*सामान्य माणसाला मराठी साहित्याचा केंद्रबिंदू बनविणारे अण्णा भाऊ युगप्रवर्तक साहित्यिक – डॉ.प्रा.शरद गायकवाड*


कष्टकरी श्रमजीवी सामान्य माणूस हा कथा-कादंब-यांचा नायक होऊ शकतो हे अण्णा भाऊंनी आपल्या लेखनातून दाखवून दिले. अशाप्रकारे तत्कालीन मराठी साहित्याचा केंद्रबिंदू बदलणारे ते युगप्रवर्तक साहित्यिक होते असे सांगत साहित्यिक डॉ प्रा. शरद गायकवाड यांनी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास विविध प्रसंग, घटना, कथानके सांगत उलगडवला.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीदिनाच्या पूर्वसंध्येला ऐरोली येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब अंबेडकर स्मारक सभागृहात ‘विचारवेध’ या कार्यक्रम शृंखले अंतर्गत सुप्रसिध्द साहित्यिक डॉ प्रा शरद गायकवाड यांनी ‘साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे – जीवन प्रवास’ या विषयावरील माहितीपूर्ण व्याख्यानातून अण्णा भाऊंची महानता विषद केली.
‘गावकुसाबाहेरची बहुजनगाथा लिहिणारा आधुनिक तुकाराम’ म्हणजे हा तुकाराम भाऊराव साठे अर्थात अण्णा भाऊ साठे असल्याचे सांगत डॉ. शरद गायकवाड यांनी साहित्य म्हणजे परिवर्तनाचे शस्त्र म्हणून अण्णाभाऊंनी वापरले आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न साकारण्यासाठी उभे आयुष्य खर्ची घातले असे अनेक उदाहरणे देत मांडले.
1958 मध्ये दादरच्या साहित्य संमेलनात “ही पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर नव्हे तर माणसाच्या तळहातावर असल्याचे” ठामपणे सांगणारे अण्णा भाऊ वैज्ञानिक जाणीवेचे लेखक होते हे डॉ. शरद गायकवाड यांनी ‘मरीआईचा गाडा’ ही अण्णाभाऊंची कथा सांगत स्पष्ट केले.
आपल्या केवळ 49 वर्षाच्या आयुष्यात अण्णा भाऊंनी 35 कादंब-या, 19 कथासंग्रहातील 250 हून अधिक कथा, 14 लोकनाटये, शेकडो पोवाडे, वग, छकडी, लोकगीते तसेच प्रवास वर्णन असे विपुल साहित्य लिहिले 27 भाषांमध्ये त्यांची ग्रंथसंपदा अनुवादित झाली. केवळ दीड दिवसांची शाळा पाहिलेल्या अण्णा भाऊंच्या साहित्यकृतींचा अभ्यास आज देशातील नामांकित विदयापिठातील विदयार्थी उच्च शिक्षणासाठी करताहेत असे सांगत डॉ शरद गायकवाड यांनी अण्णाभाऊंच्या पुस्तकांतून मानवी मूल्यांचे संरक्षण व संवर्धन होत असल्याचे उदाहरणे देत स्पष्ट केले. घामाची महती सांगणारी व श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करुन देणारी साहित्यनिर्मिती करीत अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यकृतीतून बाणेदार नायिका चितारली तसेच स्त्री - पुरुष समानता आणली असेही अनेक दाखले देत त्यांनी पटवून दिले.
प्रबोधनाचे अंजन घालणारे लिखाण हा अण्णा भाऊंचा स्थायीभाव असून माणूस, माणुसकी व मानवतावाद असे आंबेडकरी तत्वज्ञान ठामपणे मांडणारे अण्णा भाऊ आंतरराष्ट्रीय दर्जाचे मानवतावादी लेखक होते अशा शब्दात त्यांचा गौरव केला.
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात हातात डफ घेऊन योध्याच्या आवेशात मंच गाजविणारे अण्णाभाऊ गोवा मुक्ती संग्राम, मराठवाडा मुक्ती संग्रामात आपल्या ओजस्वी शाहिरीतून तडफेने जनजागृती करतात, तेव्हा शाहीरांचे शाहीर असा त्यांचा सन्मान होतो हे विविध पोवाडयांची उदाहरणे देत डॉ. शरद गायकवाड यांनी विषद केले. महाराष्ट्र राज्य निर्मितीत अण्णाभाऊंचे योगदान अतिशय मोठे असल्याचे सांगत अण्णा भाऊंच्या ‘माझी मैना गावाकडं राहिली’ या गाजलेल्या छक्कडचा अर्थ त्यांनी उलगडवून दाखविला.
“मी सदैव माझ्या माणसांची मुर्वत ठेवून लिहितो” असे म्हणणा-या अण्णाभाऊंची ‘फकिरा’ कादंबरी पाचवीत असताना वाचनात आली आणि लहानपणी पोतराज म्हणून दारोदारी हिंडणारा माझ्यासारखा मुलगा जागरूक होऊन आज साहित्यातील डॉक्टर, प्राध्यापक होऊ शकला असे स्वत:चे उदाहरण देत डॉ. शरद गायकवाड यांनी अण्णा भाऊंच्या साहित्याची महती स्पष्ट केली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे तेथील आधुनिक ई लायब्ररीसह ग्रंथालय, चरित्र चित्रदालन अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधांप्रमाणेच त्याठिकाणी विचारवेध, जागर अशा उपक्रमांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणा-या नामांकित व्याख्यात्यांच्या कार्यक्रमांमुळेही ज्ञान प्रसारक स्मारक म्हणून नावाजले जात आहे. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आयोजित या विशेष व्याख्यानामुळे अण्णा भाऊंना ख-या अर्थाने वैचारिक आदरांजली अर्पण करण्याचे भाग्य लाभले अशी भावना व्याख्याते डॉ. शरद गायकवाड यांनी व्यक्त केली. नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून अण्णा भाऊंच्या स्मृतीजागरात सहभाग घेतला.
Published on : 01-08-2022 15:35:39,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update