देशभक्तीचे दर्शन घडवित 14 ऑगस्टला नवी मुंबईकर ‘अमृत महोत्सव रन’ मध्ये धावणार
दि.15 ऑगस्ट 2022 रोजी संपूर्ण देशभरात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अतिशय उत्साहाने साजरा होत आहे. त्या निमित्त 09 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार “स्वराज्य महोत्सव” साजरा करण्यात येत असून त्यानिमित्त लोकसहभागातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.
या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका व नवी मुंबई पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने आणि एलसीएफ यांच्या सहकार्याने रविवार दि. 14 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 6 वाजता ‘अमृत महोत्सव रन’ पामबीच मार्गावर आयोजित करण्यात येत आहे.
10 कि.मी. व 5 कि.मी. या अंतराच्या या अमृत महोत्सव रनची सुरुवात नवी मुंबई महानगरपालिका मु्ख्यालय येथून होणार आहे.
10 कि.मी. अंतराच्या रनकरिता न.मुं.म.पा.मुख्यालयापासून पामबीच रोडवर 5 कि.मी. वर निश्चित केलेल्या ठिकाणाला वळसा घालून पुन्हा न.मुं.म.पा.मुख्यालय येथे या रनची सांगता होईल.
5 कि.मी. अंतराकरिता न.मुं.म.पा. मुख्यालयापासून पामबीच रोडवर 2.5 कि.मी. वर निश्चित केलेल्या ठिकाणाला वळसा घालून पुन्हा न.मुं.म.पा.मुख्यालय येथे या रनची सांगता होईल.
अशाप्रकारे दोन्ही रनची सुरुवात न.मुं.म.पा. मुख्यालयापासून होऊन न.मुं.म.पा.मुख्यालय येथेच रनची सांगता होणार आहे.
विशेष म्हणजे या अमृत महोत्सव रनमध्ये सहभागी होणेकरीता 1000 हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी यापुर्वीच नावाची नोंदणी केलेली आहे.
नागरिकांना https:/youtoocanrun.com/races/navi-mumbai-10k/ या वेबलिंकचा वापर करुन या रनमध्ये सहभागी सशुल्क नोंदणी करून सहभागी होता येईल. नोंदणी केलेल्या सर्व धावपटूंना बीब, टाईमर चिप्स, मेडल्स व टी-शर्टस वितरित करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे रनमधील पहिल्या 3 क्रमाकांस स्मृतिचिन्ह प्रदान करुन गौरवण्यात येणार आहे. सर्व धावपटूंकरिता रन समाप्त झाल्यानंतर अल्पोपहाराची व्यवस्था न.मुं.म.पा.मुख्यालयात सांगता स्थळी करण्यात येणार आहे.
तरी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असताना त्या अंतर्गत “स्वराज्य महोत्सव” निमित्त आयोजित ‘अमृत महोत्सव रन’ मध्ये जास्तीत जास्त धावपटू व नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी सहभागी होऊन भारत देशाविषयी असलेले आपले प्रेम व आदर अभिव्यक्त करावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर आणि पोलीस आयुक्त श्री. बिपीन कुमार सिंह यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 23-07-2022 14:50:30,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update