*स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित उपक्रमात ज्येष्ठ नागरिकांचाही असणार सहभाग*
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असून केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 9 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत स्वराज्य महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक घरावर तिरंगा राष्ट्रध्वज फडकेल अशाप्रकारे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार नियोजन करण्यात आलेले आहे. आयुक्त महोदयांच्या वतीने याविषयीच्या कार्यवाहीचा नियमीतपणे आढावा घेतला जात आहे.
स्वराज्य महोत्सव अंतर्गत नियोजित विविध उपक्रमांमध्ये लोकसहभागावर विशेष भर दिला जात असून या अनुषंगाने महिला बचत गटांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. तिरंगा झेंडा निर्मिती कार्यात महिला बचत गट व महिला संस्था यांचा प्रत्यक्ष सहभाग करुन घेतला जात आहे. त्याचप्रमाणे घरोघरी तिरंगा या उपक्रमाच्या जनजागृती कार्यातही महिलांचा व्यापक सहभाग असणार आहे.
अशाचप्रकारे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त विविध उपक्रम आयोजन व जनजागृती कार्यात नवी मुबई महानगरपालिका क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांचाही सक्रीय सहभाग असावा यादृष्टीने मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात समाजविकास विभागाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांची विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेत समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री दादासाहेब चाबुकस्वार यांनी ज्येष्ठ नागरिक हे शहराची अनुभवसंपन्न संपत्ती असून त्यांच्या अनुभवाचा उपयोग नेहमीच शहर विकास कार्यात झालेला आहे असे सांगितले. त्यामुळे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशात अत्यंत उत्साहाने साजरा होत असताना नवी मुंबई मध्येही हा महोत्सव दिमाखदार पध्दतीने साजरा होण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचे मौलिक मार्गदर्शन व सहभाग अपेक्षित असल्याचे सांगितले. या अनुषंगाने सर्व ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात देशाभिमान जागृत करणारे तसेच देशभक्तीचे दर्शन घडविणारे कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत, आपापल्या विभागीय क्षेत्रात याविषयी जनजागृती करण्यासाठी प्रभात फे-यांचे आयोजन करण्यात यावे, घरोघरी तिरंगा मोहिमेच्या प्रचार - प्रसिध्दी कामात मदत व्हावी अशा विविध प्रकारे ज्येष्ठ नागरिक संघटना यांनी संस्था पातळीवर तसेच शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्तीगत पातळीवर या राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन केले.
भारत देशाविषयी आपल्या मनात असलेली देशभक्तीची भावना विविध माध्यमातून व्यक्त करण्याची अनमोल संधी या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक भारतीय नागरिकाला उपलब्ध झालेली असून प्रत्येक सामाजिक कार्यात पुढाकार घेत सहभागी होणा-या नवी मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांनी यामध्ये आपले सक्रीय योगदान दयावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
Published on : 05-08-2022 12:37:02,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update