नाट्यकर्मी श्री.प्रशांत दामले, श्रीम.वर्षा उसगावकर यांच्या शुभहस्ते विष्णुदास भावे नाट्यगृहात आकर्षक नटराज मूर्तीचे अनावरण
अचूक योग साधणे ही देखील एक कला असून आज अक्षय तृतीयेसारख्या शुभमुहूर्तावर नवी मुंबई महानगरपालिकेने विष्णुदास भावे नाटयगृहात नाटयदेवता नटराज मूर्तीची प्रतिष्ठापना करुन एक उत्तम मुहूर्त साधला आहे अशा शब्दात मनोगत व्यक्त करीत सुप्रसिध्द अभिनेते श्री.प्रशांत दामले यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या कल्पकतेचे कौतुक केले.
वाशी येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या विष्णुदास भावे नाटयगृहात दर्शनी भागी स्थापन करण्यात आलेल्या ब्राँझ धातूच्या 6 फूट उंच मूर्तीचे अनावरण सुप्रसिध्द अभिनेते श्री.प्रशांत दामले व नामांकित अभिनेत्री श्रीम.वर्षा उसगावकर यांच्या शुभहस्ते, महापालिका आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर संपन्न झाले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, प्रशासन विभागाचे उपायुक्त श्री.दादासाहेब चाबुकस्वार, शहर अभियंता श्री.संजय देसाई, क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाचे उपायुक्त श्री.मनोजकुमार महाले, कार्यकारी अभियंता श्री.अजय संखे, वाशी विभागाचे सहायक आयुक्त श्री.सुखदेव येडवे व इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना श्री.प्रशांत दामले यांनी स्वच्छ व सुंदर असा देशात नावलौकीक असणारे नवी मुंबई शहर नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात नेहमीच आघाडीवर असून येथे सुविधा निर्मितीप्रमाणेच त्या सुविधांच्या देखभालीवरही विशेष लक्ष दिले जाते असा अनुभव असल्याचे सांगत विष्णुदास भावे नाटयगृह हे त्याचे उत्तम उदाहरण आहे असे मत व्यक्त केले. आगामी काळात ऐरोलीतही नाटयगृह निर्माण होत असून यामधून नवी मुंबईतील नाटय रसिकांना आणखी एक चांगली सुविधा उपलब्ध होईल याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
नवी मुंबई नावाप्रमाणेच नाविन्याला प्राधान्य देत असून आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नाटयदेवता नटराज मूर्तीचे अनावरण करण्याचे भाग्य आम्हाला लाभले अशा शब्दात आनंद व्यक्त करीत नामांकित अभिनेत्री श्रीम.वर्षा उसगावकर यांनी बुके ऐवजी बुक भेट देत नवी मुंबई महानगरपालिकेने वाचन संस्कृतीचा प्रसार करण्याचा जपलेला वसा प्रेरणादायी असल्याचे सांगितले. विष्णुदास भावे नाटयगृहातही राबविली जाणारी नियोजित ग्रंथालयाची संकल्पना अभिनव असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ज्येष्ठ रंगकर्मींच्या हस्ते नाटयदेवता नटराजाच्या प्रतिष्ठापनेचा दुग्धशर्करा योग जुळून आला याबद्दल आनंद व्यक्त करीत विष्णुदास भावे नाटयगृहासारख्या नवी मुंबईच्या नाटय चळवळीचा साक्षीदार असणा-या वास्तूत योग्य जागी बसविलेली अत्यंत आकर्षक स्वरुपातील ही नटराज मूर्ती नाटयगृहाच्या सौंदर्यात भर घालेल असा विश्वास महापालिका आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांनी व्यक्त केला.
ब्राँझ धातूची 165 किलो वजनाची ही 6 फूट उंच आकर्षक नटराज मूर्ती शिल्पकार श्री.रवि वाडकर यांच्या संकल्पनेतून व सजावटीतून साकारलेली आहे. या अनावरणप्रसंगी नाटय रसिकही मोठया प्रमाणावर उपस्थित होते.
Published on : 03-05-2022 14:18:33,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update