मुख्य सचिव श्री.मनुकुमार श्रीवास्तव यांनी केले नवी मुंबई महानगरपालिकेच्या वैशिष्टपूर्ण कामांचे पाहणीअंती कौतुक
नवी मुंबई शहरात प्रवेश केल्यानंतर लगेचच वेगळेपण नजरेत भरतेच शिवाय शहरातील कानाकोप-यात फिरताना प्रत्येक गोष्टीकडे महानगरपालिका बारकाईने लक्ष दिले जात असल्याचे दिसून येते असा अभिप्राय देत महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव श्री. मनुकुमार श्रीवास्तव यांनी शहर विकासाची ही कार्यप्रणाली अशीच सुरू ठेवा आणि नवी मुंबईला अधिक स्वच्छ, सुंदर आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे आधुनिक शहर बनविण्यासाठी नवनव्या संकल्पनांची अंमलबजावणी करा असे सूचित करीत नवी मुंबई शहरामध्ये ती क्षमता असल्याचे मत व्यक्त केले.
नवी मुंबई शहरातील विविध उल्लेखनीय प्रकल्पांची पाहणी केल्यानंतर मुख्य सचिव श्री. मनुकुमार श्रीवास्तव यांनी महापालिका मुख्यालयातील विभागप्रमुखांच्या बैठकीप्रसंगी नवी मुंबईच्या स्वच्छ व सुशोभित रूपाची प्रशंसा केली. महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वैशिष्टयपूर्ण कामांची व नियोजित प्रकल्प, सुविधांची माहिती सादरीकरणाव्दारे दिली.
ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भेट देत मुख्य सचिव श्री.मनुकुमार श्रीवास्तव यांनी बाबासाहेबांच्या स्मारकाची वास्तू खूपच छान व भव्य असून येथील ग्रंथालय आणि संग्रहालय अतिशय सुंदर आहेत तरी याठिकाणी प्रत्येक माणसाने प्रत्यक्ष भेट देऊन अनुभव घ्यायला हवा असे अभिप्राय व्यक्त केले.
अडवली भूतावली येथील झिरो वेस्ट मॉडेलची पाहणी करीत त्यांनी कच-याची निर्मितीच्याच ठिकाणी विल्हेवाट लावणारी ही संकल्पना अत्यंत अनुकरणीय असल्याचे मत मांडत यामुळे महानगरपालिकेच्या कचरा वाहतुक खर्चात बचत होतेच शिवाय महिलांना रोजगारही उपलब्ध होतो व त्यांच्या मुलांच्या शिक्षणालाही हातभार लावला जातो असे अनेक फायदे होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. अडवली भूतावली येथील आदिवासी बांधवांसाठी महानगरपालिकेने बांधून दिलेली घरे प्रशस्त व चांगल्या स्वरूपाची तसेच सुविधापूर्ण असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.
कोपरखैरणे येथील मियावाकी शहरी जंगल प्रकल्पाची पाहणी करताना पूर्वीच्या डंपीग ग्राऊंडचे रूपांतर शहरी जंगलात करण्याच्या महानगरपालिकेच्या अभिनव संकल्पनेची त्यांनी प्रशंसा केली. कमी कालावधीत झपाट्याने वृक्षवाढ होणारा मियावाकी प्रकल्प इतक्या मोठ्या प्रमाणात राबवून शहरी पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी व त्यामधून जैवविविधतेला पोषक वातावरणनिर्मितीसाठी महापालिका करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल मुख्य सचिव महोदयांनी कौतुक केले. शिवाय हे प्रकल्प महानगरपालिकेचा कोणताही खर्च न करता ग्रीनयात्रा संस्थेच्या माध्यमातून सीएसआर निधीतून उपलब्ध करून घेण्याच्या संकल्पनेबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. निसर्गोद्यान येथील स्वच्छता पार्क संकल्पनाही विशेषत्वाने मुलांना स्वच्छतेविषयी माहिती देण्याच्या दृष्टीने एकदम आगळीवेगळी वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे ते म्हणाले.
वाशी सेक्टर 10 येथील मिनी सी शोअर परिसराचे आकर्षक रूप, शहरात ठिकठिकाणी केलेली भित्तीचित्रे व सुशोभिकरण कामे, चित्रकविताभिंती, टाकाऊतून टिकाऊ शिल्पाकृती, कारंजे व त्यासाठी मलप्रक्रिया केंद्रातील प्रक्रियाकृत पाण्याचा केला जाणारा वापर, नाले स्वच्छ रहावेत म्हणून त्यांच्या काठांवर लावलेल्या जाळ्या, जलप्रवाहातील स्क्रिन्स, ठिकठिकाणी लावलेली पोडियम गार्डन, अभिनव स्वरूपाचे पेट कॉर्नर अशा शहरात विविध ठिकाणी असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण बाबींची पाहणी करत त्यांनी या वेगळ्या संकल्पनांचे कौतुक केले.
स्वच्छता आणि सुशोभिकरणात नवी मुंबई अव्वल असून यापुढील काळात सध्या प्रचलित असलेल्या आधुनिक अर्बन डिझाईन कन्सेप्टचा उपयोग करून नवी मुंबईतील काही भाग वैशिष्टयपूर्ण रितीने विकसीत करावेत अशा सूचना मुख्य सचिव श्री.मनुकुमार श्रीवास्तव यांनी केल्या. शहराच्या मूळच्याच सौदर्यीकरणाला या माध्यमातून आधुनिक लूक देण्यासाठी यापुढील काळात प्रयत्न करावा असे त्यांनी सूचित केले.
नागरिकांना दिल्या जाणा-या विविध सेवा, सुविधा तसेच नागरिकांची महानगरपालिकेशी संबंधित असलेली कामे ऑनलाईन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अधिक नव्या अत्याधुनिक ॲप तंत्रज्ञानाचा वापर करण्याचेही त्यांनी सूचित केले. नवी मुंबई हे हरित शहर बनण्याची क्षमता असणारे शहर आहे त्यामुळे आपल्या क्षमतांचा अधिक प्रभावीपणे वापर करावा असे मुख्य सचिव श्री.मनुकुमार श्रीवास्तव यांनी सूचित करीत याव्दारे नवी मुंबई अधिक सुंदर बनेल व आधुनिकतेकडे वाटचाल करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Published on : 16-05-2022 14:06:05,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update