*डोके चालवण्याची प्रेरणा देणारे नवी मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक - श्री.अरविंद जगताप*
नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हे एक असे स्मारक आहे जिथे डोके टेकवण्याची नाही तर डोके चालवण्याची प्रेरणा मिळते अशा शब्दात स्मारकाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करीत सुप्रसिध्द लेखक श्री. अरविंद जगताप यांनी येथील ग्रंथसंपदा पाहून समाधान वाटते तसेच बाबासाहेबांचे अप्रतिम फोटो पाहून गहिवरून येते असे मत व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बाबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित "जागर 2022" उपक्रमांतर्गत त्यांनी "गोष्ट छोटी डोंगराएवढी" या विषयास अनुसरून प्रबोधनात्मक सुसंवाद साधला.
आपला देश बडबड्या व बोलक्या लोकांचा देश असून अनेक लोक सोशल माध्यमांवरून तासनतास बोलत असतात. या समाज माध्यमांचा शोध परदेशात लागतो आणि त्याचा वापर मात्र आपल्याकडे जास्त होतो ही चिंता व चिंतन करण्याची गोष्ट असून मार्गदर्शन करण्याची आपल्याला भारी हौस असते. मात्र घोडा व बोकडाची मजेदार गोष्ट सांगत त्यांनी मार्गदर्शन करताना आपण सावध राहिले पाहिजे असे सांगितले.
काही माणसे बोलण्यापेक्षा आपल्या कामामधून मार्गदर्शन करतात असे सांगत त्यांनी विविध ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टीतून समाजकार्य कऱणा-या साध्या माणसांच्या गोष्टी सांगितल्या. या साध्या साध्या गोष्टीच डोंगराएवढ्या होतात असे स्पष्ट करीत श्री. अऱविंद जगताप यांनी मी माझ्यापासून सुरुवात केली तरच छोटी गोष्ट डोंगराएवढी कधी होते आपल्यालाच कळत नाही असे सांगितले. अशा प्रामाणिक माणसांच्या भरवशावर हा देश चालतो असे सांगत त्यांनी देशाचा विचार करण्यापूर्वी आपण स्वत:चा विचार करावा आणि बदलांसाठी माणूस म्हणून एकत्र यावे असे मत व्यक्त केले.
आपण भावनेला प्राधान्य देतो मात्र माणूस म्हणून विचार करणे ही आपली जबाबदारी असल्याचे स्पष्ट करीत त्यांनी गुगलवर ज्ञान मिळत नाही, तर ते वाचन व चिंतनातूनच मिळवावे लागते हे नव्या पिढीला सांगण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. तारुण्याचा उमेदीचा काळ स्वत:च्या प्रगतीसाठी असल्याचे भान तरुणाईने राखावे व जागरूकतेने वागावे यादृष्टीने अनेक उदाहरणे त्यांनी दिली.
सध्याच्या सोशल मिडिया प्रभावी युगात शब्दांचे शॉर्टफॉर्म लिहिण्याची सवय चिंताजनक असल्याचे सांगत पत्र म्हणजे मनातल्या भावना अभिव्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे श्री. अरविंद जगताप म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र हे व्यवस्थापनाचा आदर्श नमुना असल्याचे सांगत त्यांनी महापुरुषांच्या अनुकरणीय गोष्टींचा अंगिकार करण्याची व स्वत:मध्ये सकारात्मक बदल घडविण्याची गरज व्यक्त केली.
बाबासाहेबांनी महिलांना मतदानाचा अधिकार प्राप्त करून दिला, स्वतंत्र अस्तित्व दिले याबद्दल आपण कृतज्ञ असले पाहिजे असे सांगत श्री. अरविंद जगताप यांनी महिलांनी अधिक जागरुक होण्याची गरज व्यक्त केली. सामान्य माणूस म्हणून भवतालच्या परिस्थितीला आपणही जबाबदार असून याची जाणीव बाळगण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
नवी मुंबई महानगरपालिका बाबासाहेबांची जयंती आगळ्या वेगळ्या पध्दतीने विचारांच्या जागरातून साजरी करत असल्याबद्दल श्री. अरविंद जगताप यांनी विशेष कौतुक केले.
"जागर 2022" उपक्रमांतर्गत 10 एप्रिल रोजी महात्मा फुले जयंती दिनाच्या पूर्वसंध्येला सुप्रसिध्द साहित्यिक व व्याख्याते श्री. हरी नरके यांचे "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नजरेतून महात्मा फुले यांची विचारक्रांती" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तसेच दि. 11 एप्रिल रोजी विशेष चित्रकला स्पर्धा संपन्न होत असून नवी मुंबईतील विद्यार्थी व चित्रकारांनी 8 वी ते 12 वी तसेच खुल्या गटामध्ये सहभागी होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना चित्रमय आदरांजली अर्पण करावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 08-04-2022 12:28:22,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update