*माता रमाईंच्या त्यागाचा साहित्यिक श्री. योगीराज बागूल यांनी उलगडला जीवनपट*

माता रमाईंचे जीवन म्हणजे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजासाठी वाहून घेतलेल्या आयुष्यासाठी केलेले संपूर्ण समर्पण असून रमाई आईसाहेब म्हणजे त्यागमूर्ती असल्याचे मत सुप्रसिध्द साहित्यिक श्री. योगीराज बागूल यांनी व्यक्त केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या 87 व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून “विचारवेध” शिर्षकांतर्गत ‘रमाईंची संघर्ष गाथा’ या विषयावर साहित्यिक श्री. योगीराज बागूल यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
माता रमाईंवर विविध पुस्तकांचे वाचन केल्यानंतरही माझ्या मनातील रमाबाई कुठेही दिसल्या नाहीत, त्यामुळे अधिक अभ्यास करीत रमाईंच्या जीवनावर ‘प्रिय रामू…’ हा चरित्रग्रंथ लिहिला असे सांगत बाबासाहेब आणि रमाई यांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगत श्री. योगीराज बागूल यांनी तो काळ श्रोत्यांसमोर उभा केला.
बाबासाहेबांनी रमाईंना पाठविलेली 3 पत्रे उपलब्ध असून त्यामधील परदेशात उच्च शिक्षणासाठी गेल्यानंतर 1919 मध्ये बाबासाहेबांनी रमाईंना लिहिलेले पत्र डोळ्यात पाणी आणते. या महामानवाने आणि माऊलीने समाजाच्या कल्याणासाठी सोसलेल्या कष्टांविषयी भाष्य करताना श्री. योगीराज बागूल यांनी 1899 ते 1935 या अवघ्या 36 वर्षांच्या आयुष्यात रमाईंचा प्रत्येक दिवस संघर्षात गेला हे सांगत 1933 साली राजगृहात रहायला गेले तेव्हा रमाईंचा आजार बळावला होता. त्यामुळे सुख जवळ आले पण त्याला कवेत घेण्याची ताकद त्यावेळी रमाईंमध्ये नव्हती अशा शब्दात रमाईंच्या संघर्षमय जीवनाची कहाणी सांगितली.
‘मोठ्या माणसाची बायको होणे किती कठीण असते ते तिलाच माहित असते’ ही रमाईंची भावना व्यक्त करताना ‘महापुरुषाला दु:ख व्यक्त करण्याचीही मुभा नसते’ ही बाबासाहेबांची भूमिकाही श्री. योगीराज बागूल यांनी ह्रद्य प्रसंगातून कथन केली.
खेड्यापाड्यातल्या स्त्रिया जात्यावरच्या ओव्यांमधून या जोडप्याचे गुणगान गायच्या. त्याकाळी आजच्यासारखी पुरेशी प्रसिध्दी साधने नसतानाही बाबासाहेबांचे व रमाईंचे कार्य खेड्यापाड्यातील लोकांपर्यंत कसे पोहचले असेल हा कुतुहलाचा विषय असल्याचे सांगत श्री. योगीराज बागूल यांनी आंबेडकरी अभ्यासकांमध्ये नव्या पिढीने अधिक जोमाने काम करण्याची गरज व्यक्त केली.
सर्वसाधारणपणे व्याख्यानांमधून बाबासाहेबांचे तत्वज्ञ, ज्ञानसूर्य, चिंतनशील, विद्वान असे रुप मांडले जाते. तथापि रमाईंवरील व्याख्यानातून जगाचा संसार उभा करणा-या बाबासाहेबांचे आणि रमाईंचे आपुलकी जपणारे कौटुंबिक रुप त्यांच्या जीवनातील विविध गोष्टी सांगत श्री. योगीराज बागूल यांनी उलगडले.
Published on : 27-05-2022 12:10:53,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update