नवी मुंबई महानगरपालिका शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पाठ्यपुस्तके
शाळा सुरु होताना विद्यार्थ्यांच्या हातात पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तक असले पाहिजे यादृष्टीने नियोजन करावे अशाप्रकारे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी शिक्षण विभागाला दिलेल्या निर्देशानुसार नियोजन करित शाळा सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी मुलांच्या हातात पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात आली.
शाळा सुरु होताच नव्या इयत्तेच्या नव्या पुस्तकांचे अप्रुप प्रत्येक विद्यार्थ्याला असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील ही असुप्त इच्छा लक्षात घेऊन आयुक्तांनी तशाप्रकारे कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने शिक्षण विभागाने एक महिना आधीपासूनच पाठ्यापुस्तक मंडळाकडे आपली मागणी नोंदविली होती. केवळ मागणी नोंदवून न थांबता त्याचा सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. त्यामुळे महानगरपालिकेच्या 53 प्राथमिक शाळांतील मुलांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देणे शक्य झाले.
अशाचप्रकारे महानगरपालिकेच्या 24 माध्यमिक शाळा आहेत. तेथील विद्यार्थ्यांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत पुस्तके खरेदी करून पुरविण्यात येतात. त्याचप्रमाणे सीबीएसई बोर्डाच्या 2 महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांना नवनीतकडून पुस्तके घेऊन वितरित करण्यात येतात. याबाबतची प्रक्रिया देखील लवकर सुरु करून त्याचा सातत्याने पाठपुरावा करीत शाळा सुरु होण्याच्या दोन दिवस आधीच पाठ्यपुस्तके उपलब्ध करून घेण्यात आली.
पाठ्यपूस्तकांची मागणी नोंदवितानाच त्याचे शाळानिहाय वितरण करण्याबाबत कृती आराखडा तयार करण्यात आला होता. त्याची सुयोग्य अंमलबजावणी पुस्तके उपलब्ध झाल्यानंतर लगेचच करण्यात आली व पाठ्यपुस्तकांचे केंद्रनिहाय वितरण करण्यात आले. त्यामुळे प्रत्येक शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देणे शक्य झाले.
महानगरपालिका शाळांतील गुणवत्तापूर्ण शिक्षण व्हिजनमुळे महानगरपालिका शाळांतील पटसंख्या वाढताना दिसत आहे. यामध्ये खाजगी शाळांतून महानगरपालिका शाळेत प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. या वाढीव पटसंख्येमुळे महानगरपालिका शाळेत यावर्षीच प्रवेश घेणा-या नवीन विद्यार्थ्यांनाही लवकरात लवकर पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरु असून याबाबत सातत्यपूर्ण पाठपुरावा ठेवून पाठ्यपुस्तके उपलब्ध करून घ्यावीत असे आयुक्तांनी निर्देशित केले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके उपलब्ध झाल्याने त्यांच्या शैक्षणिक विकासात कोणत्याही प्रकारे अडचण आलेली नसल्याने विद्यार्थी व पालकांमार्फत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
Published on : 25-07-2022 17:22:44,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update