*आदित्य बिर्ला कॅपिटल फाऊंडेशन व प्राईड इंडिया यांच्या माध्यमातून सीएसआर निधीव्दारे* *नेरुळ व ऐरोली रुग्णालयात अद्ययावत आयसीयू बालरुग्ण कक्ष*
कोव्हीड विरोधातील लढ्यात नवी मुंबई महानगरपालिकेने ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रिटमेंट या त्रिसूत्रीवर भर देत कोरोना विषाणूला आहे तिथेच रोखण्यासाठी प्रभावीपणे प्रतिबंधक उपाययोजना राबविल्या तसेच कोव्हीड लसीकरणावरही भर देत नागरिकांना जलद लस संरक्षित करण्याकडे विशेष लक्ष दिले. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनाचे प्रमाण प्रत्येक लाटेत इतर शहरांच्या तुलनेत नियंत्रित राहिल्याचे दिसून आले.
कोव्हीड उपचारार्थ सुविधा उपलब्ध करून देताना महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य सुविधा सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात आला. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेची ऐरोली व नेरुळ येथील रुग्णालये आय.सी.यू. सुविधांसह सक्षम झाली. याचा उपयोग कोव्हीड नंतरच्या कालावधीत दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यासाठी कायमस्वरुपी होणार आहे.
आरोग्य सुविधा निर्माण करताना त्यामध्ये विविध नामांकित उद्योग समुहांच्या सीएसआर निधीचाही लाभ करून घेण्यात आला असून आदित्य बिर्ला कॅपिटल फाऊंडेशन यांच्या सीएसआर निधीतून प्राईड इंडिया या नामांकित स्वयंसेवी संस्थेच्या समन्वयाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या नेरुळ व ऐरोली येथील दोन्ही रुग्णालयात प्रत्येकी 17 बेड्सची आय.सी.यू. सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
यामध्ये माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालय नेरुळ येथे 17 आय.सी.यू. बेड्स, 5 व्हेन्टिलेटर्स, 8 ईसीजी मशीन, 2 डायलिसीस मशीन, त्यासाठीचे 2 आर ओ प्लांट, ह्र्दयाच्या तपासणीसाठी उपयोगी 2 टू डी इको मशीन अशा साहित्य व उपकरणांनी सुसज्ज अशा आय.सी.यू. वॉर्डची निर्मिती करण्यात आलेली आहे.
एवढ्याच साहित्य व उपकरणांच्या सुविधेसह ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रुग्णालयात आय.सी.यू. वॉर्ड सुसज्ज करण्यात आला असून या दोन्ही रूग्णालयांतील वॉर्ड मुलांवरील उपचारासाठी (Pediatriac Ward) उपलब्ध असणार आहे.त
याकरिता 2 कोटी एवढ्या मोठ्या रक्कमेचा सीएसआर निधी आदित्य बिर्ला कॅपिटल फाऊंडेशन यांचेमार्फत प्राईड इंडिया यांच्या समन्वयाने उपलब्ध करून देण्यात आला असून नेरुळ रुग्णालयात पाचव्या मजल्यावर व ऐरोली रुग्णालयात दुस-या मजल्यावर या बाल रुग्णांसाठी विशेष आय.सी.यू. कक्षाची उभारणी करण्यात आली आहे.
या दोन्ही रूग्णालयांतील आयसीयू वॉर्ड्समधील सुविधांचा उपयोग नियमित बालरुग्णांसाठी होणार असून कोव्हीड काळातही याचा उपयोग होणार आहे. यामुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे सक्षमीकरण झाले असल्याचे मत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी व्यक्त करीत सीएसआर निधी उपलब्ध करून देणा-या आदित्य बिर्ला कॅपिटल फाऊंडेशन तसेच समन्वयक असलेल्या प्राईड इंडिया संस्थेचे आभार मानले आहेत.
Published on : 09-03-2022 11:16:52,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update