*जलकुंभाची कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे निर्देश*


एमआयडीसी भागातील पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यादृष्टीने तुर्भे विभागामध्ये झोपडपट्टी भागात विविध ठिकाणी जलकुंभ बांधण्यात येत असून त्या कामांच्या सद्यस्थितीची महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. पिण्याचे पाणी हा नागरिकांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय असून जलकुंभाची ही कामे निर्धारित वेळेत पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी याप्रसंगी दिले.
इंदिरानगर येथे 1.5 दशलक्ष लिटर क्षमतेचा भूमीगत जलकुंभ व 1 दशलक्ष लिटर क्षमतेचा उच्चस्तरीय जलकुंभ बांधण्यात येत असून त्याठिकाणी भूमीगत जलकुंभाचे काम पूर्ण झाले आहे. उच्चस्तरीय जलकुंभ बांधण्यासाठी आवश्यक 20 मीटर उंच खांबांचे काम देखील पूर्ण झालेले आहे. उच्चस्तरीय जलकुंभाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे आयुक्तांनी निर्देशीत केले.
हनुमाननगर तुर्भे परिसरातील नागरिकांसाठी 0.5 दशलक्ष लिटर क्षमतेचा भूमीगत जलकुंभ तयार असून जागेच्या सोयीनुसार त्यापासून बाजूलाच 1 दशलक्ष लिटर उच्चस्तरीय जलकुंभ बांधण्यासाठीच्या 20 मीटर उंच खांबांचे काम पूर्ण झालेले आहे.
तसेच तुर्भे स्टोअर येथेही 1.5 दशलक्ष लिटर क्षमतेचा उच्चस्तरीय जलकुंभ बांधण्यात येत असून त्यासाठीच्या 10 मीटर उंच खांबांचे काम पूर्ण झालेले आहे.
या तिन्ही ठिकाणी उच्चस्तरीय जलकुंभांची कामे विहित वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे व त्या बरोबरीनेच पंपींग मशिनरीची कामे पूर्ण करावी असे आयुक्तांनी निर्देशित केले. जलकुंभांची कामे होत असतानाच जलवितरणासाठी आवश्यक जलवाहिन्या टाकण्याची कामे समांतरपणे करणे गरजेचे असल्याचे सूचित करीत या पुढील काळात नागरिकांपर्यंत पाणी पोहचण्यासाठी आवश्यक असलेले जलवाहिन्यांचे जाळे लवकरात लवकर टाकण्याच्या दृष्टीने नियोजन करावे असेही स्पष्ट निर्देश देण्यात आले.
झोपडपट्टी भागातील 3 जलकुंभांप्रमाणेच सेक्टर 19 तुर्भे येथील 5 दशलक्ष लिटर क्षमतेचा भूमीगत जलकुंभ तसेच 2 दशलक्ष लिटर क्षमतेचा उच्चस्तरीय जलकुंभ याचे सुरु असलेले काम विहित वेळेत पूर्ण करावे असे आयुक्तांनी निर्देशित केले. या पाहणी प्रसंगी शहर अभियंता श्री. संजय देसाई व अतिरिक्त शहर अभियंता श्री. मनोज पाटील आणि संबंधीत अभियंते उपस्थित होते.
या जलकुंभांमुळे नवी मुंबईची जलवितरण व्यवस्था अधिक सक्षम होणार असून विशेषत्वाने झोपडपट्टी भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे हे लक्षात घेऊन ही कामे कोणत्याही प्रकारे मुदतवाढ न मागता विहित वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने काटेकोर नियोजन करावे व त्याची योग्य अंमलबजावणी करावी असे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी अभियंत्यांना निर्देश दिले.
Published on : 02-06-2022 12:36:54,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update