*स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त नमुंमपा ग्रंथालयास ग्रंथ भेट व वृक्षारोपण*
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 67 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील बँकेच्या शाखेमार्फत नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ग्रंथालयास 200 पुस्तकांची ग्रंथभेट देण्यात आली. याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेचे समाज विकास विभाग उप आयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, स्मारकाच्या सुविधा नियंत्रक श्रीम. संध्या अंबादे यांचेकडे बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्री. कपील गर्ग आणि नमुंमपा मुख्यालय शाखा व्यवस्थापक श्रीम. शामली आरस आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिकेचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे देशातील सर्वोत्तम स्मारक म्हणून नावाजले जात असून येथील ग्रंथालय ई-लायब्ररी सुविधेसह अद्ययावत आहे. या पुस्तक भेटीमुळे ग्रंथालयाच्या समृध्दीत भर पडणार आहे.
त्याचप्रमाणे बँकेच्या वतीने सेक्टर 21 नेरुळ येथील रॉक गार्ड़न मध्ये 240 देशी प्रजातींची झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेचे उद्यान उप आयुक्त श्री. नितीन नार्वेकर, उद्यान अधिक्षक श्री. भालचंद्र गवळी, बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्री. कपील गर्ग व नमुंमपा मुख्यालय शाखा व्यवस्थापक श्रीम. शामली आरस उपस्थित होते. त्यांच्याहस्ते बकुळ, अनंत, कडुनिंब, करंज, बहावा अशी जैवविविधतेला पूरक देशी वृक्षरोपे लावण्यात आली.
बॅकेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत ग्रंथभेट व वृक्षारोपण यासारखे उपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल महानगरपालिकेच्या वतीने स्टेट बँक ऑफ इंडिया प्रशासनाला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत अभिनंदन करण्यात आले.
Published on : 04-07-2022 14:47:36,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update