नमुंमपा मुख्यालयात आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न नागरिकांमध्ये मुख्यालयाच्या तिरंगी रंगातील सजावटीसोबत सेल्फीचे आकर्षण
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना आज स्वातंत्र्यदिनी आयकॉनिक वास्तू म्हणून नावलौकिक असणा-या नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीच्या प्रांगणात महापालिका आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
याप्रसंगी अधिकारी, कर्मचारीवृंदाप्रमाणेच नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तिरंगी फुग्यांव्दारे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा देणारा फलक आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांच्या हस्ते, अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे व श्रीम. सुजाता ढोले यांच्या उपस्थितीत आकाशात सोडण्यात आला.
मुख्यालय इमारतीला केलेली आकर्षक तिरंगी सजावट तसेच मोठ्या एलईडी स्क्रीनवरून प्रक्षेपित होणारे शुभेच्छा संदेश याव्दारे भव्यतम मुख्यालय इमारतीच्या आकर्षणात भर पडलेली असून नागरिक कुटुंबासह एकत्र येऊन तिरंगी झळाळी असलेल्या मुख्यालय वास्तुसोबत तसेच तेथील सेल्फी पॉईंटवर उत्साहाने छायाचित्रे काढताना दिसत आहेत.
पावसाळी कालावधीत फडकविला न जाणारा मुख्यालय इमारतीसमोरील उंच व भव्यतम स्वरूपातील प्रतिकात्मक राष्ट्रध्वज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असल्याने घरोघरी तिरंगा मोहीमेच्या अनुषंगाने फडकविण्यात आला असून हे देखील नागरिकांचे एक आकर्षण आहे. मुख्यालयाच्या अंतर्गत भागात ठिकठिकाणी तिरंगी फुग्यांव्दारे, पताकांव्दारे तसेच इतर विविध प्रकारे केलेली आकर्षक सजावटही नागरिकांच्या प्रशंसेस पात्र ठरली.
Published on : 15-08-2022 12:44:52,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update