*नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 514 धोकादायक इमारतींची यादी जाहीर*
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील धोकादायक इमारतींचे सन 2022-2023 या वर्षासाठी विभागवार सर्वेक्षण करण्यात आले असून सर्वेक्षणानंतर महानगरपालिका क्षेत्रात एकूण 514 इमारती महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 264 अन्वये धोकादायक इमारती म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत.
यामध्ये, अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तात्काळ निष्कासित करणे अशा सी-1 प्रवर्गामध्ये मोडणा-या 61 इमारती, इमारत रिकामी करून संचरचनात्मक दुरूस्ती करणे अशा सी-2 ए प्रवर्गामध्ये मोडणा-या 120 इमारती, इमारत रिकामी न करता रचनात्मक दुरूस्ती करणे अशा सी-2 बी प्रवर्गामध्ये मोडणा-या 282 इमारती तसेच इमारतीची किरकोळ दुरूस्ती अशा सी-3 प्रवर्गामध्ये मोडणा-या 51 इमारती, अशाप्रकारे एकूण 514 धोकादायक इमारतींची यादी घोषित करण्यात आलेली आहे. सदर यादी नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या वेबसाईटवर 'विभाग' सेक्शनमध्ये 'अतिक्रमण विभाग' माहितीच्या सेक्शनमध्ये सहज उपलब्ध आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 264 मधील तरतुदीच्या अनुषंगाने नोटीस प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानुसार घोषित इमारतींमध्ये वास्तव्य करणारे मालक / भोगवटादार यांना ते राहत असलेली इमारत निवासी / वाणिज्य वापराकरिता धोकादायक असलेबाबत आणि या इमारतींमधील निवासी / वाणिज्य वापर तात्काळ थांबविणेबाबत तसेच धोकादायक इमारतींचे बांधकाम विनाविलंब तोडून टाकणेबाबत महाराष्ट्र शासन, नगरविकास विभाग यांचेकडील दि. 05 नोव्हेंबर 2015 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार लेखी सूचना / नोटीस देण्यात आलेल्या आहेत. सी-1 प्रवर्गातील इमारतीची विदयुत व जल जोडणी खंडीत करण्यात येईल असेही यात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे.
अशा धोकादायक घोषित इमारतींचे मालक अथवा भोगवटादार यांना सूचित करण्यात येते की, ते रहात असलेल्या इमारतीचा वापर करणे धोकादायक असल्याने इमारत कोसळून जिवीत व वित्तहानी होण्याचा संभव लक्षात घेऊन सदर इमारतीचा / बांधकामाचा निवासी / वाणिज्य वापर त्वरीत बंद करावा आणि सदरची इमारत / बांधकाम त्वरीत विनाविलंब तोडून टाकावे. अशा प्रकारची कार्यवाही न केल्यास, सदर इमारत / बांधकाम कोसळल्यास होणा-या नुकसानीस फक्त संबंधित जबाबदार असतील, नवी मुंबई महानगरपालिका यास जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी असे सूचित करण्यात आले आहे.
धोकादायक इमारतींच्या वर्गीकरणानुसार इमारतींचा भोगवटा वापर / रहिवास करणा-या नागरिकांनी इमारती तात्काळ निष्कासीत करावयाच्या आहेत किंवा वर्गीकरणानुसार इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती करणे प्रवर्गामध्ये मोडणा-या भोगवटाधारकांनी इमारती दुरुस्ती करून आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे.
तरी पावसाळा कालावधीत धोकादायक झालेल्या इमारतींचा / घरांचा वापर करणे धोक्याचे आहे. त्यामुळे जिवित व वित्तहानी होऊ शकते. म्हणून नागरिकांकडून धोकादायक इमारतींचा / घरांचा रहिवास / वापर तात्काळ थांबविण्यात यावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे, अन्यथा दुर्देवीरित्या अपघात घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधिताची राहील याची नोंद घेण्यात यावी.
Published on : 21-05-2022 13:57:42,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update