*नवी मुंबईत राष्ट्राभिमान प्रदर्शित करीत ”घरोघरी तिरंगा” झळकणार – आयुक्त श्री. अभिजीत बांगर*
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘स्वराज्य महोत्सव’ आणि ‘घरोघरी तिरंगा’ हे दोन अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून त्यामध्ये महानगरपालिकेच्या सर्वच विभागांनी आपल्या स्तरावर पूरक कार्यक्रम राबवावेत तसेच या सर्व उपक्रमांत व्यापक लोकसहभाग असेल यादृष्टीने विभाग पातळीवर सूक्ष्म नियोजन करून कार्यवाही करावी असे निर्देश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी विभागप्रमुख आणि विभाग अधिकारी यांच्या आढावा बैठकीत दिले.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशात उत्साहाने साजरा होत असताना केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत ‘स्वराज्य महोत्सव’ अंतर्गत राबविण्यात येणारे विविध उपक्रम तसेच ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत शहरातील प्रत्येक घरावर 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत फडकविण्यात येणारा तिरंगा राष्ट्रध्वज याविषयीच्या नियोजन कार्यवाहीचा नमुंमपा आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांनी तपशीलवार आढावा घेतला.
प्रत्येक माणसाला आपल्या देशाविषयी अभिमान असतो. तो अभिव्यक्त करण्याची एक उत्तम संधी या उपक्रमाच्या माध्यमातून लाभली असून त्यामध्ये प्रत्येक नागरिकाने स्वयंस्फुर्तीने सहभागी होऊन घरोघरी तिरंगा फडकवावा यादृष्टीने त्यांच्यापर्यंत या उपक्रमाची माहिती पोहचविण्याची कामगिरी विभाग कार्यालयांमार्फत व्यापक प्रमाणात व्हावी असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
या उपक्रमांतर्गत नागरिकांनी स्वत: झेंडे खरेदी करून स्वयंस्फुर्तीने फडकविणे अपेक्षित असून तशा प्रकारचे आवाहन पत्र आयुक्तांमार्फत सर्व सोसायट्या, वसाहतींचे पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांना देण्यात आलेले आहे. याशिवाय झोपडपट्टी व गावठाण भागात महानगरपालिकेमार्फत झेंड्यांचे वितरण केले जाणार आहे. या वितरित केल्या जाणा-या झेंड्यासह एक माहितीपत्रक वितरित करावे ज्यामध्ये नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखून तो ध्वजसंहितेनुसार फडकविण्यासाठी घ्यावयाची काळजी याविषयी माहिती असेल असे आयुक्तांनी निर्देशित केले. तसेच हे माहितीपत्रक इतर सर्वच नागरिकांपर्यंत पोहचण्याचीही खबरदारी घ्यावी असेही सूचित करण्यात आले.
विभाग कार्यालयांमार्फत वितरित करण्यात येणा-या झेड्यांचे संग्रहण व वितरण कार्यवाही करताना प्रत्येक विभाग कार्यालयाने आपला समन्वय अधिकारी नेमून राष्ट्रध्वजाचा पूर्णत: सन्मान राखला जाईल याची काटेकोर काळजी घेण्यात यावी असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे 15 ऑगस्टनंतर नागरिकांनी फडकविलेला झेंडा त्यांनी सन्मानपूर्वक जतन करून ठेवावा असाही संदेश नागरिकांपर्यंत पोहचेल याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
‘घरोघरी तिरंगा’ मोहीमेची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी सर्व प्रसार माध्यमांचा प्रभावी वापर करण्याचे सूचित करतानाच दर्शनी ठिकाणी मोठे होर्डींग देखील लावण्यात यावेत असेही निर्देश आयुक्तांनी दिले.
याशिवाय प्रभात फे-या हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून जनजागृतीचे अतिशय प्रभावी माध्यम आहे हे लक्षात घेऊन 9 ते 14 ऑगस्ट या कालावधीत विविध विभागांमध्ये शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या जनजागृतीपर प्रभातफे-यांचे आयोजन करण्यात यावे असेही आयुक्तांनी सूचित केले. याव्दारे विद्यार्थ्यांच्या मनावर देशप्रेमाचे संस्कार होतीलच शिवाय ज्या भागातून प्रभात फे-या जातील त्या ठिकाणच्या नागरिकांमध्येही देशभक्तीची भावना जागृत होईल. विद्यार्थ्यांप्रमाणेच महिला बचत गट, महिला संस्था, ज्येष्ठ नागरिक संघटना यांच्याही सहभागातून विविध भागांमध्ये प्रभात फे-यांचे आयोजन करण्यात यावे असेही आयुक्तांनी सूचित केले.
देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होणे हा एकप्रकारे राष्ट्रीय सणच आहे. त्यामुळे आपला देशाभिमान व्यक्त करण्यासाठी नागरिक विविध माध्यमांचा उपयोग करू शकतात. यामध्ये नागरिक पोषाखावर मेटल ध्वज परिधान करू शकतात, तिरंग्याची फ्रेम एकमेकांना भेट देऊ शकतात, सोशल मिडियावरून डिजीटल तिरंगा एकमेकांना भेट देऊ शकतात, मा.पंतप्रधान महोदयांनी आवाहन केल्याप्रमाणे आपला डिपी तिरंगा ठेवू शकतात, एवढेच नव्हे तर तिरंग्यासोबतचा आपला सेल्फी सोशल माध्यमांवर अपलोड करून नवी मुंबई महानगरपालिकेच्या फेसबुक अकाऊंटला टॅग करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचू शकतात. अशा विविध प्रकारे आपल्या राष्ट्रभक्तीचे दर्शन घडविण्याची ही एक उत्तम संधी नागरिकांना आहे.
त्यामुळे ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमांतर्गत 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत नागरिकांनी तिरंगा आपल्या घरावर फडकवावाच तसेच ‘स्वराज्य महोत्सव’ अंतर्गत महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विविध उपक्रमांमध्ये उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 04-08-2022 15:54:40,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update