*मंकीपॉक्स रोखण्यासाठी दक्ष राहण्याचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे निर्देश* परदेशातून आलेल्या नागरिकांवर महानगरपालिका ठेवणार लक्ष
कोरोना संक्रमणातून काहीसे सावरत असतानाच आता मंकीपॉक्स या नव्या आजाराचे संकट जगासमोर उभे ठाकले असून जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी (Global Health Emergency) म्हणून जाहीर केलेले आहे. या आजाराचा रुग्ण महाराष्ट्र राज्यात अद्याप सापडलेला नसला तरी केरळ व दिल्ली येथे एकूण 4 रुग्ण आढळलेले आहेत.
या पार्श्वभूमीवर मंकीपॉक्सचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आधीच खबरदारी घेणे आवश्यक असून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागाची बैठक घेत परदेशातून नवी मुंबईत आलेल्या नागरिकांची माहिती घ्यावी व त्यांची आरोग्य स्थिती जाणून घ्यावी असे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या 23 नागरी आरोग्य केंद्रांमार्फत त्यांच्या कार्याक्षेत्रातील परदेशातून आलेल्या नागरिकांच्या घरी भेट दिली जाणार आहे.
पावसाळ्यात होणा-या आजारांची लक्षणे साधारणत: सारखीच असल्याने मंकीपॉक्सच्या लक्षणांबाबत नागरिकांना माहिती असावी यादृष्टीने व्यापक जनजागृती करण्याच्या सूचनाही आयुक्तांमार्फत देण्यात आल्या. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे उपस्थित होते.
ऑर्थोपॉक्स व्हायरस या विषाणूमुळे मंकीपॉक्स आजार होतो. अंगभरून ताप येणे, डोके दुखी, अंगदुखी, प्रचंड थकवा जाणवणे, घाम येणे, अंगावर पुरळ येणे, कानामागे अथवा काखेत लसीका ग्रंथींना सूज येणे अशी लक्षणे मंकीपॉक्सच्या आजारात जाणवत असून लागण झाल्यानंतर साधारणत: 6 ते 13 दिवस इतका मंकीपॉक्स आजाराचा कालावधी आहे. अंगावर पुरळ उठण्यापूर्वी 1 ते 2 दिवस आधीपासून ते त्वचेवर येणा-या फोडांवरील खपल्या पडेपर्यंत किंवा त्या पूर्णपणे ब-या होईपर्यंत मंकीपॉक्सचा संसर्ग कालावधी आहे.
मंकीपॉक्स आजाराने ग्रस्त व्यक्तीशी शरीर द्रव, लैंगिक संपर्क, जखम व घाव यातील स्त्राव याव्दारे थेट शारीरिक संपर्क आल्यास किंवा बाधीत व्यक्तींनी वापरलेले कपडे वापरल्यास, बाधीत व्यक्तीच्या जास्त काळ संपर्कात आल्यास अथवा त्या व्यक्तीच्या श्वसन मार्गातून बाहेर पडणा-या मोठ्या थेंबांवाटे मंकीपॉक्स आजाराचा प्रसार होऊ शकतो. त्यामुळे या आजाराबाबत गंभीर राहून संलग्न लक्षणे जाणवल्यास आवश्यक वैद्यकीय चाचण्या करून घेणे महत्वाचे आहे.
या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत सतर्कतेने जलद पावले उचलावीत व मंकीपॉक्सबाबत नागरिकांना माहिती होण्यासाठी त्याची लक्षणे तसेच तो होऊ नये म्हणून घ्यावयाची खबरदारी या अनुषंगाने जनजागृतीवर भर द्यावा त्याचप्रमाणे नागरिकांसारखेच खाजगी डॉक्टरांनाही याविषयी माहिती करून द्यावी असे निर्देश आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागास दिले.
Published on : 26-07-2022 14:52:29,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update