*शहर सुरक्षिततेला अधिक सक्षमता देणा-या सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याच्या कामाचा आयुक्तांकडून आढावा*
शहर सुरक्षेच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेने सन 2012 मध्ये शहरातील मुख्य ठिकाणी लावलेल्या 282 सीसीटिव्ही कॅमे-यांव्दारे विविध प्रकारच्या गुन्हयांची उकल करण्यात तसेच अपघातांची कारणमीमांसा जाणून घेण्यास मदत झाली आहे. या अनुषंगाने शहर सुरक्षिततेला अधिक सक्षम बनविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध प्रकारचे 1608 सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात येत असून या कामाचा सविस्तर आढावा महापालिका आयुक्त श्री अभिजीत बांगर यांनी घेतला.
टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लि. या संस्थेमार्फत सदरचे काम करण्यात येत असून त्यांच्या वतीने साईट सर्वेक्षणाचे काम पूर्ण करून सदर सर्वेक्षण तपशील पोलीस विभागाची मान्यता मिळण्याच्या प्रक्रियेत असल्याची माहिती दिली. याबाबत महानगरपालिकेच्या विदयुत अभियांत्रिकी विभागाने समन्वयाची भूमिका राखून मंजूरीचे काम तत्परतेने करुन घेण्याबाबत आयुक्तांनी निर्देशित केले.
यामध्ये पोलीस विभागामार्फतही सीसीटीव्ही बसवण्यासाठी काही जागा सूचविण्यात आल्याची माहिती देण्यात आली असता याबाबत आयुक्तांनी पोलीस विभागाने सूचविलेल्या जागांचा प्राधान्याने समावेश करावा व तसे करीत असल्याचे त्यांस लेखी कळवावे असे निर्देश दिले.
हे काम विहित वेळेत व्हावे यादृष्टीने आवश्यक उपकरणे व साहित्य खरेदीची प्रक्रिया जलद करण्यात यावी तसेच सीसीटिव्ही कॅमेरे बसविताना ते वेगवेगळया ठिकाणी बसविण्यात येत असले तरी ती कामे एकाच वेळी समांतरपणे सुरू करावीत व त्यासाठी एजन्सीने आवश्यक मनुष्यबळ वाढवावे असेही निर्देशित केले.
या प्रकल्पाची कार्यप्रणाली निश्चित करताना सखोल विचार करण्यात आलेला असून त्यानुसार तिची योग्य प्रकारे अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करीत आयुक्तांनी सीसीटिव्ही कार्यान्वित करण्यासाठीती कामे विहीत वेळेत पूर्ण करताना त्याचा दर्जाही उत्तम राहील याची विशेष काळजी घेण्याचे सूचीत केले.
या प्रकल्पामध्ये बसविण्यात येणारे विविध प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे हे अत्याधुनिक तंत्रप्रणालीवर आधारित असून त्याव्दारे वाहनांचे नंबरप्लेट डिटेक्शन, रेड सिग्नल व्हायलेशन यावर बारकाईने लक्ष ठेवता येणार आहे. त्याचप्रमाणे काही कॅमे-यांमध्ये वाहनाचा वेग मोजता येईल अशी प्रणाली शक्य आहे काय याचीही खातरजमा करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
सदरची प्रणाली पूर्णपणे स्वयंचलित तसेच प्रत्यक्ष वेळेनुसार कार्यान्वित असेल याकडेही विशेष लक्ष दिलेले आहे. या कॅमे-यांसाठी महापालिका मुख्यालयात विशेष इंटीग्रेटेड कमांड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात येत असून त्याठिकाणी आपत्ती व्यवस्थापन विभागाशी समन्वय राखून आगामी काळात स्मार्ट पार्कीग, स्काडा, घनकचरा व्यवस्थापन या प्रणालींचेही नियंत्रण करता येईल अशाप्रकारे रचना करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. या सीसीटिव्ही कॅमे-यांचे चित्रण आधीच्या कॅमे-यांप्रमाणे पोलीस आयुक्तालयास उपलब्ध करून देण्याचीही सुविधा या प्रणालीमध्ये आहे.
नवी मुंबईच्या शहर सुरक्षिततेला अधिक सक्षम बनविणा-या या सीसीटिव्ही प्रणालीची कामे गुणवत्ता राखून विहित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दिलेल्या असून त्यादृष्टीने झालेल्या कामाचा नियमित आढावा घेतला जात आहे.
Published on : 13-05-2022 13:51:29,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update