*महत्वाच्या कामांसाठी परदेशी जाणा-या नागरिकांकरिता प्रिकॉशन डोसच्या कालावधीत घट*
कोव्हीड 19 लसीकऱणातील सुयोग्य नियोजनामुळे 18 वर्षावरील नागरिकांचे दोन्ही डोस 100 टक्के पूर्ण करणारी नवी मुंबई ही राज्यातील पहिली महानगरपालिका ठरली असून सद्यस्थितीत 18 वर्षावरील सर्व लाभार्थ्यांना दुसऱ्या डोसनंतर 9 महिने किंवा 39 आठवडयांनी प्रिकॉशन डोस देण्यात येत आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जे भारतीय नागरिक रोजगारासाठी, परेदशातील क्रीडा स्पर्धांसाठी, भारताच्या अधिकृत शिष्टमंडळाचा भाग म्हणून व्दिपक्षीय अथवा बहुपक्षीय बैठकांमध्ये सहभाग घेण्यासाठी, परदेशातील व्यावसायिक बांधिलकी असणा-या बैठकांसाठी (Employment opportunities, participation in sports tournaments in foreign countries, participation in bilateral, multilateral meetings as part of India’s official delegation, for attending business commitments in foreign countries ) परदेशी जाणार असतील अशा व्यक्तींसाठी दुसऱ्या डोसमधील आणि प्रिकॉशन डोसमधील कालावधी कमी करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने कोविन पोर्टलवरही बदल करण्यात आलेला आहे.
याकरिता मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या असून (1) सद्यस्थितीत आरोग्यकर्मी, पहिल्या फळीतील कोरोना योध्दे, 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक हे लाभार्थी शासकीय (मोफत) किंवा खाजगी सीव्हीसीच्या ठिकाणी रक्कम भरून प्रिकॉशन डोस घेऊ शकतात. 60 वर्षापेक्षा कमी ते 18 वर्ष वयाचे लाभार्थी फक्त खाजगी सीव्हीसी सेंटरला प्रिकॉशन डोस घेण्यासाठी रक्कम भरून पात्र आहेत. (2) जी लस अगोदर घेतली आहे तीच लस प्रिकॉशन डोस मध्ये घ्यावयाची आहे. (3) वरील नमूद कारणांसाठी परदेशी जाणारे लाभार्थी प्रिकॉशन डोस मुदतपूर्व घेण्यास पात्र आहेत. (4) अशा लाभार्थींना दुसऱ्या डोस नंतर किमान 3 महिन्याच्या अंतराने (90 दिवस) प्रिकॉशन डोस घेता येईल. (5) जे सीव्हीसी सद्यस्थितीत प्रिकॉशन डोस देण्यासाठी पात्र आहेत त्या सर्व ठिकाणी कमी कालावधीमध्ये प्रिकॉशन डोस देता येईल. (6) प्रिकॉशन डोस घेण्यासाठी व्हिसा, ट्रॅव्हल डॉक्युमेंट इ. परदेशी जाण्याचा पुरावा असलेले कोणतेही कागदपत्र पोर्टलवर अपलोड करण्याची आवश्यकता नाही असे सूचित करण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आत्तापर्यंत 18 वर्षावरील 12,54,673 नागरिकांनी कोव्हीड 19 लसीचा पहिला डोस घेतला असून 11,32,638 नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. त्याचप्रमाणे 60,254 नागरिकांनी प्रिकॉशन डोस घेतला आहे.
तसेच 12 ते 14 वर्षे वयोगटातील 38,842 मुलांनी पहिला डोस आणि 27,153 मुलांनी दोन्ही डोस घेतलेले आहेत.
15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणातही नवी मुंबई महानगरपालिका आघाडीवर असून आत्तापर्यंत 80,651 मुलांनी पहिला डोस तसेच 64,016 मुलांनी दोन्ही डोस घेतलेले आहेत.
सद्यस्थितीत कोव्हीडचा प्रभाव कमी झालेला दिसत असला तरी लसीकरणामुळे कोव्हीडच्या तीव्रतेपासून होणारा बचाव लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी विहित वेळेत आपला प्रिकॉशन डोस घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 23-05-2022 07:07:18,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update