*आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत स्वप्नातील भारत मांडताना विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग*
भारतीय स्वातंत्र्याचा अंमृत महोत्सव साजरा करताना नवी मुंबई महानगरपालिकेने देशभक्ती व देशाभिमान अभिव्यक्त करणारे विविध उपक्रम राबविले असून यामध्ये समाजाच्या विविध स्तरांतील नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग लाभला आहे.
या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका शाळांमधील विदयार्थ्यांच्या मनात असलेले आपल्या देशाविषयीचे विचार व देशप्रेमाची भावना मांडण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रथमत: नवी मुंबई महानगरपालिका शाळांच्या स्तरावर ‘माझ्या स्वप्नातील भारत’ या विषयावर विद्यार्थ्यांची प्राथमिक फेरीची स्पर्धा झाली. नमुंमपा प्राथमिक व माध्यमिक तसेच सीबीएससी बोर्डाच्या शाळांमधील स्पर्धेमधून प्रत्येक शाळेतून एका सर्वोत्तम विदयार्थ्याची निवड महापालिका स्तरावरील अंतिम फेरीच्या आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेकरिता शालेय स्तरावर करण्यात आली.
प्रत्येक शाळेतील एक अशा अंतिम फेरीत दाखल झालेल्या निवडक 80 मुलांचे अंतिम फेरीमध्ये 10 व 12 ऑगस्ट या दोन दिवशी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे खुल्या रंगमंचावर सादरीकरण झाले. सर्वच विदयार्थ्यांनी अत्यंत आत्मियतेने व आत्मविश्वासाने आपल्या स्वप्नातील भारताविषयीच्या संकल्पना प्रभावीपणे मांडल्या.
15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी आयोजित ‘अमृत सोहळा स्वातंत्र्याचा’ या विशेष कार्यक्रमात महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या शुभहस्ते या आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या स्पर्धाकांना परितोषिके प्रदान करुन गौरविण्यात आले.
आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत इयता पहिली ते पाचवीच्या गटात नमुंमपा शाळा क्रमांक 36, कोपरखैरणेगाव येथील विदयार्थिनी तनिषा वांगडे हिने प्रथम क्रमांक पटकाविला. विदुषी चौबे (नमुंमपा शाळा क्रमांक 11, कुकशेत) ही व्दितीय क्रमांकाची व अक्षय दास (नमुंमपा शाळा कम्रांक 56, इलठणपाडा) हा विदयार्थी तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. श्रेयांश महिंद्रकर (नमुंमपा शाळा क्र. 93 सीबीएसई बोर्ड, नेरुळ) व तबरेज खान (नमुंमपा शाळा क्र. 05, दारावे) हे उत्तेजनार्थ पारितोषिकाचे मानकरी ठरले.
इयता सहावी ते आठवीच्या गटात नमुंमपा शाळा क्रमांक 35, सेक्टर 5, कोपरखैरणेची विदयार्थिनी ऋतुजा पाटील हिने प्रथम क्रमांकाचे तसेच नमुंमपा शाळा क्रमांक 33, पावणे येथील विदयार्थी साहिल जाधव याने व्दितीय व नमुंमपा शाळा क्रमांक 72, कोपरखैरणे येथील विदयार्थिनी संजना साहू हिने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक संपादन केले. नमुंमपा शाळा क्रमांक 49 ऐरोली गाव येथील विदयार्थिनी श्रध्दा शिंदे व नमुंमपा शाळा क्रमांक 91 इंग्रजी माध्यम, दिवा गाव येथील विदयार्थिनी अस्तुती झा यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके पटकावली.
इयता नववी ते दहावी या माध्यमिक शाळांच्या गटात तनुजा पाटील (नमुंमपा शाळा क्र. 106, कोपरखैरणे) ही विदयार्थिनी प्रथम क्रमांकाची विजेती ठरली. संपदा पांगारकर (नमुंमपा शाळा क्र. 103, ऐरोली) या विदयार्थिनीने व्दितीय आणि आफ्रिन खान (नमुंमपा शाळा क्र. 109 ऊर्दू माध्यम, खैरणे) याने तृतीय क्रमांक संपादन केला. राधा झा (नमुंमपा शाळा क्र. 119, गोठिवली) आणि रुक्सार खान (नमुंमपा शाळा क्र. 121, कुकशेत इंग्रजी माध्यम) या विदयार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिकाने सनमानित करण्यात आले. श्रीमती रेखा पाटील व श्रीमती सुप्रिया पायरे यांनी स्पर्धा परीक्षण केले.
अमृत सोहळा स्वातंत्र्याचा कार्यक्रमामध्ये ऋतृजा पाटील या विद्यार्थिनीच्या स्वप्नातील भारताचे मनोगत ऐक्ताना आयुक्त महोदय यांच्याप्रमाणेच सर्व उपस्थित तिच्या प्रभावी सादरीकरणाने भारावून गेले. इयत्ता सहावी ते आठवीच्या गटातील प्रथम पारितोषिक तिला प्रदान करताना तिची लहानखुरी उंची पाहून आयुक्त महोदय यांनी खाली वाकत तिच्याएवढ्या उंचीचे होत तिला पारितोषिक प्रदान केले व वेगळया पध्दतीने तिच्या अंगभूत वक्तृत्व गुणांचे कौतुक केले. आयुक्त् महोदयांची ही गुणग्राहकता देखील उपस्थितांच्या पसंतीचा विषय ठरली.
Published on : 18-08-2022 12:37:38,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update