*गावठाण व झोपडपट्टी क्षेत्रातील नागरिकांकडून स्वतंत्र पाणी देयक आकारणीचे नियोजन*
स्वत:च्या मालकीच्या मोरबे धरण प्रकल्पाव्दारे जलसमृध्द असणारे नवी मुंबई शहर झपाट्याने विकसित होत असून भविष्याचा अंदाज घेऊन आत्तापासूनच पिण्याच्या पाण्याचे सुयोग्य नियोजन करणे अतिशय महत्वाचे आहे. या गोष्टीकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी नवी मुंबईच्या जल वितरणाबाबत पाणी पुरवठा विभागाशी सातत्याने विचार विनीमय बैठका घेतल्या आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये सिडको विकसित नोड, विस्तारित गावठाण क्षेत्र, मूळ गावठाणे, झोपडपट्टी क्षेत्र व एमआयडीसी क्षेत्र या भागांचा समावेश आहे. महानगरपालिका क्षेत्रात 29 गावठाणे व 48 झोपडपट्ट्या आहेत.
नवी मुंबई शहराचा वेगाने विकास होत असून वाढत्या लोकसंख्येमुळे व गावठाणांच्या मर्यादित जमिनीमुळे येथील रहिवाशांनी आपली जूनी घरे तोडून वाढीव सदनिकांची नवीन एक मजली ते चार मजली इमारती बांधल्याचे निर्दर्शनास येत आहे. पूर्वी ज्या घरात एक कुटुंब रहात होते ते घर कुटुंब विस्तारामुळे तोडून व त्याठिकाणी नव्याने मजले वाढवून बांधले गेल आहे व तेथे एकाहून अधिक कुटुंबे सद्यस्थितीत रहात आहेत. त्याचप्रमाणे काही इमारतींमध्ये तळमजल्यावर व्यावसायिक गाळे देखील बांधल्याचे दिसून येत आहे. अशाचप्रकारे झोपटपट्टी क्षेत्रातही पूर्वीची झोपडी तोडून मोठ्या प्रमाणात नवीन घरे बांधल्याचे आढळून येत आहेत.
गावातील ही जूनी घरे तोडून नवीन बांधलेल्या घरामध्ये वा इमारतीमध्ये सदनिका वाढल्या तरीही जून्या नळजोडणीव्दारेच पाणी पुरवठा होत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशाचप्रकारे झोपडपट्टी भागातही काही प्रमाणात एक मजली घरे व दुकानांचे गाळे बांधल्याचे दिसून येत आहे. अशा घरांमध्येही एका पेक्षा जास्त कुटुंबे रहात आहेत तसेच दुकान गाळेही आहेत. या सर्वांना पूर्वीच्याच नळजोडणीवरून पाणी पुरवठा होत आहे.
त्यामुळे एका बाजूला जल वितरण व्यवस्थेवर ताण येत असून दुस-या बाजुने पाणी देयक रक्कमेवरही त्याचा प्रभाव झालेला दिसून येत आहे. या अनुषंगाने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी पाणी पुरवठा विभागाशी विस्तृत व सांगोपांग चर्चा करून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गांवठाण व झोपडपट्टी भागात विनाजलमापक असलेली घरे, सदनिका, वाणिज्य गाळे यांना स्वतंत्र पाणी देयक आकरणीचा निर्णय घेतलेला आहे.
त्यानुसार गावठाण व झोपडपट्टी क्षेत्रातील वाढीव घरे, वाणिज्य गाळ्यांचे सविस्तर सर्वेक्षण त्वरित करून घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिलेले आहेत. त्या विषयीची कार्यवाही प्रत्येक विभाग कार्यालयाच्या कार्यकारी अभियंता यांच्या अखत्यारित सुरु करण्यात येईल व यावर शहर अभियंता यांचे नियंत्रण राहील. शहर अभियंता यांनी याबाबतचा कार्यवाही अहवाल नियमितपणे आपल्याला सादर करावा असे निर्देश आयुक्तांनी दिलेले आहेत.
सर्वेक्षणानंतर अशी घरे, सदनिका व वाणिज्य गाळे यांना प्रति घरटी, प्रति महिना पाणी दर आकारणी करण्यात येणार आहे.
घरगुती वापर
|
|
1) विना जलमापक ग्राहक - मूळ गावठाण / झोपडपट्टी
|
प्रति घरटी, प्रति महिना रु. 50/-
|
2) सार्वजनिक नळ खांबावरून (स्टँड पोस्ट) पाणी भरणारे ग्राहक / विना नळजोडणी ग्राहक
|
प्रति घरटी, प्रति महिना रु. 30/-
|
वाणिज्य वापर
|
|
विना जलमापक ग्राहक (गावठाण व झोपडपट्टी क्षेत्रांतर्गत)
|
|
1) 15 मिमी व्यासाची फ्लॅट रेट नळ जोडणी (हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार, बेकरी, सर्व्हिस सेंटर, लादी कंपनी इ.)
|
प्रति महिना रु. 1830/-
|
2) 15 मिमी व्यासाची फ्लॅट रेट नळ जोडणी (किरकोळ दुकाने, लॉँड्री, मटन शॉप, फिश शॉप, टि स्टॉल, फरसान मार्ट इ.)
|
प्रति महिना रु. 240/-
|
3) 15 मिमी व्यासाची फ्लॅट रेट नळ जोडणी (घरगुती वापरासह दुकाने, भाजीपाला, टेलिफोन बूथ, किराणा, जनरल स्टोअर्स, दवाखाना, वखार, गॅरेज, सलून इ.)
|
प्रति महिना रु. 91/-
|
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना समाधानकारक पाणी पुरवठा करण्यात येत आहे तथापि जगभरातील अनेक शहरांना जाणवणारी पाण्याची कमतरता लक्षात घेऊन नागरिकांनी पाण्याच्या दैनंदिन वापराबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत सुयोग्य जलवितरणाचे नियोजन करण्यात आले असून नागरिकांना योग्य त्या प्रमाणात पाणी पुरवठा होईल याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्याचप्रमाणे पाणी वापरानुसार नागरिकांकडून देयक रक्कम आकारली जावी याबाबतही दक्षता घेतली जात आहे. तरी जलसंपन्न नवी मुंबई शहरातील नागरिकांनी पाण्याचा गरजेपुरता जपून वापर करावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 11-03-2022 13:07:24,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update