयुक्त् श्रीम. सुजाता ढोले, प्रशासन व समाजविकास विभागाचे उपआयुक्त् श्री. दादासाहेब चाबुकस्वार, पोलीस उपआयुक्त श्री. सुरेश मेंगडे, शिक्षण विभागाचे उपआयुक्त् श्री. जयदीप पवार, अर्जुन पुरस्कार विजेत्या आंतरराष्ट्रीय धावपटू श्रीमती. ललिता बाबर, शिक्षणाधिकारी श्रीम. अरुणा यादव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या समन्वयक श्रीमती. संध्या अंबादे, श्रीम. अमरजा चव्हाण, श्रीम. वासंती भगत, उद्योजिका श्रीम. मनिषा काळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती. सुजाता ढोले यांनी महिला आज प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असल्याचे सांगत नवी मुंबई महानगरपालिका महिला विकासासाठी विविध कल्याणकारी योजना राबवित असून जास्तीत जास्त महिलांनी या योजनांचा लाभ घेऊन सक्षम व्हावे यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले. कोव्हीड प्रभावित काळातील निर्बंध सध्या काहीसे शिथील झालेले असून त्यामुळे जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
आंतरराष्ट्रीय धावपटू श्रीमती. ललिता बाबर यांनी आपल्या संघर्षमय वाटचालीचे अनुभव कथन करीत जोपर्यंत आपल्या वाटेत अडथळे येणार नाहीत तोपर्यंत आपल्याला आपल्या क्षमतांची जाणीव होणार नाही व निश्चित दिशा मिळणार नाही असे सांगत आयुष्यात पुढे जाण्यासाठी संकटांवर मात करण्याची जिद्द ठेवा अशा शब्दात उपस्थितांना प्रेरणा दिली. महिलांनीच महिलांचा सन्मान राखला पाहिजे असे सांगत श्रीमती. ललिता बाबर यांनी हळदी - कुंकू समारंभाला विधवा महिलेलाही आदराने बोलाविले पाहिजे असे मत व्यक्त केले.
प्रशासन व समाजविकास विभागाचे उपआयुक्त् श्री. दादासाहेब चाबुकस्वार यांनी महिलांकरीता 40 हून अधिक लोककल्याणकारी योजना राबविणारी नवी मुंबई ही राज्यातील अग्रगण्य महानगरपालिका असल्याचे सांगत कोव्हीडमुळे पतीचा मृत्यू झालेल्या महिलांकरिता स्वयंरोजगारासाठी रु.1.5 लक्ष रक्कमेचे अर्थसहाय्य त्याचप्रमाणे कोव्हीडमुळे एक अथवा दोन पालक गमावलेल्या मुलांच्या संगोपनाकरिता प्रतिमहा अर्थसहाय्य अशा प्रकारच्या महिला व बालकल्याणकारी योजना राबविण्यात येत असल्याची माहिती दिली. जागतिक महिला दिनानिमित्त अंगभूत कलागुणांना वाव देणा-या नऊ प्रकारच्या ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये 369 महिलांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेऊन हे उपक्रम यशस्वी केल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात कर्तबगारी गाजविणा-या महिलांचा सन्मान महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या संकल्पनेतून केला जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्याचप्रमाणे 3 ते 7 मार्च या कालावधीत विविध विषयांवर आयोजित फेसबुक ऑनलाईन संवादमालेलाही भगिनींचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आपल्या कर्तृत्वाचा ठसा विविध क्षेत्रामध्ये उमटविणा-या महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये नवी मुंबई कोर्टाच्या प्रमुख न्यायाधीश श्रीम. तृप्ती देशमुख - नाईक, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीम. हिमांगीनी पाटील, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीच्या उपाध्यक्ष उद्योजिका श्रीम. शुभांगी तिरोडकर, डेझव्हिव्ह स्कील या कौशल्य प्रशिक्षण देणा-या संस्थेच्या प्रमुख श्रीम. गौरी जोशी, हॅप्पी ॲण्ड सेफ पिरियड संस्थेच्या प्रमुख श्रीम. सारिका गुप्ता, स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठान या दिव्यांग कल्याणकारी काम करणा-या संस्थेच्या संस्थापक श्रीम. शिरीष पुजारी, आंतरराष्ट्रीय धावपटू श्रीम. डियान्ड्रा डी तसेच अबोली रिक्षाचालक श्रीम. शोभा तोगरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
त्याचप्रमाणे नुकत्याच झालेल्या नमुंमपा शालेय स्तरावरील फुटबॉल लीगमध्ये सहभागी 10 विभागांच्या संघ महिला कर्णधारांनाही सन्मानीत करण्यात आले. यामध्ये भागा धोहली (बेलापूर), आकांक्षा सिंग (नेरुळ), लक्ष्मी सिंग (सानपाडा), मिताली राठोड (तुर्भे), मुस्कान पठाण (वाशी), राबिया शेख (कोपरखैरणे), पायल सुरवसे (घणसोली), काजल सरोज (रबाळे), शिवानी जैसवाल (ऐरोली) व दिव्या काकडे (दिघा) यांचा समावेश होता.
टेबल टेनीस स्पर्धेत चार वेळा राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक, आंतरराष्ट्रीय स्तरावरील उपांत्य फेरीत सहभाग, खेलो इंडियामध्ये शिष्यवृत्ती, मुंबई विद्यापिठाचे सुवर्ण पदक अशा विविध राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय स्पर्धांत चमकदार कामगिरी करणा-या तेजल जयंत कांबळे हिचाही विशेष सन्मान करण्यात आला.
तसेच महानगरपालिकेच्या विविध योजनांचा लाभ घेऊन विविध व्यवसायांमध्ये यशस्वी कामगिरी करणा-या 19 महिलांचा त्याचप्रमाणे 7 महिला बचत गटांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी उपस्थित सर्व महिलांना सुधा मूर्ती यांच्या गाजलेल्या "वाईज ॲण्ड अदर वाईज" या प्रेरणादायी पुस्तकाची ग्रंथभेट देण्यात आली. यावेळी "स्त्री शक्तीचा जागर" हा विशेष संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यालाही चांगला प्रतिसाद लाभला. विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या पॅसेजमध्ये विविध महिला गटांनी बनविलेल्या वस्तुंचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते.
सध्या कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमावलीमध्ये शासन स्तरावरून सवलत देण्यात आली असल्याने दोन वर्षानंतर प्रत्यक्ष सभागृहात सादर होणा-या या कार्यक्रमाप्रसंगी विष्णुदास भावे नाट्यगृहात महिलांची हाऊसफुल्ल गर्दी होती. महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या संकल्पनेतून यापुढील काळात अनेक नवीन योजना राबविण्यात येत असून त्यासोबतच कोव्हीड काळात नावारुपाला आलेल्या ऑनलाईन मार्केटींग प्रणालीचेही प्रशिक्षण महानगरपालिकेमार्फत घेतले जाईल असे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार यांनी यावेळी सांगितले. जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम स्त्री शक्तीचा जागर करत महिलांनी उत्साहाने साजरा केला.
Published on : 09-03-2022 11:11:57,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update