*कोरोना प्रतिबंधासाठी कृतीशील होण्याचे आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांचे निर्देश* *सार्वजनिक ठिकाणी मास्क लावण्याचे व प्रिकॉशन डोस घेण्याचे नागरिकांना आवाहन*
*मागील पंधरवड्यापासून कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत असून कोव्हीड प्रतिबंधाच्या दृष्टीने अभ्यासपूर्वक नियोजन करण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सर्व रूग्णालये व नागरी आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी तसेच आठही विभाग कार्यालयांचे विभाग अधिकारी यांच्याशी वेबसंवाद साधत कोरोनाबाधित रूग्ण आढळतो अशा सोसायटी व परिसरात टारगेटेड टेस्टींग करणे, कन्टेनमेंट झोनची प्रभावी अंमलबजावणी करणे, लसीकरणावर भर देणे अशा सर्वच बाबींकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश दिले.*
*या बैठकीत आयुक्तांनी वाढत्या कोरोनाबाधित रूग्णसंख्येचा विभागनिहाय तसेच नागरी आरोग्य केंद्रनिहाय आढावा घेतला. सध्या रूग्णसंख्या विखुरलेल्या स्वरूपात दिसून येत असली तरी कोरोना विषाणूचा प्रसार आहे तेथेच रोखण्यासाठी रूग्णाच्या घरातील तसेच त्याच्या निकटच्या व्यक्तींची टेस्टींग करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. विशेषत्वाने ज्येष्ठ नागरिक, कोमॉर्बिड व्यक्ती तसेच गर्भवती महिलांच्या टेस्टींग वाढीसाठी प्रभावी कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.*
कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली तरी नवी मुंबई महानगरपालिकेने कोव्हीड टेस्टींगचे प्रमाण फारसे कमी केले नव्हते. मात्र मागील आठवड्याभराच्या कालावधीत दैनंदिन 30 रूग्णांपर्यंत असलेल्या कोरोना बाधितांच्या संख्येने बघता बघता शंभरी पार केलेली असून वाढता डबलिंग रेट बघता अधिक सतर्क होण्याची गरज असल्याचे स्पष्ट करीत आयुक्तांनी टेस्टिंगचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना केल्या.
सध्या महानगरपालिकेची 4 रूग्णालये, 23 नागरी आरोग्य केंद्रे, एपीएमसीतील 3 मार्केट्स, 8 रेल्वे स्टेशन्स याठिकाणी कोव्हीड टेस्टींग केंद्रे सुरू असून कोणत्या केंद्रावर केलेल्या तपासण्यांत कोरोनाबाधित सापडताहेत याचा तपशील तपासून त्यानुसार कोव्हीड प्रतिबंधात्मक धोरण ठरविण्याच्या दृष्टीने सखोल विचारविनीमय करण्यात आला व नियोजन करण्यात आले.
या बैठकीमध्ये आयुक्तांनी विभाग अधिकारी यांना कन्टेनमेंट झोनची अंमलबजावणी करण्याकडे बारकाईने लक्ष देण्याचे सूचित केले तसेच याबाबत सोसायट्यांना पत्र देण्याच्या सूचना केल्या. त्याचप्रमाणे कोव्हीडच्या औषध साठ्याचाही आढावा घेतला. पावसाळी कालावधी जवळ येत असून पावसाळी कालावधीत वाढणा-या मलेरिया, डेग्यू व तत्सम आजारांच्या अनुषंगाने खबरदारी घेण्याच्या व त्यासाठी औषधसाठा ठेवण्याचाही आढावा घेण्यात आला.
सध्या वाशी येथील सिडको एक्झिबिशन कोव्हीड सेंटर हे राष्ट्रीय स्तरावर नावाजले गेलेले महानगरपालिकेचे सर्वोत्तम कोव्हीड सेंटर कार्यान्वित असून त्याठिकाणी 10 कोरोनाबाधित रूग्ण उपचारार्थ दाखल आहेत. 1200 ऑक्सिजन बेड्स व 75 आयसीयू बेड्स सुविधेच्या या कोव्हीड सुविधेशिवाय महानगरपालिकेने 400 आयसीयू बेड्स व 400 व्हेन्टिलेटर्सचे नियोजन करून ठेवलेले आहे. त्याचाही आढावा आयुक्तांनी यावेळी घेतला.
*कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये व त्यांना बेड्स, रूग्णवाहिका उपलब्धतेमध्ये अडचण भासू नये याकरिता 24 तास वॉर रूम पुन्हा कार्यान्वित करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.*
*कोव्हीडची लागण झाली तरी लसीकरण झाले असले तर प्रकृती गंभीर होण्यापर्यंत परिस्थिती जात नाही हे निदर्शनास आले असल्याने सध्याची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेऊन ज्या ज्येष्ठ नागरिकांचा तिसरा डोस अर्थात प्रिकॉशन डोस राहिला आहे त्यांच्यापर्यंत पोहचून त्यांना प्रिकॉशन डोस देण्याबाबतची कार्यवाही जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. त्याचप्रमाणे सध्या सुरू असलेल्या हर घर दस्तक मोहिमेअंतर्गत शाळांना सुट्टी असल्याने 12 ते 14 वयोगटातील मुलांच्या लसीकरणावर झालेला परिणाम लक्षात घेऊन त्या मुलांच्या लसीकरणाकडेही विशेष लक्ष देण्याचे आयुक्तांनी सूचित केले.*
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त श्री.संजय काकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण व डॉ. अजय गडदे हे बैठक कक्षात तसेच इतर सर्व वैद्यकीय अधिक्षक, वैद्यकीय अधिकारी, सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी हे ऑनलाईन उपस्थित होते.
*कोरोना बाधितांच्या सध्याच्या वाढत्या संख्येकडे प्रत्येकाने गांभीर्याने बघण्याची गरज असून नागरिकांनी विशेषत्वाने सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्कचा अनिवार्यपणे वापर करणे स्वआरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. त्यामुळे मास्क, सुरक्षित अंतर आणि वारंवार हात धुणे ही कोरोना प्रतिबंधाची त्रिसूत्री अंमलात आणावी आणि विहित वेळेत कोव्हीड लसीचा प्रिकॉशन डोस घेऊन स्वत:ला संरक्षित करून घ्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.*
Published on : 07-06-2022 15:14:06,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update