*विभाग कार्यालय पातळीवरील ‘स्वच्छ मंथन’ स्पर्धेतून स्वच्छता कार्याला गती*
“स्वच्छ सर्वेक्षण 2023” ला प्रारंभ करताना सूक्ष्म नियोजन (Micro Planning) करण्याकडे विशेष लक्ष दिले जात असून विभाग कार्यालय पातळीवर अधिक चांगले काम व्हावे यादृष्टीने “स्वच्छ मंथन 3.0” या अंतर्गत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून विभागंमधील ही स्पर्धा 1 जुलै 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीत 6 टप्प्यांमध्ये राबविण्यात येत असल्याचे जाहीर करत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी यामध्ये आठही विभागांनी प्रत्येक दोन महिन्यांनी होणा-या परिक्षणांती सर्वोत्कृष्ट स्वच्छ वार्डचा फिरता चषक आपल्याकडे राहील यासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचे ध्येय नजरेसमोर ठेवून स्वच्छता कार्याला गती द्यावी असे सूचित केले.
स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये 10 ते 40 लाख लोकसंख्येच्या मोठ्या शहरांमध्ये देशातील सर्वोत्तम प्रथम क्रमांकाचे शहर असण्याचा बहुमान नवी मुंबई महानगरपालिकेस प्राप्त झालेला असून स्वच्छ सर्वेक्षण 2022 चे परीक्षण अंतिम टप्प्यात आहे. स्वच्छता ही नियमित करण्याची गोष्ट असल्याने स्वच्छताविषयक कामाला अधिक सुनियोजितपणा यावा व विभागाविभागांमध्ये निकोप स्पर्धा होऊन त्याचा परिणाम संपूर्ण शहरातील स्वच्छतेची गुणवत्ता उंचाविण्यासाठी व्हावा या दृष्टीने आयुक्तांच्या संकल्पनेनुसार “स्वच्छ मंथन 3.0” ही विभाग कार्यालय स्तरावरील स्वच्छता स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. याबाबत संबंधित सर्व अधिका-यांशी संवाद साधत आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी स्पर्धेची माहिती दिली.
भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांनी मागील वर्षी राष्ट्रीय महापौर परिषदेला संबोधित करताना शहरांमध्ये विभाग पातळीवर स्वच्छता स्पर्धांचे आयोजन करण्याची संकल्पना मांडली होती. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेने मागील वर्षीपासूनच विभाग कार्यालय स्तरावर स्वच्छता स्पर्धेचे आयोजन केले होते व त्याचे परीक्षण करून निकालही जाहीर केला होता आणि पहिल्या 3 क्रमांकाच्या विभाग कार्यालयांना सन्मानित केले होते.
या स्वच्छ विभाग स्पर्धेच्या कार्यप्रणालीमध्ये अधिक सुसूत्रता आणत यावर्षीच्या “स्वच्छ मंथन 3.0” स्वच्छता स्पर्धेसाठी स्वच्छताविषयक 21 निकष असणार असून हे निकष स्वच्छ सर्वेक्षणाच्या परीक्षणाच्या निकषांना अनुरुप असल्याची माहिती आयुक्तांनी यावेळी दिली.
सहा टप्प्यांमधील या स्पर्धेचा प्रत्येक टप्पा हा 45 दिवसांचा असणार असून यामध्ये विभागांमार्फत कार्यवाहीचा कालावधी 30 दिवस, कार्यवाहीची माहिती गुगलशीटमध्ये दाखल करण्याचा कालावधी 7 दिवस व सादर केलेल्या माहितीच्या अनुषंगाने त्याचे मुख्यालय स्तरावरून क्षेत्रीय तपासणी व परीक्षण करण्याचा कालावधी 7 दिवस असणार आहे.
प्रत्येक टप्प्यानंतर त्या टप्प्यातील सर्वोत्कृष्ट विभाग जाहीर केला जाणार असून त्यांना “स्वच्छ मंथन फिरता चषक” प्रदान केला जाणार आहे. जाहीर केलेल्या सहा टप्प्यांमध्ये हा चषक प्रत्येक टप्प्यातील गुणांकनानुसार सर्वाधिक गुण मिळविणा-या विभागाकडे जाणार असून सहा टप्पे पूर्ण झाल्यानंतर सर्वाधिक वेळा फिरता चषक पटकाविणा-या विभागास गौरविण्यात येऊन त्यांच्या कार्यक्षेत्रात स्वच्छता विषयक उपक्रम राबविण्यासाठी पारितोषिक स्वरुपात रक्कम प्रदान केली जाणार आहे. त्याचप्रमाणे विभागांनी मागील वर्षीच्या तुलनेत किती प्रमाणात स्वच्छता विषयक कामाची गुणवत्ता उंचाविली याचाही अंतिम गुणांकनात विचार केला जाणार आहे.
यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे दररोज निर्माण होणा-या कच-याचे निर्मितीच्या ठिकाणीच वर्गीकरण केले जाणे अनिवार्य असून ज्या सोसायट्या आपला कचरा वर्गीकरण करून देणार नाहीत त्या सोसायट्यांचा कचरा महानगरपालिकेमार्फत संकलीत केला जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका आयुक्तांनी यावेळी व्यक्त केली. 100 टक्के कचरा वर्गीकरण होणे अपेक्षित असून तसे स्पष्ट संदेश सोसायट्यांचे पदाधिकारी यांना द्यावेत असेही आयुक्तांनी निर्देशित केले. याशिवाय विभागांमध्ये एकाही जागी उघड्यावर कचरा टाकला जाणार नाही याची काटेकोर काळजी घेऊन अशा जागा असूच नयेत याचेही बारकाईने नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या. स्वच्छता स्पर्धेच्या परीक्षणामध्ये अशा जागा आढळल्यास नकारात्मक गुणांकन (Negative Marks) असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे, प्रशासन विभागाचे उप आयुक्त श्री. जयदीप पवार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, परिमंडळ 1 चे उप आयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार व परिमंडळ 2 चे उप आयुक्त डॉ. अमरिश पटनिगीरे हे प्रत्यक्ष तसेच आठही विभागांचे विभाग अधिकारी वेब प्रणालीव्दारे उपस्थित होते.
स्वच्छ आणि सुंदर शहर ही नवी मुंबईची ओळख असून ही ओळख कायमस्वरुपी टिकविण्यासाठी स्वच्छतेमध्ये अधिकाधिक सुधारणा करीत राहणे गरजेचे आहे. यादृष्टीने विभाग कार्यालय स्तरावर आयोजित “स्वच्छ मंथन” स्पर्धेतून शहर स्वच्छतेला नवा आयाम लाभेल व नागरिकाचा स्वच्छता कार्यात सहभाग वाढेल असा विश्वास महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी व्यक्त केला.
Published on : 26-07-2022 12:29:10,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update