पाणीचोरी रोखण्यासाठी नेरूळ विभागात नळजोडण्या खंडित करण्याची धडक कारवाई
नेरूळ सेक्टर 16, 16 ए, 18, सारसोळे व परिसरात पिण्याच्या पाण्याचा कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पाण्याची कमतरता जाणवत असल्याच्या तक्रारी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्याकडे प्राप्त होत होत्या. त्या अनुषंगाने सदर क्षेत्राच्या जल वितरण व्यवस्थेची बारकाईने पाहणी करण्याचे निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आले होते.
त्यानुसार नेरूळ विभाग कार्यालयातील पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सदर भागाची बारकाईने तपासणी करण्यात आली. यामध्ये अनेक ठिकाणी नागरिक महानगरपालिकेच्या थेट नळजोडणीला विद्युत बुस्टर पंप जोडून पाणी खेचून घेत असल्याचे निदर्शनास आले. सदर पाणी विद्युत बुस्टर पंपाव्दारे खेचून घेतल्याने त्या परिसरातील इतर नळजोडण्यांना कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्याने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत नेरूळ पाणीपुरवठा विभागाच्या वतीने तातडीने धड़क मोहीम राबविण्यात आली. यामध्ये जलवाहिन्यांवर पाणी खेचून घेण्यासाठी विनापरवानगी, अनधिकृतरित्या जोडण्यात आलेले विद्युत बुस्टर पंप खंडित करून जप्त करण्यात आले व नागरिकांना समज देण्यात आली.
या पार्श्वभूमीवर नेरूळमधील सेक्टर 16, 16 ए, 18, सारसोळे व परिसरातील नळजोडण्यांप्रमाणेच शहरातील इतर विभागांमध्येही जलवाहिन्याची पाहणी करण्याचे निर्देश आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी पाणीपुरवठा विभागास दिलेले आहेत. नवी मुंबई नागरिकांनीही पाण्याचे महत्व ओळखून काटकसरीने पाण्याचा वापर करीत सहकार्य करावे तसेच जलवितरण व्यवस्थेत अडथळे निर्माण होऊन यंत्रणेस व नागरिकांस त्रास होईल अशा कृती करू नयेत असे आवाहन केले आहे.
Published on : 22-03-2022 05:48:00,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update