*”झोपडपट्टी तिथे ग्रंथालय” संकल्पनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 10 झोपडपट्ट्यांमध्ये ग्रंथालय*
कोणत्याही व्यक्तीच्या प्रगतीमध्ये पुस्तक वाचनाचा फार मोठा वाटा असून वाचनामुळे जगाचे ज्ञान मिळते व व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतो. म्हणूनच नवी मुंबईतील झोपडपट्टी भागातील नागरिकांना, त्यातूनही विशेषत्वाने मुले व युवकांना वाचनासाठी सहजपणे पुस्तके उपलब्ध व्हावीत व त्यांच्यामध्ये वाचनाची गोडी वाढावी याकरिता महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या संकल्पनेतून “झोपडपट्टी तिथे ग्रंथालय” ही अभिनव संकल्पना राबविण्यात येत आहे.
याकरिता समाजविकास विभागामार्फत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टी भागामध्ये सर्वेक्षण कऱण्यात आले असून त्याबाबतचा सविस्तर आढावा महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी विशेष बैठक आयोजित करीत घेतला. पहिल्या टप्प्यात इंदिरानगर, हनुमान नगर, तुर्भे स्टोअर, गौतम नगर व पंचशीलनगर, कातकरीपाडा व भीमनगर, नोसिल नाका, रामनगर, इलठणपाडा, रमाबाई आंबेडकर नगर, शिवाजी नगर अशा 10 झोपडपट्टी भागांमध्ये जागा निश्चिती करण्यात आली आहे.
याठिकाणी स्थापत्य विषयक कामे तसेच बाह्य व अंतर्गत रंगरंगोटीची कामे त्वरित सुरु करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. हे करताना ग्रंथालयांमधील वातावरण वाचनासाठी प्रोत्साहित करेल अशाप्रकारचे आकर्षक असावे अशी सूचना आयुक्तांनी केली. जागेच्या आकारमानानुसार प्रत्येक ग्रंथालयाची अंतर्गत रचना व सजावट असावी असे निर्देशित करताना त्याठिकाणी ग्रंथालय व्यवस्थापनासाठी संगणक व प्रिंटरची व्यवस्था करण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिले. प्रत्येक ग्रंथालयाच्या जागांमध्ये स्वच्छ प्रसाधनगृहाची व्यवस्था असावी अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या.
आगामी महिन्याभराच्या कालावधीत निश्चित केलेल्या दहाही ठिकाणांवरील ग्रंथालये सुरु करण्यासाठी आवश्यक कामांच्या प्रक्रिया समांतरपणे राबवाव्यात व प्रत्येक झोपडपट्टी भागातील लोकसंख्येचा विचार करून त्यानुसार नागरिकांना वाचायला आवडतील अशा प्रकारची पुस्तके निवडावीत असेही आयुक्तांनी विशेषत्वाने सूचित केले.
नवी मुंबई महानगरपालिकेची शहरातील विविध भागात 19 ठिकाणी ग्रंथालये असून झोपडपट्टी भागातील नागरिक पुस्तकांपासून वंचित रहायला नकोत व त्यांना घरापासून जवळ आपल्या परिसरातच वाचनासाठी सहजपणे पुस्तके उपलब्ध व्हावीत या विचारातून “झोपडपट्टी तिथे ग्रंथालय” ही अभिनव संकल्पना महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. याबाबत आयुक्तांनी घेतलेल्या आढावा बैठकीप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, प्रशासन तथा समाज विकास विभागाचे उप आयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, शहर अभियंता श्री. संजय देसाई उपस्थित होते.
वाचन संस्कृतीच्या विकासासाठी मागील वर्षभरात अनेक वैविध्यपूर्ण उपक्रम नवी मुंबई महानगरपालिकेने राबविलेले असून झोपडपट्टी भागातील नागरिकांच्या वैचारिक विकासासाठी “झोपडपट्टी तिथे ग्रंथालय” असा अभिनव उपक्रम राबविणारी नवी मुंबई ही देशातील एकमेव महानगरपालिका ठरावी.
Published on : 17-05-2022 12:15:33,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update