सार्वजनिक श्रीगणेशोत्सवाच्या मंडपातही कोव्हीड लसीकरणाच्या विशेष मोहिमा
कोव्हीडचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने सुरुवातीपासूनच कोव्हीड लसीकरणाकडे विशेष लक्ष दिल्याने पहिल्या व दुस-या डोसचे उद्दीष्ट पूर्ण करणारी नवी मुंबई प्रथम क्रमांकाची महानगरपालिका ठरली. कोव्हीड लसीकरणामुळे आजाराची तीव्रता कमी झाल्याचे निदर्शनास आले असून त्यादृष्टीनेही लसीकरण लाभदायी ठरलेले आहे.
सद्यस्थितीत कोव्हीडचा प्रिकॉशन डोस घेण्याचा कालावधीही कमी झालेला असून दुसरा डोस घेतल्यानंतर 6 महिने किंवा 26 आठवड्यांनी प्रिकॉशन डोस घेता येत आहे. आत्तापर्यंत 1,77,596 नागरिकांनी कोव्हीडचा प्रिकॉशन डोस घेतलेला आहे. यामध्ये त्याचप्रमाणे कोव्हीडचा पहिला डोस घेतलेले 13,85,820 इतके नागरिक असून 12,44,024 इतक्या नागरिकांनी दोन्ही डोस घेतलेले आहेत.
कोव्हीड लसीकरण अमृत महोत्सव 30 सप्टेंबर 2022 पर्यंत साजरा केला जात असून 31 ऑगस्टपासून सुरु झालेल्या श्रीगणेशोत्सव कालावधीतही नागरिकांना प्रिकॉशन डोस घेता यावा अशी सुविधा महानगरपालिकेची सर्व रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रे या ठिकाणी सुरु ठेवण्यात आलेली आहेत.
याशिवाय महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपामध्ये कोव्हीड लसीकरण अमृत महोत्सव अंतर्गत विशेष लसीकरण मोहिमा राबविल्या जात असून स्थानिक नागरी आरोग्य केंद्रांमार्फत या लसीकरण मोहिमांचे नियोजन केले जात आहे.
23 नागरी आरोग्य केंद्रांच्या परिसरातील 100 श्रीगणेशोत्सव मंडळाठिकाणी विशेष लसीकरण केंद्रे स्थापित करण्यात आलेली असून त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभताना दिसत आहे. यामध्ये सीबीडी नागरी आरोग्य केंद्र क्षेत्रात 9 गणेशोत्सव मंडळे, करावे – 6, सेक्टर 48 नेरूळ – 3, नेरुळ फेज 1 – 3, कुकशेत – 2, शिरवणे – 1, सानपाडा – 7, तुर्भे – 3, पावणे – 2, इंदिरानगर – 1, जुहूगांव -3, वाशीगांव – 6, खैरणे – 6, महापे – 1, घणसोली – 16, नोसिलनाका – 4, राबाडा – 9, कातकरीपाडा – 4, ऐरोली – 4, चिंचपाडा – 3, दिघा- 1 व इलठणपाडा 6 असे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वतीने 100 मंडळांमध्ये 125 मोहिमा घेतल्या जात आहेत.
प्रिकॉशन डोस घेण्यात नागरिकांना सुलभता व्हावी यादृष्टीने मागणीनुसार सोसायट्यांची कार्यालये, खाजगी रुग्णालये, जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र अशा ठिकाणी अतिरिक्त लसीकरण शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोर्बिव्हॅक्स ही लस प्रिकॉशन डोस म्हणून घेता येईल. कोर्बिव्हॅक्स या लसीला विषम कोव्हीड 19 बुस्टर लस म्हणून मान्यता मिळाली असून ज्या 18 वर्षावरील नागरिकांनी यापूर्वी कोव्हीशिल्ड अथवा कोव्हॅक्सीन लसीचे दोन डोस घेतले असतील ते नागरिक 6 महिने किवा 26 आठवडयानंतर कोर्बिव्हॅक्स लस प्रिकॉशन डोस म्हणून घेऊ शकतात.
श्रीगणेशोत्सवामध्ये नागरिकांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक रहावे या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोव्हीड लस संरक्षित कऱण्यावर भर दिला जात असून श्रीगणेशोत्सवा सारख्या उत्सवात देखील नागरिकांना कोव्हीड लसीकरणाचा लाभ करून दिला जात आहे. तरी 18 ते 59 वयोगटातील अथवा त्यापुढील वयाच्या नवी मुंबईकर नागरिकांनी आपला प्रिकॉशन डोस विनामूल्य घेऊन स्वत:ला लस संरक्षित करून घ्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 02-09-2022 15:11:59,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update