*विशेष अभय योजना लागू करूनही थकबाकी भरण्यात स्वारस्य न दाखविणा-या मालमत्ताकर थकबाकीदारांवर कारवाई*
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ताकर थकबाकीदारांना कोव्हीड कालावधीतील अडचणीच्या परिस्थितीत दिलासा देण्याच्या दृष्टीने 1 ऑक्टोबर 2021 ते 28 फेब्रवारी 2022 पर्यंत अभय योजना लागू करण्यात आलेली होती. सदर अभय योजना पुन्हा लागू करावी अशी विनंती विविध स्तरांतून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचेकडे प्राप्त झाल्यानुसार 15 ते 31 मार्चपर्यंत विशेष अभय योजना जाहीर करण्यात आलेली आहे.
या विशेष अभय योजने अंतर्गत थकबाकीदार नागरिक / व्यावसायिक यांनी आपल्या मालमत्ता कराची संपूर्ण थकित रक्कम अधिक दंडात्मक रक्कमेतील 25% दंडात्मक रक्कम भरल्यास त्यांना दंडात्मक रक्कमेवर 75% इतक्या मोठ्या प्रमाणात सवलतीचा लाभ मिळत आहे. ही विशेष अभय योजना अंतिम असून त्यामध्ये कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचेही जाहीर करण्यात आलेली आहे.
तथापि काही मोठ्या मालमत्ताकर थकबाकीदारांकडून या सवलतीचा लाभ घेण्यासही फारशी उत्सुकता दिसून येत नाही. या अनुषंगाने मोठ्या रक्कमेची थकबाकी असलेल्या व विशेष अभय योजनेचा लाभ घेण्यात स्वारस्य न दाखविणा-या थकबाकीदारांवर धडक कारवाई सुरू करण्यात आलेली आहे.
तुर्भे येथील अक्षर डेव्हलपर्स, अक्षर बिझनेस पार्क, प्लॉट नं. 3, सेक्टर 25, तुर्भे येथील मालमत्तेचा 22 कोटी इतका मोठ्या प्रमाणात मालमत्ताकर थकित असल्याने येथील 299 मालमत्ता धारकांवर अंतिम मुदतीच्या दोन दिवसात करभरणा करण्याच्या नोटिसा बजाविण्यात आलेल्या आहेत. या कालावधीत थकित मालमत्ताकराचा भरणा न केल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामधील प्रकरण 8, क्र. 42 ते 48 अन्वये मालमत्ता जप्तीची, बँक खाती गोठविण्याची तसेच नळ जोडणी खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. अशाच प्रकारची नियमानुसार कारवाई महानगरपालिका क्षेत्रातील इतरही थकबाकीदारांवरही करण्याचे प्रस्तावित आहे.
तरी मालमत्ता कर थकबाकीदार नागरिकांनी आपल्या मालमत्ताकरातूनच नवी मुंबई शहरातील विकास कामे होत असल्याचे लक्षात घेत जाहीर केलेल्या विशेष अभय योजनेच्या अंतिम सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि लगेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या वेबसाईटला भेट देऊन 75 टक्के इतक्या मोठ्या प्रमाणावरील सवलतीच्या दंडात्मक रक्कमेसह थकीत मालमत्ता कर भरणा करावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.*
Published on : 25-03-2022 05:55:46,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update