*नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या कबड्डी संघाचे जिल्हास्तरीय यश*
आधुनिक शहर म्हणून ओळखल्या जाणा-या नवी मुंबईची ओळख क्रीडा नगरी म्हणूनही व्हावी याकरिता विविध खेळांचे प्रशिक्षण देऊन गुणवंत खेळाडू घडविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत.
यामध्ये महानगरपालिकेचे विविध खेळांतील संघ जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर उत्तम यश संपादन करीत असून नुकत्याच ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने, जयशंकर क्रीडा मंडळ कल्याण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा प्रशिक्षण केंद्र अ गटाच्या संघाने तृतीय क्रमांक संपादन करून स्वत:च्या कर्तबगारीची नाममुद्रा उमटविली.
नवी मुंबई महानगरपालिका संघाने ठाणे जिल्हयातील जुन्या व बलाढ्य संघांना पराभूत करीत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. उपांत्य फेरीतील अटीतटीच्या लढतीत छत्रपती क्रीडा मंडळ, डोंबिवली संघाने 25-20 अशा 05 गुण फरकाने नवी मुंबई महानगरपालिका संघावर विजय मिळविला त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेचा संघ स्पर्धेत तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. नवी मुंबई महानगरपालिका संघातील खेळाडू हे कुमार गटात खेळणारे खेळाडू असुनसुद्धा या स्पर्धेमध्ये वरिष्ठ “अ” गटात खेळून त्यांनी क्रीडाप्रेमींची मने जिंकली. महानगरपालिका संघातील खेळाडू कु. अफ्ताब हसनेत मन्सुरी याने दिवसातील उत्कृष्ट चढाईपटू म्हणून तर 27 एप्रिल रोजीचा सर्वोत्कृष्ट संरक्षक म्हणून सुनील राठोड यांचा वैयक्तिक पारितोषिके देऊन सन्मान करण्यात आला.
नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या संघातील कुमारवयीन खेळाडूंनी या अ गटातील स्पर्धेत अतिशय चमकदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या संघातील खेळाडू दिपक श्रीराम केवट याची 5 ते 8 मे 2022 या कालावधीत पुणे येथे होणार्या कुमार गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेकरिता ठाणे जिल्हा संघात निवड झालेली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या संघाने मिळविलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल क्रीडा व सांस्कृतिक कार्य. विभागाचे उपआयुक्त श्री. मनोजकुमार महाले यांनी संघाचे अभिनंदन करीत पुढील काळात आणखी चांगली कामगिरी करून अंतिम विजेतेपद संपादन करण्यासाठी प्रयत्न करावेत अशा शुभेच्छा दिल्या. नवी मुंबई महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव हे व्यवस्थापक असून श्री. रविंद्र सकपाळ यांच्या प्रशिक्षणाखाली नवी मुंबई महानगरपालिका संघाने हे उज्वल यश संपादन केलेले आहे.
अशाप्रकारे कबड्डीसह विविध खेळांमध्ये उत्तम कामगिरी करीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या नावलौकिकात लक्षणीय भर घालत असल्याबद्दल महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी विजेत्या कबड्डी संघाचे कौतुक करीत त्यांना पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिलेल्या आहेत.
Published on : 18-05-2022 13:27:19,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update