नागरी आरोग्य केंद्र व शाळा इमारत बांधकामात दिरंगाई करणा-या कंत्राटदारावर कारवाई – कंत्राट रद्द
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरु असलेली सुविधा कामे गुणवत्तापूर्ण रितीने पूर्ण करण्याप्रमाणेच ती विहीत वेळेत व्हावीत याकडे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे बारकाईने लक्ष असून तशा प्रकारचे निर्देश अभियांत्रिकी विभागाला यापूर्वीच देण्यात आलेले आहेत.
तथापि कोपरखैरणे विभागातील विविध कामांची 3 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष पाहणी करताना त्यामध्ये सेक्टर 14 व सेक्टर 16 येथील नागरी आरोग्य केंद्राचे बांधकाम तसेच श्रमिक नगर येथील शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम फारशा गतीने सुरु नसल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. त्याठिकाणी सदर कामांची सविस्तर माहिती जाणून घेतली असता या कामांना मोठ्या प्रमाणात दिरंगाई झाली असल्याचे आढळले. सदर कंत्राटदारास वारंवार संधी देऊनही त्या कामात सुधारणा करण्यात आली नसल्याचेही दिसून आले.
ही तिन्ही कामे आरोग्य आणि शिक्षण या नागरिकांसाठी अत्यंत महत्वाच्या सुविधांची असल्याने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असूनही व याबाबत वारंवार तोंडी व लेखी सूचना देऊनही कामात सुधारणा न झाल्याने कंत्राटदार मे. ए.ई. इन्फ्रा. प्रा. लि. यांना निविदेतील अटी व शर्तींनुसार त्यांच्याकडून काम काढून घेऊन कंत्राट रद्द (Terminate) करण्याचे आदेश बजावण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे काळ्या यादीत का टाकण्यात येऊ नये याबाबत खुलासा सादर करण्याचे सूचित करण्यात आले आहे.
यामध्ये कोपरखैरणे सेक्टर 14 येथील भू.क्र. 22 यावर बांधण्यात येणा-या नागरी आरोग्य केंद्राकरीता तसेच कोपरखैरणे सेक्टर 16 येथील भू.क्र. 38 वर बांधण्यात येत असलेल्या नागरी आरोग्य केंद्राकरिता 06/03/2019 ते 05/03/2020 या कालावधीसाठी कार्यादेश देण्यात आलेले होते. सदर कालावधीमध्ये काम पूर्ण न केल्याने 7.5 टक्के दंडात्मक शुल्क आकारून 31/03/2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती.
त्यानंतरही वाढीव मुदतीत काम पूर्ण न झाल्याने वारंवार लेखी कळविण्यात आले होते. तसेच कामाची प्रगती समाधानकारक नसल्याने अनेकदा आढावा बैठका घेऊन व तोंडी सूचना देऊन नागरी आरोग्य केंद्र इमारतीच्या बांधकामाचे महत्व निदर्शनास आणून देण्यात आले होते.
या दोन्ही नागरी आरोग्य केंद्रांच्या सेक्टर 14 व सेक्टर 16 परिसरात अल्प उत्पन्न धारक नागरिक मोठ्या प्रमाणात राहत असून त्यांना आवश्यक आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीने या इमारती विहीत वेळेत पूर्ण करणे गरजेचे होते. तथापि वारंवार सूचना देऊनही अद्यापपर्यंत सेक्टर 14 येथील इमारतीचे 85 टक्के व सेक्टर 16 येथील इमारतीचे 70 टक्केच काम पूर्ण झाले असल्याने 17 जून 2022 रोजी या दोन्ही कामांकरिता स्वतंत्ररित्या अंतिम नोटीस देण्यात आलेली होती. तथापि त्यानंतरही कामात सुधारणा न झाल्याने व याविषयी स्वारस्य न दाखवल्याचे निदर्शनास आल्याने सदरची दोन्ही कामे काढून घेऊन समाप्त (Terminate) करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत.
त्याचप्रमाणे श्रमिक नगर भागामध्ये भू.क्र. ओएस – 2/2 (ए) व 2/3 (ए) येथे शाळेची नवीन इमारत बांधण्याकरिता 21/02/2019 ते 20/02/2020 या कालावधीकरिता कार्यादेश देण्यात आले होते. तथापि या कालावधीत काम पूर्ण न झाल्याने 7.5 टक्के दंडात्मक शुल्क आकारून 31/03/2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती. त्यानंतरही कामाची प्रगती समाधानकारक आढळून येत नसल्याने वारंवार आढावा बैठका घेऊन, तोंडी व लेखी सूचना देऊन कामाचे महत्व लक्षात घेऊन ते विहित वेळेत पूर्ण करावे असे आदेशित करण्यात आले होते.
श्रमिक नगर हा झोपडपट्टी भाग असून येथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने सदर शाळा इमारत लवकरात लवकर उपलब्ध होणे आवश्यक होते. तथापि वारंवार सूचित करूनही 70 टक्केच काम पूर्ण झाल्याने 17 जून 2022 रोजी 15 दिवसांची अंतिम नोटीस देण्यात आलेली होती. मात्र त्यानंतरही या विषयी गांभीर्य न दाखवल्याने व कामाच्या पुढील नियोजनाबाबत कोणत्याही प्रकारे खुलासा सादर न केल्याने या कामाबाबत स्वारस्य नसल्याचे आढळून आल्याने सदरचे काम काढून घेऊन समाप्त (Terminate) करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका नागरिकांना पुरवित असलेल्या सेवा सुविधा उत्तम दर्जाच्या असण्यासोबतच त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याकडेही अभियांत्रिकी विभागाने काटेकोर लक्ष देणे अभिप्रेत असून याविषयी गांभीर्य न राखता दिरंगाई करणा-या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याचे तसेच अशा प्रकारे कामात निष्काळजीपणा दाखविणा-या कंत्राटदारांना काळ्या यादीत (ब्लॅक लिस्ट) टाकून त्यांना यापुढील काळात नवी मुंबई महानगरपालिकेच्या कामांसाठी अपात्र ठरवावे असे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी अभियांत्रिकी विभागास दिलेले आहेत.
Published on : 11-08-2022 13:10:10,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update