*एमआयडीसी भागातील कामांचा आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्याकडून पावसाळापूर्व आढावा*




नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध विभागातील नाले, मलनि:स्सारण वाहिन्या व बंदिस्त गटारे साफसफाईची महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर प्रत्यक्ष पाहणी करीत आहेत. मागील काही दिवसात नागरी भागातील पाहणी केल्यानंतर आज आयुक्तांनी एमआयडीसी भागातील नाले व बंदिस्त गटारे साफसफाई कामाची पाहणी केली. त्याचप्रमाणे एमआयडीसी क्षेत्रात सुरु असलेल्या रस्ते व गटारे बांधकामाचीही पाहणी केली.
हर्डेलिया कंपनी जवळील नाल्याचा मोठा कल्व्हर्ट सायन पनवेल महामार्गाखालून जात असून डोंगरातून वाहत येणारी माती व दगड साठून वाहत्या पाण्याला अडथळा निर्माण होतो. या मोठ्या कल्व्हर्ट मधील माती व दगड काढून हा कल्व्हर्ट पूर्ण साफ केला जात असल्याने पाण्याचा प्रवाह वाहता राहील व सायन पनवेल मार्गावर पाणी साचून वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही अशाप्रकारे काळजी घेतली जात आहे.
या नाल्यापासून जवळच असलेल्या तुर्भे पोलीस स्टेशनमध्ये मोठी भरती व अतिवृष्टी यांची वेळ जुळून आल्यास मोठ्या प्रमाणावर साचणा-या पाण्यावरही या मोठ्या कल्व्हर्ट सफाईचा परिणाम होणार आहे. याप्रसंगी आयुक्तांनी तुर्भे पोलीस स्टेशन येथेही भेट देऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र आव्हाड यांच्याशी संवाद साधला तसेच पावसाळी कालावधीत अतिवृष्टी होताना पोलीस स्टेशनमध्ये पाणी साचून होणारी अडचण जाणून घेतली. यावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून तळमजल्यावर स्टिल्ट एरिया ठेवून पहिल्या मजल्यावर पोलीस स्टेशनचे कार्यालय असेल अशी इमारत बांधण्याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची सूचना आयुक्तांनी केली.
एमआयडीसी क्षेत्रातील एसबीआय कॉलनी समोरील नाला, एलपी जंक्शन येथील पाणी साचण्याची समस्या दूर करण्यासाठी त्याठिकाणी बांधण्यात आलेला कल्व्हर्ट, रहेजा कंपाऊंड जवळील नाला, लॉरी बॅन्लीट कंपनीसमोरील नाला अशा विविध नाल्यांच्या साफसफाई स्थितीची आयुक्तांनी पाहणी केली. त्याचप्रमाणे एमआयडीसी भागात करण्यात येत असलेल्या रस्ते काँक्रीटीकरण कामांचीही पाहणी केली. रस्त्यांची कामे करताना रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडाच्या बुध्याभोवती काँक्रीटीकरण करण्यात येऊ नये, तिथे झाडाच्या विस्तारासाठी गोलाकार माती असलेला भाग ठेवावा असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
एमआयडीसी भागात मागील वर्षी पाणी साचलेल्या ठिकाणांची पाहणी करून त्यामधील आवश्यक त्या ठिकाणी कल्व्हर्ट बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामधील डी ब्लॉक नेरूळ मधील कल्व्हर्ट, प्लॉट नं. 16 - 522 समोरील कल्व्हर्ट, एचपी कंपनीच्या गेटसमोरील कल्व्हर्टच्या कामांचीही आयुक्तांनी पाहणी केली.
गणपतीपाडा तुर्भे येथील एमआयडीसी डी ब्लॉक याठिकाणी काँक्रीट रस्त्याची कामे करताना रस्त्याच्या कडेला असलेल्या 540 झा़डांची कोणत्याही प्रकारची हानी करण्यात आलेली नाही त्याबद्दल आयुक्तांनी समाधान व्यक्त केले.
या दौ-यामध्ये आयुक्तांसमवेत शहर अभियंता श्री. संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, अतिरिक्त शहर अभियंता श्री. मनोज पाटील, कार्यकारी अभियंता श्री. गिरीश गुमास्ते व संबंधीत अधिकारी, अभियंते उपस्थित होते.
नागरी क्षेत्राप्रमाणेच एमआयडीसी क्षेत्रातही पावसाळा कालावधीत पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी व घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिले असून एमआयडीसी प्राधिकरणानेही त्यांच्या अखत्यारित असलेल्या पावसाळी कामांबाबत आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. दोन्ही प्राधिकरणांनी परस्पर समन्वयाने पावसाळी कालावधीत नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही अशाप्रकारे समन्वय राखावा असे आयुक्तांनी सूचित केले.
Published on : 01-06-2022 15:41:36,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update