२५ एप्रिल - राष्ट्रीय जंतनाशक दिन
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राष्ट्रीय जंतनाशक मोहीम दि. २५ एप्रिल २०२२ ते दि. २ मे २०२२ कालावधीत राबविण्यात येणार आहे. यामध्ये १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना वयोगटानुसार निश्चित केल्या प्रमाणे जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. ज्या शाळा सुरु आहेत त्या शाळांमध्ये हजर असणाऱ्या मुला-मुलींना शिक्षकांद्वारे तसेच अंगणवाडीमध्ये जाणाऱ्या मुला-मुलींना अंगणवाडी शिक्षकांद्वारे गोळी देण्यात येईल. शाळेत न जाणाऱ्या मुला-मुलींना आरोग्य कर्मचारी व स्वयंसेवक यांच्याकडून गृहभेटीद्वारे गोळी देण्यात येईल.
१ ते १९ वयोगटातील बालकांमध्ये आढळणाऱ्या आतड्यांचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतापासून होतो. याचे प्रमुख कारण म्हणजे परिसर स्वच्छतेचा अभाव असणे हे आहे. कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण आहे. बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ खुंटण्याचे कारण ठरते. ही बाब लक्षात घेऊन या महत्वाच्या आजारांचा प्रतिबंध करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. जंताचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जंत नाशक गोळी घेण्याबरोबरच हात स्वच्छ धुणे, शौचालयाचा वापर करणे, भाज्या व फळे स्वच्छ धुवून खाणे, नखे नियामित कापणे व स्वच्छ ठेवणे, बाहेर जाताना बूट अथवा चपलांचा वापर करणे ही खबरदारी घेणे ही आवश्यक आहे. ही मोहीम नागरी आरोग्य केंद्रामार्फत राबविण्यात येणार आहे.
एक ते दोन वर्ष वयोगटातील बालकास अर्धी गोळी (२०० मिलिग्रॅम) पाण्यात विरघळवुन देण्यात येईल. दोन ते तीन वर्ष वयोगटातील मुला मुलींसाठी एक पूर्ण गोळी (४०० मिलिग्रॅम) पाण्यात विरघळवुन देण्यात येईल. तीन ते एकोणाविस वर्ष वयोगटातील मुला मुलींसाठी एक पूर्ण गोळी (४०० मिलिग्रॅम) चावून खाण्यासाठी स्वच्छ पाण्याबरोबर देण्यात येणार आहे. गोळी खाल्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाही.
तथापि बालकाच्या शरीरामध्ये जंताचा प्रादुर्भाव असल्यास किरकोळ पोटदुखी, जळजळ अथवा क्वचित प्रसंगी मुलांना उलटी होवू शकते. हे दुष्परिणाम किरकोळ स्वरूपाचे असल्याने पालकांनी घाबरून जाऊ नये.
सदर मोहिमेकरीता नवी मुंबई महानगरपालिकेचे १,४९,२३७ उद्दिष्ट असून याकरिता सर्व नियोजन केले असून याअनुषंगाने आरोग्य विभाग, शिक्षण विभाग व एकात्मिक बाल विकास विभाग यांच्या एकत्रित सभा घेऊन संबंधित सर्वांचे (ANM, आशा, अंगणवाडी शिक्षिका, शाळेचे समन्वयक इ.), सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले असून अभियानाची जनजागृती करण्यासाठी बॅनर लावण्यात आले आहेत. याशिवाय प्रत्येक बालकाला “जंतामुळे उदभवणाऱ्या समस्या” व “जंतापासुन बचावासाठी घ्यावयाची काळजी” या आशयाचे हस्तपत्रक देण्यात येणार आहे.
तरी आपल्या १ ते १९ वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना दि. २५ एप्रिल २०२२ ते दि. २ मे २०२२ या कालावधीत जंतनाशक गोळी देऊन कृमीदोषामुळे होणाऱ्या रक्तक्षय व कुपोषणापासून प्रतिबंध करावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 25-04-2022 08:09:55,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update