*जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त नवी मुंबईकरांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ*

‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ निमित्ताने नवी मुंबई महानगरपालिकेचा परिमंडळ १ विभाग, समाजविकास विभाग, बेलापूर विभाग कार्यालय आणि नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने सेक्टर 11, सीबीडी बेलापूर येथील बेलापूर भवन याठिकाणी व्यसनमुक्ती प्रचार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी बेलापूर विभागाच्या सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी श्रीम.मिताली संचेती यांच्या हस्ते व्यसनमुक्ती पोस्टर्स प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना श्रीम. मिताली संचेती यांनी 31 मे या जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे महत्त्व विषद केले. तंबाखूचे व्यसन आत्ताच थांबविले नाही तर सन 2030 पर्यंत जगातील सुमारे शंभर कोटी लोक तंबाखूपासून होणाऱ्या रोगांमुळे मृत्यू पावतील असा जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला असल्याचे सांगत श्रीम. संचेती यांनी त्यामध्ये 20 ते 30 वर्षे वयोगटातील 40 टक्के लोक असू शकतात अशी माहिती दिली. हा तंबाखूचा अतिरेकी हल्ला आहे हे लक्षात घेऊन प्रत्येकाने स्वतःला तंबाखूपासून दूर ठेवण्याचा ठाम निश्चय करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित आधिकारी व कर्मचारी यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.
सन 2011 मध्ये व्यसनमुक्तीचे धोरण बनविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असून 2022 या महाराष्ट्र राज्याच्या हिरकमहोत्सवी वर्षात महानगरपालिका तसेच महाराष्ट्र सरकारने व्यसनमुक्त महाराष्ट्रच्या दिशेने पाऊल उचलावे असे आवाहन नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे पालघर जिल्हा संघटक श्री मिलिंद रूपचंद पाटील यांनी केले. येणाऱ्या वर्षात शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल्स, धार्मिक स्थळे यांच्यापासून 100 मीटर अंतरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री बंद व्हावी याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती कायदा अंमलबजावणीची मोहीम राबविण्यात येईल अशी माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली.
या कार्यक्रमात अन्वय व्यसनमुक्ती केंद्र, प्रजापिता ब्रह्मकुमारी या सेवाभावी कार्य करणा-या संस्थांनी सहभागी होत पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करून व्यसनमुक्तीचा संदेश प्रसारित केला. तंबाखूजन्य कायद्याची माहिती दर्शविणारे कटआऊट, प्रदर्शनी, पोस्टर्स, पत्रके अशा माध्यमातून तंबाखूजन्य पदार्थ व विक्री कायदा २००३ चा प्रचार, प्रसार व अंमलबजावणीसाठी आयोजित या कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी आपला सहभाग नोंदवत ‘तंबाखू मतलब खल्लास’, ‘तंबाखूमुक्त नवी मुंबई – तंबाखूमुक्त महाराष्ट्र’चा नारा देत तंबाखूजन्य पदार्थपासून दूर राहण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमाच्या यशस्वितेत नशाबंदी मंडळाच्या वतीने मुंबई शहर संघटक रवींद्र गमरे, प्रियांका सवाखंडे, अन्वय व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ. अजित मगदूम, प्रजापिता ब्रम्हाकुमारी संस्थेच्या मीरादिदी, नयन म्हात्रे, मल्लिका सुधाकर, सुदेश परब, सर्जेराव परांडे यांनी महत्वाची भूमिका बजावली.
Published on : 03-06-2022 14:27:39,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update