*अमृत महोत्सवी गायन आणि एकपात्री अभिनय स्पर्धा जल्लोषात संपन्न*
आज विविध कलांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रावीण्य असलेले अनेक कलावंत दिसून येतात. अशा कलावंतांच्या गुणवत्तेला संधी उपलब्ध करून देण्याची गरज असून त्यासाठी शहराची महानगरपालिका पुढाकार घेते हीच दाद देण्यासारखी गोष्ट असून नवी मुंबईचे कलाकार त्यादृष्टीने भाग्यवान असल्याचे मत सुप्रसिध्द गायक श्री.मंगेश बोरगावकर यांनी व्यक्त केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित अमृत गायन स्पर्धेचे परीक्षक म्हणून ते पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी रंगमंचावर सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा विभागाचे उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, अमृत गायन स्पर्धेचे परीक्षक सुप्रसिध्द गायक श्री. अभिजीत कोसंबी व श्री. मंगेश बोरगावकर, सुप्रसिध्द नाट्य लेखक दिग्दर्शक अभिनेते श्री. संतोष पवार व नामांकित अभिनेत्री श्रीम. किशोरी अंबिये, क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या अंगभूत कला गुणांची क्षमता सिद्ध करण्यासाठी अशा स्पर्धा हे एक चांगले माध्यम असून उत्तम अभिनयासाठी जास्तीत जास्त नाटके पहा, त्यातून बरे-वाईट हे आपले आपल्यालाच कळू लागेल असा संदेश देत अमृत एकपात्री अभिनय स्पर्धेचे परीक्षक सुप्रसिध्द अभिनेते श्री. संतोष पवार यांनी या स्पर्धेत मुलींचा सहभाग लक्षणीय होता ही संतोषजनक बाब असल्याचे सांगितले.
क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे यांनी देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहाने साजरा होत असताना महापालिका आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिका देखील विविध उपक्रम राबवित असल्याची माहिती देत नवी मुंबईकर कलावंत व खेळाडू यांच्या अंगभूत गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विभागाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. देशभक्तीपर विषय असलेल्या अमृत गायन, अमृत एकपात्री अभिनय व अमृत नृत्य या स्पर्धा हा त्याचाच एक भाग असून या सर्वच स्पर्धांना जो उदंड प्रतिसाद लाभला तो उत्साह वाढविणारा असल्याचे ते म्हणाले.
164 इतक्या मोठ्या प्रमाणात वैयक्तिक व समुह गायक स्पर्धकांचा सहभाग लाभलेल्या अमृत गायन स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये 29 स्पर्धकांतून 15 वर्षावरील लहान गटात पुर्वांश शर्मा याने व्यक्तिगत गायन तसेच एमएनआर इंटरनॅशनल स्कुल यांनी समुह गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक संपादन केला. तसेच 15 वर्षावरील खुल्या गटात अमोल चव्हाण याने व्यक्तिगत गायन आणि नमुंमपा राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय यांनी समुह गायनाचे प्रथम पारितोषिक पटकाविले.
अमृत एकपात्री अभिनय स्पर्धेत सहभागी 82 कलावंतांमधून 20 कलावंताची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. त्यामध्ये 15 वर्षावरील लहान गटात दृष्टी गुप्ता हिने तसेच 15 वर्षावरील खुल्या गटात तन्वी हिंदळेकर हिने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक संपादन केले.
* अमृत गायन स्पर्धा :-
लहान गट (एकल गायन) : प्रथम – पुर्वांश शर्मा
व्दितीय – आरोह देरदेकर
तृतीय – अभिधम्मा राजगुरू
उत्तेजनार्थ – स्वरा बनसोडे व स्वराली देशमुख
खुला गट (एकल गायन) : प्रथम – अमोल चव्हाण
व्दितीय – काजल कोळेकर
तृतीय – समृध्दी जाधव
उत्तेजनार्थ – विदुषी वर्मा व युक्ता पाटील
लहान गट (समुह गायन) : प्रथम – एमएनआर इंटरनॅशनल स्कुल
व्दितीय – नमुंमपा राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय
तृतीय – मॉडर्न स्कुल
उत्तेजनार्थ – दत्ता मेघे वर्ल्ड ॲकेडमी व स्वरानंद सुगम संगीत समुह
खुला गट (समुह गायन) : प्रथम – नमुंमपा राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय
व्दितीय – सिम्बॉल ब्ल्यूज् ग्रूप
तृतीय – ग्रीन वर्ल्ड म्युजिकल क्लब
उत्तेजनार्थ – दत्ता मेघे वर्ल्ड ॲकेडमी व ऐरोली म्युझिक
* अमृत एकपात्री अभिनय स्पर्धा :-
लहान गट : प्रथम – दृष्टी गुप्ता
व्दितीय – उल्का झगडे
तृतीय – प्रांजल कांबळे
उत्तेजनार्थ – ईश्वरी लोखंडे व रिध्दी जरीवाला
खुला गट : प्रथम – तन्वी हिंदळेकर
व्दितीय – संकेत तोत्रे
तृतीय – ज्योती पाठारे
उत्तेजनार्थ – षण्मुखानंद आवटे व सुश्रुता साळवे
दोन्ही स्पर्धांतील पारितोषिक विजेत्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित अमृत नृत्य स्पर्धेची अंतिम फेरी दि. 10 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वा. विष्णुदास भावे नाट्यगृह याठिकाणी आयोजित करण्यात आलेली असून या स्पर्धेत सहभागी 134 वैयक्तिक कलावंत व नृत्य समुहांमधून 34 कलावंत व समुहांची परीक्षक नृत्य दिग्दर्शक श्री. सचिन पाटील यांनी अंतिम फेरासाठी निवड केलेली आहे. अमृत नृत्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचे परीक्षण नामांकित अभिनेत्री व नृत्य कलावंत श्रीम. शर्वरी जमेनीस करणार असून या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा सायं. 4 वा. मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी उदयोन्मुख नृत्य कलावंत तसेच नृत्य समुहांना प्रोत्साहित करण्यासाठी कला रसिकांनी याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 09-08-2022 14:32:18,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update