*सानपाडा उड्डाणपुलाखाली उंच लोखंडी ग्रीलव्दारे अस्वच्छतेला प्रतिबंध*
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातून जाणा-या सायन पनवेल महामार्गावरील उड्डाणपूल दूर अंतराचे व उंच असून त्याखालील जागा मोकळी असल्याने त्या दुर्लक्षित जागेत अस्वच्छता होऊन तसेच त्याठिकाणी बेघर नागरिकांचा मोठ्या संख्येने रहिवास वाढून शहर स्वच्छतेला बाधा पोहचत आहे.
सदरचा उड्डाणपूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत असला तरी उड्डाणपुलाखालील अस्वच्छतेमुळे तसेच देशातील व राज्यातून ठिकठिकाणाहून येऊन उड्डाणपुलाखाली आश्रय घेतलेल्या बेघर लोकांमार्फत अस्वच्छता पसरवली जात असल्यामुळे शहर स्वच्छतेला मोठ्या प्रमाणावर हानी पोहचत आहे. एका बाजूला 10 ते 40 लाख लोकसंख्येच्या मोठ्या शहरांमध्ये देशातील सर्वप्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून मानांकन मिळविताना व ते उंचाविण्यासाठी समस्त नवी मुंबईकर नागरिक एकदिलाने जोमाने प्रयत्न करीत आहेत. त्यावेळी दुस-या बाजूला बेघर लोकांमार्फत उड्डाणपुलांखाली निर्माण होणा-या अस्वच्छतेला प्रतिबंध व्हावा याकरिता सानपाडा रेल्वे स्टेशनसमोर सायन पनवेल महामार्गावर असणा-या उड्डाणपुलाखाली दोन्ही बाजूने जाड ग्रील्सचे 11 फूटी उंच कुंपण घालण्यात आलेले आहे.
महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार स्वच्छताविषयक विविध उपक्रम राबविताना अस्वच्छतेला प्रतिबंध करणा-या विविध बाबींकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. या अनुषंगाने उड्डाणपूलाखालील अस्वच्छ वातावरण दूर करण्याच्या दृष्टीने हे कुंपण घालण्यात आले असून आयुक्तांनी स्वत: याची पाहणी केली आणि परिसर स्वच्छतेच्या दृष्टीने मौलिक सूचना केल्या. याठिकाणी ग्रीलच्या आतील भाग संपूर्ण स्वच्छ करून घ्यावा तसेच ग्रीलला लावण्यात आलेल्या गेट्सची उंची वाढविण्याचे निर्देश त्यांनी दिले. ग्रीलला आकर्षक रंगसंगतीने शहर सौंदर्यीकरणात भर पडेल अशाप्रकारे सुशोभित करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
शहर स्वच्छतेच्या दृष्टीने सायन पनवेल महामार्गावर सानपाडा उड्डाणपुलाखाली प्रायोगिक स्वरूपात जाड ग्रीलचे उंच कुंपण उभारण्यात आले असून इतर ठिकाणचा आढावा घेऊन गरज भासल्यास अशा प्रकारची उपाययोजना करण्यात येईल असेही महापालिका आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले.
Published on : 23-08-2022 14:17:53,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update