*राजर्षि शाहू महाराज म्हणजे सामाजिक समतेचा स्वकृतीतून पुरस्कार करणारा* *युगप्रवर्तक राजा – डॉ. विजय चोरमारे*
जगण्याचे असे एकही क्षेत्र नाही जिथे राजर्षि शाहू महाराजांनी स्पर्श केला नाही. शिक्षण, कला, क्रीडा, उद्योग, पाणीपुरवठा, महिला सक्षमीकरण, अंधश्रध्दा निर्मुलन, आपत्ती व्यवस्थापन आणि महत्वाचे म्हणजे सामाजिक समता अशा विविध विषयांमध्ये अतिशय प्रभावी काम राजर्षि शाहू महाराजांनी केले असून काळाच्या पुढचे पाहणारा हा युगप्रवर्तक राजा असल्याचे मत सुप्रसिध्द साहित्यिक तथा महाराष्ट्र शासनाच्या राजर्षि शाहू महाराज चरित्र साधने प्रकाशन समिताचे सदस्य सचिव डॉ विजय चोरमारे यांनी व्यक्त केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनांच्या पूर्वसंध्येला ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात ‘विचारवेध’ व्याख्यान शृंखलेअंतर्गत ‘आधुनिक क्रांतीचे राजर्षि’ या विषयावर डॉ. विजय चोरमारे यांनी राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या जीवन चरित्रातील अनेक दाखले देत त्यांच्या सर्वस्पर्शी महनीय कार्याचे महत्व विषद केले. याप्रसंगी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी त्यांचा सन्मान केला.
भविष्याचा वेध घेण्याची दूरदृष्टी शाहू महाराजांकडे असल्याने आजच्या काळातही ते समकालीन वाटतात असे कथन करीत डॉ. विजय चोरमारे यांनी इंग्रजी राजवटीच्या प्रतिकूल काळात महाराजांनी इतके पुरोगामी निर्णय घेतले हे समजून घेतले तर त्यांचे महानपण अधिक मोठे असल्याचे जाणवते अशा शब्दात महाराजांचे महानपण मांडले.
उत्तर प्रदेशातील कुर्मी समाजाने त्यांना ‘राजर्षि’ पदवी बहाल केली कारण त्यांच्यामध्ये राजासारखे ठाम निर्णय घेण्याची क्षमता होती आणि त्याचवेळी समाजातील शेवटच्या उपेक्षित घटकाच्या न्याय व हक्कासाठी भूमिका घेण्याची ऋषीसारखी तळमळ होती त्यामुळे ते ख-या अर्थाने राजर्षि पदवी भूषविणारे व्यक्तीमत्व होते असे डॉ. विजय चोरमारे म्हणाले.
महाराजांनी भेदाभेद न मानणारा कायदा केला, उपेक्षित घटकांना आरक्षण दिले, शिक्षणच माणसाच्या प्रगतीचा आधार आहे हे ओळखून शिक्षण सक्तीचे केले, जे पालक मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना 1 रूपया दंड लागू केला, सर्वांना एकत्र शिक्षण देऊन सामाजिक समतेचा पुरस्कार केला, उच्च शिक्षणापासून कोणी वंचित राहू नयेत म्हणून वसतिगृहे सुरू केली, उपेक्षित समाजघटकांना प्रवाहात आणण्यासाठी रोजगार उपलब्ध करून दिला अशा विविध बाबी त्यांनी अनेक उदाहरणे देत, महाराजांच्या विविध गोष्टी सांगत उलगडल्या.
राज्य उभे करण्यासाठी सांस्कृतिक जडणघडण महत्वाची असते हे मानणा-या शाहू महाराजांनी सांस्कृतिक विकासावर भर दिला. सामाजिक सुधारणांची सुरूवात स्वत:पासून करून प्रसंगी कुटुंबियांचा, समाजाचा विरोध स्विकारून समाजात कोणावरही अन्याय होणार नाही व अन्याय झाला असेल तर तो दूर करण्याची समानतावादी भूमिका घेतली हे विचारसूत्रच त्यांचे महानत्व दर्शविते असे सांगत डॉ. विजय चोरमारे यांनी तशा प्रकारची विविध उदाहरणे दिली.
आंतरजातीय विवाह, विधवा पुनर्विवाह यासाठी कायदे करणा-या या पुरोगामी विचारांच्या लोकराजाने महिला सक्षमीकरणावर भर दिला. 1896 च्या भीषण दुष्काळात लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलाच शिवाय वृध्द, अपंग, मुले यांची विशेष काळजी घेत सुयोग्य आपत्ती व्यवस्थापन केले. शेतक-यांसाठी कर्जयोजना केली. शेती विकासासाठी नवनवीन प्रयोग केले. राधानगरी धरणाच्या माध्यमातून जलनियोजनाकडे बारकाईने लक्ष दिले. परदेशी दौरा करताना तेथील विविध व्यवसाय विषयक बाबींचा इथल्या लोकांना शेतीसह जोडधंद्यासाठी कसा उपयोग करून देता येईल याचाच वाचार करून इकडे आल्यावर नवनव्या संकल्पना राबविल्या. खासबागेसारखे कुस्तीसाठी वैशिष्यपूर्ण मैदान उभे केले. अशा विविध माध्यमांतून सामाजिक अभिसरण घडवित राजर्षि शाहू महाराजांनी आधुनिक पुरोगामी विचार रूजविले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे राहणा-या शाहू महाराजांनी माणगाव परिषदेत हे सर्व देशाचे पुढारी होतील हा दाखविलेला विश्वास पुढे सार्थ झाल्याचे सांगत डॉ. विजय चोरमारे यांनी फुले-शाहू-आंबेडकर ही विचारधारा छत्रपती शिवरायांच्या समानतेच्या विचारसूत्राचे प्रवाहित होत गेलेले रूप असल्याचे सांगितले.
बाबासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक राहून उभारलेले स्मारक अशा शब्दात स्मारकातील सुविधा व उपक्रमांचा गौरव
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेकर यांचे नवी मुंबई महानगरपालिकेचे स्मारक बाबासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक राहून उभारलेले देशातील एक महत्वाचे आणि आदर्शवत स्मारक असल्याचे अधोरेखित करीत डॉ. विजय चोरमारे यांनी याठिकाणी सातत्याने राबविल्या जात असलेल्या व्याख्यानांसारख्या वैविध्यपूर्ण उपक्रमांची प्रशंसा केली. स्मारकातील ई लायब्ररीसह संपन्न ग्रंथालय, छायाचित्रांच्या माध्यमातून बाबासाहेबांचे जीवनचरित्र समजून सांगणारे भव्यतम दालन, बाबासाहेबांच्या भाषणाची होलोग्राफिक संकल्पना या सा-याच गोष्टी स्मारकाच्या प्रेमात पाडतात असे ते म्हणाले.
सांस्कृतिकता ही माणसाचे माणूसपण वृध्दिंगत करणारी गोष्ट असून कोणत्याही शहराचे मोठेपण हे त्याच्या सांस्कृतिक वैभवावर अवलंबून असते असे सांगत डॉ. विजय चोरमारे यांनी शहराच्या सांस्कृतिक विकासासाठी नवी मुंबई महानगरपालिका नियमितपणे विविध कार्यक्रम राबवित असल्याबद्दल आयुक्त श्री. अभिजीत बांगर व सहका-यांचे कौतुक केले.
Published on : 26-06-2022 11:00:05,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update