*एनएमएमटीची आयआयटीएमएस प्रणाली होणार अधिक अद्ययावत व प्रवासी सुविधाजनक*
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या दैनंदिन परिचलनामध्ये अत्याधुनिक आयआयटीएमएस (Integrated Intelligent Transport Management System (IITMS)) प्रणालीचा वापर करण्यात येत असून या अत्याधुनिक प्रणालीच्या प्रभावी वापराबद्दल नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमास विविध राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आलले आहे.
या प्रणालीव्दारे सुरु असलेल्या कार्यवाहीचा प्रत्यक्ष आढावा महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी एनएमएमटी मुख्यालयाच्या कंट्रोल रुममध्ये घेताना संपूर्ण प्रणालीची बारकाईने पाहणी केली तसेच त्यामधील प्रवाशांना सोयीचे होईल आणि परिवहन उपक्रमालाही दैनंदिन परिचलनाचा आढावा घेताना सोयीचे होईल अशा प्रकारच्या सुधारणा सूचविल्या.
सन 2017 पासून अत्याधुनिक आयआयटीएमएस प्रणाली एनएमएमटी मध्ये राबविण्यात येत असून काळानुरूप ही प्रणाली अद्ययावत करण्याची गरज असल्याने त्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी परिवहन व्यवस्थापक श्री. योगेश कडुसकर यांना दिले. एनएमएमटीचे प्रवासी वापरात असलेले ॲप्लिकेशन वापरण्यास अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने आवश्यक बदल करावेत तसेच त्याची मांडणी आकर्षक असावी असेही आयुक्तांनी सूचित केले.
सद्यस्थितीत परिवहन उपक्रमाकडे नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड वापरासाठी 250 मशीन असून त्याचा परिवहन उपक्रमाच्या ताफ्यातील 25 टक्के गाड्यांवर वापर होत आहे. 100 टक्के गाड्यांमध्ये त्याचा वापर होण्यासाठी प्राधान्याने कार्यवाही करावी असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. त्याचप्रमाणे प्राधान्याने प्रवाशांची सोय हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून प्रवाशाकडे कोणत्याही बँकेचे डेबिट अथवा क्रेडीट कार्ड असेल तरी त्याला त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या कार्डने एनएमएमटी प्रवासाचे टिकीट काढता यावे अशा प्रकारची यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने तत्पर कार्यवाही करावी असेही आयुक्तांमार्फत निर्देश देण्यात आले.
याप्रसंगी आयुक्तांनी परिवहन उपक्रमाच्या दैनंदिन डेपोनिहाय अहवालाची बारकाईने पाहणी केली. यामध्ये वाहनाची धाव व उत्पन्नाचा तपशील याची तुलनात्मक तपासणी करण्यात आली. आपली प्रवासी सेवा प्रमाण मानकाच्या मर्यादेत असण्याबाबत खात्री करण्यासाठी या अहवालांचा उपयोग व्हावा अशा सूचना आयुक्तांनी केल्या.
परिवहन उपक्रमाचा डेपोनिहाय व संपूर्ण उपक्रमनिहाय मासिक व वार्षिक लोड फॅक्टर काढून त्याचा अहवाल सादर करण्यात यावा असे यावेळी निर्देशित करण्यात आले. लोड फॅक्टर हा अत्यंत महत्वाचा घटक असून त्याचे दिनांक निहाय, मार्गनिहाय, फेरीनिहाय विश्लेषण करावे असे आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले. सद्यस्थितीत लोड फॅक्टर हा मानवीय पध्दतीने कागदावर तपशील नोंदवून काढला जात असून तो आयआयटीएमएस प्रणालीव्दारेच उपलब्ध व्हावा यादृष्टीने आवश्यक बदल करण्याचे निर्देशही आयुक्तांनी यावेळी दिले.
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमातील प्रवाशांना उत्तम प्रवासी सेवा पुरवितानाच त्यामधील सुविधा वाढवून गुणवत्तापूर्ण सेवेवर भर देतानाच उपक्रमाचा तोटा कमी करण्याच्या दृष्टीनेही नियोजनबध्द प्रयत्न करण्याचे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी या आयआयटीएमएस प्रणालीचा आढावा घेताना सूचित केले.
Published on : 09-08-2022 12:58:45,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update