*मलेरिया, डेंग्यु, स्वाईन फ्ल्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे काटेकोर लक्ष देण्याचे आयुक्तांचे निर्देश*
मागील आठवड्याभरापासून पावसाने काही प्रमाणात उघडीप घेतली असून साचलेल्या पाण्यात डास अंडी घालत असल्याने हा काळ डास उत्पत्तीच्या दृष्टीने जोखमीचा आहे हे लक्षात घेऊन डास उत्पत्ती स्थानांचा शोध घेणे व ती नष्ट करणे या मोहिमा अधिक काळजीपूर्वक व तीव्रतेने राबविण्याचे निर्देश आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागास दिले. पावसाळी कालावधीतील साथरोग तसेच मलेरिया, डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू यासारख्या आजारांविषयी खबरदारी घेण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागाची विशेष बैठक घेतली.
यावेळी मलेरिया व डेंग्यूच्या प्रार्दुभावाचा सविस्तर आढावा घेताना आयुक्तांनी ज्या परिसरात रुग्ण आढळले आहेत अशी नागरी आरोग्य केंद्रनिहाय विभागणी करावी व त्यानुसार कृती आराखडा तयार करावा असे निर्देश दिले. त्याचप्रमाणे नागरी आरोग्य केंद्राच्या स्तरावरही कोणत्या भागात रुग्ण आढळताहेत त्या भागाकडे जास्त लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देशित केले.
मागील 2 वर्षातील आकडेवारीचा तुलनात्मक अभ्यास करून त्या भागांकडे विशेष लक्ष देण्याचे सूचित करतानाच बांधकाम साईट्स या डास उत्पत्तीच्या दृष्टीने जोखमीच्या असून त्याकडे अधिक काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले. डास उत्पत्ती स्थाने शोध मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी सुक्ष्म नियोजन करावे असे निर्देश त्यांनी दिले. संबंधीत नागरी आऱोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांनी डास उत्पत्ती स्थाने शोध मोहिम तसेच धुरीकरण कार्यवाहीवर बारकाईने लक्ष द्यावे व या यंत्रणेवर संपूर्ण नियंत्रण ठेवावे अशाही सूचना आयुक्तांनी केल्या.
बरेचदा मोठ्या सोसायट्यांमधून डास उत्पत्ती स्थाने शोधासाठी येणा-या महानगरपालिका कर्मचा-यांना प्रतिबंध केला जातो. या अनुषंगाने शोध मोहिमेसाठी सोसायट्यांमध्ये जाण्यापूर्वी तेथील अध्यक्ष अथवा सचिव यांना कळवून जावे व जाताना शोध पथकामध्ये शक्यतो एक तरी महिला कर्मचारी असावी अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. मात्र प्रवेश नाकारणा-या सोसायट्यांवर सामाजिक आरोग्यविषयक कार्यवाहीला बाधा आणल्याने दंडात्मक कारवाई करण्यात यावी असेही निर्देश आयुक्तांनी दिले.
महानगरपालिकेच्या वाशी रुग्णालयात मलेरिया व डेंग्यू रुग्णांवरील उपचारांकरिता वेगळा कक्ष स्थापन करण्याचे आयुक्तांनी निर्देश दिले. तसेच डेंग्यूच्या आजारामध्ये प्लेटलेट्सची रुग्णांना भासणारी गरज महानगरपालिकेमार्फत पूर्ण करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले. प्लेटलेट्स करिता आवश्यक असणारी मशीन महानगरपालिकेची स्वत:ची असावी असेही आयुक्तांनी निर्देशित केले.
डेंग्यू व मलेरिया प्रमाणेच स्वाईन फ्ल्यूचे रुग्णही आढळत असून त्याबाबत अधिक खबरदारी घेण्याचे निर्देशित करतानाच स्वाईन फ्ल्यूच्या लक्षणांविषयी तसेच तो होऊ नये म्हणून घ्यावयाच्या खबरदारीविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी. त्याचप्रमाणे खाजगी व्यावसायिकांनाही त्याबाबत अवगत करावे असे आयुक्तांनी सूचित केले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. धनवंती घाडगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मलेरिया, डेंग्यू व स्वाईन फ्ल्यू प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात असून नागरिकांनी डासांची निर्मिती होऊ नये म्हणून घर व परिसरात कुठेही पाणी साचू न देण्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच डास उत्पत्ती स्थाने शोधण्यासाठी अथवा रासायनिक फवारणीसाठी घरी, सोसायटी, वसाहतीत येणा-या आरोग्य कर्मचा-यांना संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 25-07-2022 17:19:30,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update